Next
आणि कृष्ण मोठा झाला
स्वप्निल जोशी
Friday, June 14 | 02:00 PM
15 0 0
Share this story

नमस्कार,  माझ्या पहिल्या लेखाला भरभरून प्रतिसाद दिल्याबद्दल मनापासून आभार. तुमच्या प्रतिक्रिया पाहून खूप छान वाटलं. मागच्या भागात मी छोट्या पडद्यावरील माझ्या एंट्रीची कहाणी सांगितली. आता पुढे... उत्तर रामायणात कुशची भूमिका संपल्यानंतर शाळा, अभ्यास वगैरे नियमित सुरू झालं. पुढची काही वर्षं मी अभ्यासावर लक्ष केंद्रित केलं.  पाच-सहा  वर्षांनी मला पुन्हा रामानंद सागरांच्या ऑफिसमधून फोन आला - ‘कृष्णा’ मालिकेसाठी.  

रामानंद सागरांची ‘कृष्णा’ मालिका दूरदर्शनवर सुरू झालेली होती. आता त्यांना किशोरवयीन कृष्ण उभा करायचा होता. मी तेव्हा नेमका त्याच वयात होतो. दोन-चार चाचण्यांनतर माझी निवड झाली.  माझी भूमिका पंधरा भागांपर्यंत चालणार होती आणि मग दुसरा कृष्ण (मोठा) असेल, असं मला सांगण्यात आलं होतं. ही गणितं नंतर पार बदलली आणि मी सुमारे सव्वाशे भाग केले. आधी मी जिथे अडीच-तीन महिनेच काम करणार होतो, ते वाढत वाढत दोन वर्षांपर्यंत गेलं. मालिकेत कृष्ण मोठा होत होता तसाच मीही मोठा दिसू लागलो होतो. तेव्हा मालिकांचे डेलीसोप नसायचे. आठवड्यातून एक भाग प्रदर्शित व्हायचा. मीही त्या त्या वयात तसा तसा दिसत गेलो, त्यामुळे लोकांना मी आवडत गेलो. मालिका सुपरहिट होऊ लागली. रामानंद सागर यांचं आणि माझं तर आजोबा-नातवासारखं नातं जुळल. ते मला प्रभूजी म्हणायचे. ते म्हणायचे, मी तुला देव मानला नाही तर जग कसं मानेल?

मी एकदा आई-बाबांना म्हटलं, ‘मला  आता कंटाळा आलाय कृष्णाची भूमिका करण्याचा.’  मी तेव्हा सोळा वर्षांचा होतो. मालिका नंबर एकवर असताना, देशातल्या सगळ्या बालकलाकारांच्या तुलनेत मला भरपूर मानधन मिळत असताना माझ्या मनात आलं, आपण इथे थांबलं पाहिजे!  बरं, रामानंद सागर यांना हे सांगायचं कसं! पण शेवटी त्यांना जाऊन भेटलोच. तेव्हा मी त्यांच्याशी हे सगळं कसं  बोललो असेन, याचं आज मला खूप आश्चर्य वाटतं.! परंतु  त्यांचं आणि माझं नातंच वेगळं होतं. ‘आता ही भूमिका करताना मला कंटाळा येऊ लागलाय’ असं मी त्यांना सांगितलं. त्यावर ते म्हणाले, ‘तुला  कामाचा कंटाळा आला आहे?’ मी म्हणालो, “पापाजी, कामाचा नाही, पण भूमिकेचा कंटाळा आलाय” त्यावर त्यांनी मला पंधरा दिवसांची सुट्टी दिली आणि म्हणाले तू सुट्टीवरून परत आलास की आपण बोलू.” पंधरा दिवसांनी त्यांनी मला आपणहून विचारलं की , ‘प्रभूजी, क्या खयाल है, मजा आ रहा है या नहीं?’ त्यावर मी नम्रपणे म्हणालो की, नाही. मला खरंच इथे थांबावंस वाटतंय.’ त्यावर ते म्हणाले की, फिर हमें  रुकना चाहिये.’  मग त्यांनी पुढच्या दीड महिन्यात कृष्ण बदलला आणि मालिकेत मोठा कृष्ण दाखल झाला. रामानंद सागर हा तर माणूसच मोठा.  मी निघताना ते मला म्हणाले, “ आपकी मूंह से भगवान बोलता है. आप और एक साल तक ये रोल करते तो आपका करिअर खत्म हो जाता.” कारण नंतर मला दुसऱ्या भूमिकांमध्ये कुणी स्वीकारलंच नसतं.  रामायण, महाभारत, कृष्णासारख्या पौराणिक मालिकांमध्ये काम केलेल्या कलाकारांना नंतर इतर भूमिकांमध्ये प्रेक्षकांनी स्वीकारलं नाही. पौराणिक मालिकांमधला मी एकमेव कलाकार ठरलो जो त्या इतर भूमिकांमध्येही यशस्वी झालो. याचं पापाजींनाही खूप कौतुक वाटायचं. देवानंच माझ्याकडून ते करवून घेतलं आणि योग्यवेळी मला बाहेर पडण्याची हिंमत दिली. त्यानंतर दोन वर्षं मी काही केलं नाही. शूटिंगचाच कंटाळा आला होता. 

