Next
मी नाटकात आले त्याची गोष्ट
मुक्ता बर्वे
Friday, August 02 | 03:00 PM
15 0 0
Share this story


नमस्कार, तुम्ही आज मला मुक्ता बर्वे म्हणून ओळखता. परंतु ही माझी आजची ओळख झाली. लहानपणी मला सगळे मास्टर निनादची बहीण म्हणून ओळखायचे. माझा भाऊ त्यावेळी बालकलाकार म्हणून नाटक, चित्रपट, मालिकांमधून काम करायचा. राज्य सरकारचा उत्कृष्ट बालकलाकाराचा पुरस्कारही त्याला मिळाला होता. त्यानं खूप मोठमोठ्या लोकांबरोबर कामं केलेली आहेत. त्यामुळे त्याची धाकटी बहीण हीच माझी ओळख होती.
भाऊ अभिनेता आणि आई शिक्षिका असल्यानं घरात पहिल्यापासूनच साहित्यिक वातावरण होतं. बाबांनाही वाचनाची खूप आवड, त्यामुळे घरात चांगली चांगली पुस्तकं आणून वाचली जायची. आई बालनाट्यंही लिहायची. अशा वातावरणात मी मोठी होत होते, मात्र मी अभिनय वगैरे करेन असं आई-बाबांना आणि मलाही कधी वाटलं नव्हतं. शाळेत मी एकदम लाजाळू, मागे-मागे राहणारी, फारसे मित्र-मैत्रिणी नसणारी, अबोल, शांत मुलगी होते. अभिनयाच्या क्षेत्रात मला गती असेल, असं कुणालाच वाटलं नव्हतं. परंतु घरात याच्या एकदम विरुद्ध! म्हणजे बाहेर शांत आणि घरात वाघ होते. घरात माझाच आवाज जास्त असायचा. भावावर दादागिरी करणं, आजी-आजोबा, आई-बाबांसमोर आगाऊपणा करणं हे सगळं मला बरोबर जमायचं. पण बाहेर गेले की मी गप्प! त्यामुळे आईनं विचार केला की हिला जरा मित्र-मैत्रिणी मिळाव्यात, तिच्या वयाच्या मुला-मुलींमध्ये मिसळावं म्हणून मग आईनंच एक बालनाट्य लिहिलं आणि त्यात मी पहिल्यांदा काम केलं. भित्रा ससा आणि परीराणी अशी पात्रं होती त्यात. लहान मुलांनी चिडू नये, शहाण्यासारखं वागावं अशा काही गोष्टी त्यातून सांगितल्या होत्या. ते नाटक मला आवडल्याचं आई-बाबांच्या लक्षात आलं. त्यांनी शाळेतील वक्तृत्वस्पर्धा, संस्कृत नाटकं अशा छोट्या छोट्या गोष्टींमध्ये भाग घ्यायला मला प्रोत्साहन द्यायला सुरुवात केली. माझा अभ्यासाचा काहीच प्रश्न नव्हता. अभ्यास, शाळा या गोष्टी मला आवडीच्या असल्यानं अभ्यासात मी पुढे असायचे. आई-बाबांना त्याची चिंता नव्हती. तरीही नाटक हा माझा प्रांत नव्हता. त्याची सुरुवात झाली ती दहावीनंतर.
दहावीच्या परीक्षेनंतर मिळालेल्या सुट्टीत मी एका नाटकात काम केलं.  बाबा तेव्हा ‘टेल्को’ कंपनीत होते. त्यांच्या कंपनीतील हौशी कलाकार राज्य नाट्यस्पर्धेसाठी रत्नाकर मतकरींचं ‘घर तिघांचं हवं’ नाटक बसवत होते. माझी सुट्टी चालू होती म्हणून त्यांनी आईला विचारलं, “मुक्ताला घेऊ का नाटकात?” आई म्हणाली, “घेऊन बघा. आवडलं तर करेल.” असं म्हणून मी त्या नाटकाच्या तालमीला जाऊ लागले. नाटक चांगलं झालं, प्रमाणपत्र वगैरे मिळालं. मी फार मनापासून काम केलं, त्या नाटकात आणि इथे मला पहिल्यांदा नाटक आवडलं. काम करताना मजा येत होती. त्या नाटकानंतर मी जास्त आनंदी, उत्साही दिसत आहे आणि आत्मविश्वासानं वावरत आहे, असं आई-बाबा आणि खासकरून दादाला जाणवलं. दहावीनंतरचा तो काळ होता. तेव्हा आपलं करिअरबाबत ठरतही असतं. नाटकात बक्षीस मिळाल्यामुळे, कौतुक झाल्यामुळे आता हेच करायचं हे माझं नक्की झालं! मग दादानं मला विचारलं “तुला हे शिकायला आवडेल का?” त्यानं लहानपणी खूप भूमिका केल्या होत्या. पण त्याला त्या