Next
गोंडस लाल पांडा
अतुल साठे
Monday, March 25 | 05:00 PM
15 0 0
Share this story


रुडयार्ड किपलिंगच्या ‘जंगल बुक’मध्ये किची अशा नावाने संबोधला जाणारा एक गोंडस प्राणी झाडांच्या फांद्यांवरून सरसर पळताना आपण पाहिला आहे. मध्येच तो मोगलीच्या खांद्यावर येऊन बसायचा व गोड आवाजात काहीतरी सांगायचा. तसेच कुंगफु पांडा या कार्टून चित्रपटमालिकेतसुद्धा हाच प्राणी होता. हा सुंदर बाळसेदार जीव म्हणजे लाल पांडा. ‘वर्ल्डवाइड फंड फॉर नेचर’चे बोधचिन्ह असलेला थोरला पांडा बहुतांश लोकांच्या ओळखीचा आहे, मात्र त्याच्याशी केवळ नावसाधर्म्य असलेला आणि दूर हिमालयात व त्या पलीकडच्या प्रदेशांत राहत असलेला लाल पांडा फारसा परिचित नाही.
ऐलुरूस फुल्गेंस असे शास्त्रीय नाव असलेला हा प्राणी लेसर/रेड पांडा किंवा कॅट-बेअर (इंग्रजी), सक नाम (लेपचा), भालू-बिरालो, निगालया पोनया किंवा हब्रे (नेपाळी), वा डोंका (शेरपा), होपतोंगर (तिबेटी), ओकडोंगा (भोतिया), व झियोझियोंगमाओ (चिनी) अशा विविध नावांनी ओळखला जातो. ही प्रदेशनिष्ठ प्रजाती २,००० ते ४,८०० मीटर उंचीवरील जुनी झाडे असलेल्या समशीतोष्ण, सुचीपर्णी व बांबूच्या जंगलांत आढळते. त्याच्या दोन उपजाती आहेत. तापमानवाढ सहन होत नसल्याने साधारणत: १० ते २५ डिग्री सेल्सियस तापमान असलेल्या प्रदेशात लाल पांडा सापडतो. भारतात पूर्व हिमालयात सिक्कीम व अरुणाचल, तसेच आसाम, पश्चिम बंगाल व मेघालयचे काही भाग, भूतान व नेपाळमध्ये एक उपजात सापडते; तर म्यानमारचा उत्तरेकडील पर्वतीय प्रदेश व चीनच्या नैऋत्येकडील भागांत (सिचुआन, युनान व तिबेटचा काही भाग) दुसरी उपजात सापडते. चीनच्या अन्य काही प्रांतांतून ही उपजात आता नष्ट झाली आहे. दोन्ही उपजातींचा आढळप्रदेश एकसंध नसून तुकड्यातुकड्यांत विभागलेला आहे. भारतातील कांचनझोंगा, नामदाफा व सिंगालीला अभयारण्ये आणि पांगचेन स्थानिक वनात लाल पांडा दिसू शकतो. लाल पांडा हा सिक्कीमचा राज्यप्राणी आहे.

रूप मनोहर
पाठ, डोके व दोन्ही बाजूंना तांबूस तपकिरी रंग, शेपटीवर केशरी तपकिरी रंगाचे पट्टे, पाय व पोट काळपट तपकिरी आणि कान, नाकावरील भाग व गाल मात्र पांढरे, अशी मनोहारी रंगसंगती असलेला हा गुबगुबीत शरीराचा प्राणी निरागस दिसतो आणि दुडक्या चालीने चालतो. गोलवा असलेले डोके, डोळ्यांपासून जबड्यापर्यंत तांबूस पट्टे आणि त्रिकोणी कान ही वैशिष्ट्ये उठून दिसतात. जाड केसाळ शेपटीचा उपयोग फांद्यांवर फिरताना तोल सांभाळण्यासाठी आणि मजबूत, तीक्ष्ण व टोकदार नखांचा उपयोग चांगली पकड घेण्यासाठी होतो. शरीराच्या एकंदर रंगांमुळे तो झाडाच्या खोडावर पटकन दिसून येत नाही. शरीरावरील लांब केसांचा उपयोग थंडीपासून बचाव करण्यासाठी होतो. आकाराने पाळीव मांजराएवढा असणारा लाल पांडा वजनाने जास्त असतो- नर ४-५ किलो वजनाचा तर मादी ३-५ किलोची!  ‘बुक ऑफ इंडियन अॅनिमल्स’ या संदर्भग्रंथानुसार पांडांच्या शरीराची लांबी साधारण दोन फूट, तर शेपटीची लांबी सरासरी १६ इंच असते.