दोन वर्षानंतर संजीव भट्टाचार्य यांची ‘कॅम्पस’  मालिका मला मिळाली. शेवटच्या काही भागांमध्ये नवीन पात्र आणून मालिका त्यांना संपवायची होती. त्या पात्राचं नाव कृष्णा होतं. म्हणून त्यांना माझी आठवण आली. त्यांना माझं वागणं, बोलणं आणि स्वभाव इतका आवडला की तीन महिन्यानंतर त्यांनी ‘अमानत’ नावाची मालिका झी टीव्हीसाठी आणली. वहिनी आणि तिला मुलासमान असणारा दीर यांच्यातील  नात्यावर ती मालिका होती. त्यातील गोंडस दिराच्या पात्रासाठी त्यांनी मला निवडलं. तिथून खऱ्याअर्थी माझी पौराणिक भूमिकांच्या पलीकडील वास्तववादी, सामाजिक भूमिकांची  सुरुवात झाली.  

 ‘अमानत’ नंतर मी सोनी वाहिनीवर ‘दिल विल प्यार व्यार’ नावाचा शो केला. ‘गुलाम ए मुस्तफा’ नावाचा हिंदी सिनेमा केला. ‘अग्निसाक्षी’ या गाजलेल्या चित्रपटाचे दिग्दर्शक पार्थ घोष हे ‘कृष्णा’ मालिकेचे जबरदस्त चाहते होते. त्यांना ‘गुलाम ए मुस्तफा’ साठी एक मुलगा हवा होता म्हणून त्यांनी मला बोलावून घेतलं. त्या सेटवर ज्येष्ठ अभिनेत्री अरुणा इराणींशी माझी ओळख झाली. त्या माझ्या आईच्या भूमिकेत होत्या. त्यांनाही माझं वागणं-बोलणं आवडलं. चार-पाच महिन्यांनंतर मी एका ठिकाणी शूटिंग करत होतो, तिथे मला त्यांची गाडी दिसली म्हणून मी त्यांना भेटायला गेलो तर त्या म्हणाल्या, “ अरे कुठे आहेस तू, मी तुलाच शोधतेय. तुला माझ्याबरोबर एका मालिकेत काम करायचंय आणि त्यासाठी पुढच्याच आठवड्यात आपल्याला लंडनला जायचंय. तुझ्याकडे पासपोर्ट आहे ना !’ त्यांच्या बोलण्यानं मी चकित झालो. ती मालिका म्हणजेच स्टार प्लसची परदेशात चित्रीकरण झालेली सुपरहिट मालिका ‘देस मे निकला होगा चाँद’ .  त्या मालिकेसाठी नायक-नायिका ठरले होते, फक्त सहाय्यक अभिनेता त्यांना मिळाला नव्हता. त्यासाठी अरुणा इराणी यांना माझं नाव सुचलं. मी भेटलो आणि त्यांचं काम झालं. त्यांना हवा तसा चेहरा मिळाला आणि खरंच पाचव्या दिवशी आम्ही लंडनला रवाना झालो. स्टार प्लसनं मला आणखी दोन मालिका ऑफर केल्या - ‘कहता है दिल’ आणि ‘भाभी.’ तिन्ही मालिकांमध्ये मी मुख्य भूमिका करत होतो. एक कलाकार आठवड्यातील तीन मालिकांमध्ये मुख्य भूमिका करतोय हे स्टार प्लस वाहिनीच्या इतिहासातही पहिल्यांदा घडत होतं. तेव्हा बालाजी टेलिफिल्म्स खूप काम करत होते. त्यांच्या मालिकेत नाही म्हणजे कलाकार बेरोजगार बसून आहे अशी तेव्हा लोकांची धारणा होती. परंतु मी त्याला अपवाद ठरलो. बालाजी टेलिफिल्म्सची एकही मालिका न करताही मी एकाचवेळी तीन मालिकांमध्ये झळकत होतो. पुढे मराठी मालिकाविश्वात पदार्पण कसं झालं ते पुढच्या भागात . 
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link