Next
तटरक्षणाचा संकल्प
समीर कर्वे
Friday, May 31 | 02:00 PM
15 0 0
Share this story

पश्चिम तटावर केरळपासून मुंबई, कोकणापर्यंत या दिवसांत मान्सून पुढे सरकतो. त्याची चाहूल समुद्राला आधीच लागते. लाटा बेभान होतात, वारा थैमान घालू लागतो. तशात तटापासून अगदी जवळ एका व्यापारी जहाजाच्या इंजिनरूममध्ये पाणी शिरून ते बुडू लागते. संकटाची वर्दी भारतीय तटरक्षकदलाच्या पश्चिम तटावरील मध्यवर्ती केंद्राकडे पोहोचते. मुंबई, दमण येथून हेलिकॉप्टर भरारी घेतात आणि गस्तीवरील सीजीएस संकल्प ही नौकाही घटनास्थळी रवाना होते. खवळलेल्या समुद्रात तटरक्षकदलाचे जवान प्रयत्नांची पराकाष्ठा करतात आणि दर्यावर्दींचा जीव वाचवण्याचा संकल्प पूर्ण करतात.
 आपल्याला तटरक्षकदलाची आठवण अशा समुद्री आपत्तीच्या वेळीच येते. परंतु १९७७ पासून भारतात नौदलाच्या जोडीने कार्यरत असलेले भारतीय तटरक्षकदल कायमच भारतीय किनारपट्टीच्या रक्षणासाठी अहोरात्र दक्ष असते. ‘युद्धनौकांच्या जगात’ डोकावताना आता आपण भारतीय तटरक्षकदलाच्या ताफ्यातील नौकांची ओळख करून घेणार आहोत.
किनारपट्टीलगतच्या २०० सागरी मैल अंतरापर्यंतच्या ‘एक्स्क्ल्युझिव्ह इकॉनॉमिक झोन’मधील म्हणजेच व्यापारउदिमाच्या दृष्टीने महत्त्वाच्या क्षेत्रातील जीवित व मालमत्तेचे संरक्षण करणे, हे तटरक्षकदलाच्या निर्मितीमागचे उद्दिष्ट. संरक्षणदलाच्याच अखत्यारीत येणारे हे दल १९७७ पासून अस्तित्वात आले. खोल समुद्रात मोठी युद्धे खेळण्याची जबाबदारी नौदलाकडे राहील, तर किनारपट्टीजवळच्या टापूचे रक्षण करण्याकरता तटरक्षकदल असेल, अशी ही दुहेरी रचना आहे.
 समुद्री संकटातील आपद्ग्रस्तांचा बचाव व मदतकार्य, व्यापारी जहाजांना सुरक्षा, समुद्री पर्यावरणरक्षण व प्रदूषणनियंत्रण, सागरी तस्करीला अटकाव, मच्छीमारांना साह्य, चाचेगिरीचा बीमोड तसेच वैज्ञानिक संशोधनात सहकार्य अशा विविध जबाबदाऱ्या भारतीय तटरक्षकदलावर असतात. साहजिकच तटरक्षकदलाचा मुख्य कणा असलेल्या गस्तीनौकांनाही अशा बहुविध जबाबदाऱ्यांसाठी सज्ज केलेले असते. नौदलाच्या युद्धनौकांप्रमाणे क्षेपणास्त्र, पाणतीर ही शस्त्रे तटरक्षकदलाच्या नौकांवर नसतात. त्यांची शस्त्रास्त्रे ही तुलनेने कमी तीव्रतेच्या संघर्षाला तोंड देण्यासाठी असतात. त्यामुळेच नौकाबांधणीचा कालावधीही नौदलाच्या फ्रिगेट, विनाशिकांच्या तुलनेत कमी असतो.
