Next
पूरग्रस्तांच्या मदतीला ‘युवा फोर्स’
प्रतिनिधी
Friday, September 06 | 04:00 PM
15 0 0
Share this story


महाराष्ट्रात आलेल्या पुराचा फटका कोल्हापूर, सांगली,  सातारा या परिसरात फार मोठ्या प्रमाणावर बसला आहे. सध्या बातम्यांमध्ये जास्त माहिती येत नसली तरीही पुरानंतर येणारी रोगराई आणि मोडलेली घरेदारे हे चित्र भयावह आहे. या पुरात अनेक लोकांनी आपले प्राण गमावले. अनेकांची घरे उद्ध्वस्त झाली; तर व्यवसाय, घरदार सारे काही वाहून गेले. या सर्व कुटुंबांचे पुनर्वसन करण्याची नितांत गरज अजूनही आहेच.  ही गरज ओळखून ‘झी युवा’वाहिनीने, पुढाकार घेत पूरग्रस्तांना मदतीचा हात देण्यासाठी युवा पिढीची मदत घेऊन ‘युवा फोर्स’ हा उपक्रम हाती घेतला. या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन केल्यानंतर  अवघ्या तीन दिवसांत दोन हजारांहून अधिक युवकांनी या उपक्रमात सहभागी होण्याची इच्छा व्यक्त केली. इच्छुकांमधून १०० युवा तरुण-तरुणींचा ‘युवा फोर्स’ तयार केला. ‘युवा फोर्स’मधील अनेक सदस्यांच्या घरी गणपतीची तयारी सुरू असूनही त्यांनी पूरग्रस्त भागात जाऊन काम करण्याला प्राधान्य दिले. त्यांच्या या कामाला लोणावळा येथील ‘मनशक्ती प्रयोग केंद्रा’ने मदत केली.
ऑगस्ट महिन्याचा शेवटच्या आठवड्यात सगळीकडे गणपतीची तयारी सुरू असताना हा ‘युवा फोर्स’ कोल्हापूरमधील कुरुंदवाड परिसरात मदतकार्य करत होता. नैसर्गिक आपत्तीच्या गर्तेत अडकलेल्या पश्चिम महाराष्ट्राच्या मदतीला उर्वरित महाराष्ट्र धावून गेला. राज्याच्या कानाकोपऱ्यातील अनेक सामाजिक संस्थांनी वस्तूंच्या स्वरूपात केलेली मदत या भागात पोहोचली होती. परंतु वस्तूंची मदत करण्यापेक्षा तिथे जाऊन तिथल्या नागरिकांना आवश्यक असलेली मदत करण्यावर ‘युवा फोर्स’चा भर होता. त्यामुळे तिथे जाऊन तिथे प्रामुख्याने कशा पद्धतीची मदत हवी आहे, याची पाहणी केली. त्यानंतर सर्वप्रथम या परिसरातील स्वच्छता व निर्जंतुकीकरणाच्या कामाला प्राधान्य दिले. तो या कामातील एक महत्त्वाचा टप्पा होता. त्याशिवाय प्रथमोपचार व आरोग्यकेंद्रांची स्थापना करून वैद्यकीय मदतीला प्रारंभही केला. आयुष्यभर पै न् पै जमा करून उभारलेले घर, जमवलेले संचित पुरामुळे डोळ्यांदेखत वाहून गेले. क्षणार्धात होत्याचे नव्हते झाल्यामुळे येथील नागरिकांचे मनोधैर्य खचले होते. या खचलेल्या मनांना उभारी देण्यासाठी त्यांच्याशी बोलून त्यांना मानसिक आधार देण्याचा प्रयत्न करण्यात आला. या नकारात्मक वातावरणात व मन:स्थितीत अडकून पडू नये, यासाठी त्यांचे मन रिझवण्यासाठी कार्यक्रम सादर केले.
या पुरामुळे लहान मुलांचे भावविश्वही ढवळले गेले. त्यामुळे त्यांना कोवळ्या मनात या आपत्तीच्या आठवणी राहू नयेत यासाठी ‘युवा फोर्स’चे सदस्य वेगवेगळे खेळ त्यांच्याशी खेळले. त्यांच्यासाठी काही कार्यक्रमही घेण्यात आले. लहान मुलांच्या आणि मोठ्या माणसांच्या मनावरील ताणतणाव हलका होत आयुष्य जगण्यास नवीन उमेद मिळण्यासाठी ‘युवा फोर्स’मधील सर्वच सदस्यांनी मनापासून काम केले. चाळीस वर्षांपासून नागरिकांच्या आयुष्यातील ताण दूर करत त्यांना मन:शांती मिळावी यासाठी काम करणाऱ्या ‘मनशक्ती प्रयोग केंद्रा’ने ‘युवा फोर्स’च्या या उपक्रमाला बहुमूल्य मदत केली. या केंद्रातील तज्ज्ञ शिक्षकांच्या मदतीने आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली ‘युवा फोर्स’मधील सदस्यांनी  हे काम केले. मुंबई, पुणे, सांगली येथून आलेल्या तरुणांनी दोन दिवस सातत्याने काम केले. वास्तविक फोर्समधील बहुतांश सदस्यांच्या घरी गणपतीची तयारी सुरू होती. परंतु त्यांनी या कामाला प्राधान्य दिले.
‘झी युवा’च्या या उपक्रमांमुळे कुरुंदवाड आणि सांगलीमधील लोकांच्या चेहऱ्यावरील हसू काहीअंशी का होईना परत आले आहे. अर्थात ‘युवा फोर्स’चे काम थांबलेले नाही. अजूनही बरेच काम बाकी असून ते ‘युवा फोर्स’ नक्कीच पूर्ण करेल.

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link