आहार व सवयी
जास्त वेळ झाडावर राहणारा व अधून-मधून जमिनीवर वावरणारा लाल पांडा मिश्रआहारी आहे. तो बांबूचे कोंब व पाती, अन्य गवत, अळंबी, मुळे, फुले, काही फळे, लहान प्राणी, मासे, पक्षी व त्यांची अंडी, अळ्या आणि कीटक असे खाद्य खातो. प्राणिसंग्रहालयातील लाल पांडांना गोड पदार्थ आवडत असल्याच्या नोंदी आहेत. प्रत्येक लाल पांडाचा अन्नाच्या शोधात फिरण्यासाठी स्वतःचा असा एक प्रदेश असतो. मुख्यत्वे एकट्याने राहणारा हा प्राणी संध्याकाळी, रात्री व पहाटे संचार करतो. दिवसा तो उंचावरील फांद्यांवर किंवा ढोलीत आराम करतो. थंडीत तो पाय व शेपटी शरीराजवळ घेऊन झोपतो, तर उन्हाळ्यात तो पाय फांदीवरून खाली लटकत ठेवून झोपतो. चिवचिवाट, शिट्ट्या व अन्य प्रकारचे आवाज तो काढू शकतो. झाडाच्या ढोलीत किंवा कपारीत पाने, गवत व काटक्या वापरून एकाहून अधिक घरटी बांधली जातात व पिल्लांना अधून-मधून एका घरट्यातून दुसऱ्यात हलवले जाते. मांजराप्रमाणेच हा चाटून व घासून आपले अंग साफ करतो. हिमबिबट्या, पाणमांजर व मार्टिन यांसारखे प्राणी हे लाल पांडाचे मुख्य भक्षक आहेत. धोका जाणवल्यास तो पळून जातो. पळता नाही आले तर मागील पायांवर उभा राहून पंजे व नखांनी प्रतिकार करण्याचा प्रयत्न करतो. अशाप्रकारे उभा राहिल्याने तो मोठा दिसतो, त्यामुळे शत्रू माघार घेण्याची शक्यता वाढते. तणावाखाली असताना तो खालच्या बाजूच्या त्वचेतील ग्रंथींमधून तीव्र वास बाहेर टाकतो. वासाचा उपयोग जसा भक्षकांना दूर ठेवण्यासाठी केला जातो, तसेच दुसऱ्या लाल पांडाला आकर्षित करायलासुद्धा होत असावा.
‘इंटरनॅशनल युनियन फॉर कॉन्झर्व्हेशन ऑफ नेचर’ने लाल पांडाला ‘संकटग्रस्त’ म्हणून घोषित केले आहे. दुर्गम भागांत असूनही विविध कारणांमुळे जंगले नष्ट होत असल्याने त्याचा अधिवास कमी होत आहे. त्याची शिकार होतो व पाळीव प्राणी म्हणून पिंजऱ्यात ठेवण्यासाठीसुद्धा तो पकडला जातो. मुळात प्राणी कितीही गोंडस किंवा आकर्षक असला तरी त्याचे खरे सौंदर्य त्याला नैसर्गिक अधिवासात स्वैर संचार करताना पाहण्यातच असते. ‘सॉफ्ट टॉय’सारख्या दिसणाऱ्या लाल पांडाला बघायचे असल्यास निसर्गपर्यटक म्हणून त्याच्यापर्यंत जाण्यातच खरी मजा आहे.

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link