भारतीय तटरक्षकदलाच्या ताफ्यात प्रारंभीच्या काळात माझगाव गोदीने बांधलेल्या विक्रम श्रेणीतील गस्तीनौका १९८३पासून समाविष्ट झाल्या. सुमारे ७७ मीटर लांबीच्या व सुमारे १५०० टनांच्या अशा नऊ गस्तीनौका (ऑफशोअर पेट्रोल व्हेसल – ओपीव्ही) दाखल झाल्या. त्याच जोडीला जपानकडून ४० मीटर लांबीच्या प्रकारातील छोट्या वेगवान गस्तीनौकाही (फास्ट पेट्रोल व्हेसल) भारतीय तटरक्षकदलाला मिळाल्या होत्या. विक्रम श्रेणीतील पूर्वीच्या गस्तीनौका आता निवृत्त झाल्या आहेत. त्यांची जागा नव्या आधुनिक विक्रम श्रेणीने घेतली असून ‘मेक इन इंडिया’अंतर्गत लार्सन अॅन्ड टुब्रो या खासगी गोदीने त्या बांधल्या आहेत.
 समर, समर्थ, संकल्प या ‘स’ आद्याक्षराच्या श्रेणीतील गस्तीनौका म्हणजेच ऑफशोअर पेट्रोल व्हेसल्स (ओपीव्ही) या गेली बरीच वर्षे भारतीय तटरक्षकदलाचा कणा बनल्या आहेत. या श्रेणीतील तटरक्षकदलाच्या सर्व नौकांची बांधणी भारतातच, वास्कोच्या गोवा शिपयार्डमध्ये करण्यात आली. गोवा शीपयार्डकडे भारतीय नौदलाच्या सुकन्या श्रेणीतील गस्तीनौका बांधणीचे काम होते. त्याच धर्तीवर १९९० च्या दशकाच्या प्रारंभी समर श्रेणीतील प्रगत प्रकारच्या गस्तीनौकांचे काम तटरक्षक दलाने गोवा शीपयार्डला दिले. १२ अधिकारी आणि ११२ जवान अशी मनुष्यबळाची क्षमता, पुढच्या बाजूस डेकवर ७६ मि.मी.ची एक ओटोमेलारा तोफ आणि ३० मि.मी.च्या दोन मशीनगन तसेच टेहळणी किंवा बचावकार्यासाठी चेतक हेलिकॉप्टर वाहून नेण्याची व्यवस्था अशी संरक्षणप्रणाली या नौकांवर होती. समुद्रातील प्रतिकूल हवामानात गस्तीसाठी प्रदीर्घ काळ या नौकांना तग धरून राहावे लागते, त्यादृष्टीने एका दमात ६ हजार सागरी मैल अंतरापर्यंत टिकून राहण्याची क्षमता त्यांच्यात होती. या श्रेणीत समर (१४ फेब्रुवारी १९९२), संग्राम (२९ मार्च १९९७), सारंग (२१ जून १९९९) व सागर (३ नोव्हेंबर २००३) याप्रमाणे ओपीव्ही दाखल झाल्या.
याच प्रकारातली आणखी थोडी प्रगत आवृत्ती होती, संकल्प (कमिशनिंग – २० मे २००८) व सम्राट (२२ जानेवारी २००९) या गस्तीनौकांची. तेलगळती रोखण्याच्या भूमिकेची तोपर्यंत तटरक्षकदलात भर पडली होती, त्याची सुविधा या नौकांमध्ये होती.
मुंबईवर २६ नोव्हेंबर २००८ रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर तटरक्षकदलाचे सामर्थ्य तिपटीने वाढवण्याची योजना आखण्यात आली. त्यानुसार मे २०१२ मध्ये समर्थ श्रेणीतील प्रगत गस्तीनौकांची ऑर्डर नोंदवण्यात आली. त्यानुसार समर्थ (१० नोव्हेंबर २०१५), शूर (११ एप्रिल २०१६), सारथी (९ सप्टेंबर २०१६), शौनक (२१ फेब्रुवारी २०१७), शौर्य (१२ ऑगस्ट २०१७) व सुजय (२१ डिसेंबर २०१७) या गस्तीनौकांचे कमिशनिंग झाले. २४५० टनांच्या या नौकांवर १८ अधिकारी व १०८ जवान असतात आणि एचएएल ध्रुव हे स्वदेशी बनावटीचे हेलिकॉप्टर त्यावर तैनात असते. इंटिग्रेटेड प्लॅटफॉर्म मॅनेजमेन्ट सिस्टिम म्हणजेच कोणत्याही कक्षातून नौकेचा गाडा हाकण्याची तांत्रिक सुविधा आता या श्रेणीमध्ये आली आहे.

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link