क्षेत्रात फारसा रस वाटला नाही, त्यामुळे तो कमर्शियल आर्टकडे वळला. कुणी काय करावं, शिकावं याबाबत घरून आम्हाला पूर्ण स्वातंत्र्य होतंच. दादानं मला या क्षेत्राबद्दल विचारलं, तेव्हा मी म्हटलं, की हो मला आवडेल शिकायला! आणि मग माझा पुढचा मार्ग ठरला तो म्हणजे बारावीनंतर पुणे विद्यापीठाच्या ललित कलाकेंद्रातून याच विषयात पुढचं शिक्षण घ्यायचं. मग एसपी कॉलेजला आर्ट्सला प्रवेश घेतला. भाषांची मला आवड होतीच. आई भाषाशिक्षिका असल्यामुळे ते संस्कार पहिल्यापासून होतेच. बारावीनंतर मी ललित कलाकेंद्रात गेले आणि माझी दिशा ठरली. ज्येष्ठ कलावंत सतीश आळेकरसर तिथे भेटले. अर्थात ही अठरा वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. तेव्हा आतासारख्या वाहिन्या किंवा इतर माध्यमांचा सुळसुळाट नव्हता. करिअर म्हणजे नेमकं काय करणार या क्षेत्रात, याची आई-बाबांनाही कल्पना नव्हती. मला त्यावेळी शंभर टक्के नाटकच करायचं होतं. चित्रपट, मालिका हे पर्यायच माझ्या डोक्यात नव्हते. नाटकात चांगली अभिनेत्री व्हायचं इतकंच डोक्यात होतं.
ललित कलाकेंद्राच्या त्या तीन वर्षांमध्ये पहिलं दीड वर्ष तर मी बॅकस्टेज, कपडेपट हेच करत होते. त्यात काही वेळेस माझी चिडचिडही व्हायची. आईनं मला सांगितलं होतं, “तुला सगळं शिकावं लागेल. लगेच तुला स्टेजवर उभं राहायला मिळेल असं होणार नाही.” त्या दीड वर्षात मला त्या विषयाची गती आणि गोडी लागली. प्रकाशयोजना, कपडेपट, बाहेरच्या रंगभूमीवर काय चालू आहे, असा सर्वंकष अभ्यास होऊ लागला. सतीश आळेकरांसारखा गुरू असल्यामुळे नाट्यशास्त्राचा चौरस आहार आम्हाला मिळत होता. त्या वयात कळत नव्हतं, पण तेव्हा खूप  मोठी माणसं भेटत होती. मी तर म्हणते की तेव्हा फार कळत नव्हतं ते बरं होतं. कारण त्यामुळे कोणतेही प्रश्न कोणतीही भीड न बाळगता आम्ही विचारायचो. विजय केंकरे, भक्ती बर्वे, विजया मेहता या व्यक्तींचं मोठेपण कळण्याची तेव्हा कुवत नव्हती. या लोकांबरोबर चहा, गप्पा म्हणजे पर्वणी असायची. त्या गप्पांमधून किती काय काय मेंदूत शिरलं याची आज कल्पना करू शकते. परंतु त्यावेळी उभे-आडवे प्रश्न विचारत, कुतूहल शमेपर्यंत गप्पा मारत आमची ती तीन वर्षं पूर्ण झाली आणि मला खऱ्याअर्थी नाटकाची ‘सिरीयसली’ गोडी लागली ती कायमचीच. तीच माझी सुरुवात होती. तिथून बाहेर पडल्यावर मला पहिलं व्यावसायिक नाटक मिळालं ते ‘आम्हाला वेगळं व्हायचंय.’ योगायोग असा की ज्या रत्नाकर मतकरींच्या नाटकामुळे, आपल्याला नाटक आवडतंय, हे मला पहिल्यांदा कळलं, त्याच मतकरींचं पहिलं नाटक मला मिळालं. दिग्दर्शक मंगेश कदम यांनी मला त्या नाटकासाठी बोलावलं आणि ते माझं पहिलं नाटक. मी त्या कामाला अजिबात स्ट्रगल वगैरे म्हणणार नाही, कारण ग्रॅज्युएशनची परीक्षा झाल्यावर मी मुंबईत हॉस्टेलवर राहायला आले आणि दीड आठवड्यात मला पहिलं काम मिळालंसुद्धा. ते वर्ष होतं २००१. माझं दुसरं व्यावसायिक नाटक संपलं आणि मला टीव्ही मालिका मिळाली. हेच ते वळण होतं जिथे रंगभूमी आणि छोटा पडदा या दोन्ही गोष्टी समांतर जाऊ लागल्या. त्या कशा आणि कोणत्या याबद्दल वाचा पुढच्या भागात.

(शब्दांकन : मनीषा नित्सुरे-जोशी)
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link