Next
नोकरी, लग्न आणि नाटक
पुष्कर श्रोत्री
Saturday, May 25 | 09:00 AM
15 0 0
Share this story

नमस्कार, मागच्या भागात डहाणूकर कॉलेजमधील त्या अविस्मरणीय दिवसांबद्दल बोललो होतो. ‘हसतखेळत’ हे पहिलं व्यावसायिक नाटक मिळालं आणि अभिनेता म्हणून व्यावसायिक रंगभूमीवरचा प्रवास सुरू झाला. माझ्या सुदैवानं या प्रवासाच्या सुरुवातीपासूनच खूप ग्रेट माणसं भेटत गेली. पहिल्या नाटकात मला अशोक सराफ यांच्याबरोबर काम करायला मिळालं, तर त्यापुढच्या ‘संध्याछाया’ नाटकात दिलीप प्रभावळकर आणि वंदना गुप्ते यांच्याबरोबर काम करायला मिळालं. ‘तरुण तुर्क म्हातारे अर्क’ नाटकात मोहन जोशी, अतुल परचुरे, सुनील तावडे आणि दस्तुरखुद्ध मधुकर तोरडमल यांच्याबरोबर काम करण्याची संधी मिळाली, तर ‘घर श्रीमंताचं‘ नाटकात सुधीर जोशी व आशा काळे यांच्यासोबत काम करायला मिळालं. त्यानंतर ‘बॅरिस्टर’ नाटकात विक्रम गोखले, चंद्रकांत गोखले, शरद पोंक्षे, सुहास परांजपे, राहुल मेहेंदळे यांच्याबरोबर काम केलं. माझ्यासाठी हा सगळा शिकण्याचा काळ होता. मी टीपकागद झालो आणि या मोठ्या लोकांकडून मिळणारी प्रत्येक शिकवण टिपत गेलो. नाटकाकडे बघण्याचा माझा दृष्टिकोन अधिक व्यापक होत गेला. या क्षेत्रात तुम्ही ज्ञान कसं मिळवताय आणि मिळालेलं ज्ञान कसं आत्मसात करता हे तुमच्या क्षमतेवर ठरतं. प्रत्येक गोष्टीकडे, प्रत्येक सीनकडे पाहताना दोन ओळींच्या मध्ये लेखकाला काय म्हणायचं आहे याचा शोध घ्यायला मी शिकलो. माझा सीन नसेल तेव्हा मी कधीही मेकअप रूममध्ये बसून राहायचो नाही, तर विंगेतून इतर कलाकारांचं निरीक्षण करायचो. ‘हसतखेळत’ नाटकाच्या वेळी मी अशोक सराफांना न्याहाळायचो. ते असं काय करतात, की ज्यामुळे प्रेक्षकांना हसू  येतं हे समजून घेण्याचा प्रयत्न करायचो. ते कसं काम करताहेत हे पाहत पाहत मी त्यांना ‘फॉलो’ करायला सुरुवात केली. एक शिस्तबद्ध नट असणं म्हणजे काय हे मी त्यांच्याकडून शिकलो. तिकीट काढून आलेल्या प्रेक्षकांचं समाधान करण्याकडे या कलाकारांचं लक्ष असायचं. जो तिकीट काढून माझं काम बघायला आला आहे, त्याला निराश करायचं नाही, हे  तत्त्व असायचं.
मी तेव्हा युनायटेड वेस्टर्न बँकेत नोकरी करत होतो. विलेपार्ले ब्रांचमध्ये होतो. प्रयोगासाठी मला सुट्ट्या मिळायच्या. त्या दरम्यान इंटरनॅशनल बँकांचा भारतात उदय होत होता. त्यामुळे बँकिंगचं क्षेत्र झपाट्यानं बदलत गेलं. कलाकार कोटा, खेळाडू कोटा बंद व्हायला लागले. प्रत्येकवेळी मला प्रयोगाला जायला परवानगी देणं बँकेच्या व्यवस्थापकांनाही कठीण जाऊ लागलं. वरून तशा ऑर्डर येऊ लागल्या. एकदा मला दुपारच्या प्रयोगाला जायचं होतं. परंतु सकाळी बँकेत पोहोचताच बँकेच्या व्यवस्थापकांनी परवानगी देण्यास असहमती दर्शवली, कारण तशा ऑर्डर्स आल्या होत्या. मी त्यावेळी त्यांना काही बोललो नाही. ब्रांच पार्ल्यातच असल्यामुळे दुपारी जेवायला घरी जायचो. त्यादिवशीही लंच टाइममध्ये घरी गेलो आणि घरून बँकेत फोन लावला व आवाज बदलून “मी मंत्रालयातून बोलत आहे. पुष्कर श्रोत्री यांना ताबडतोब सांस्कृतिक मंत्र्यांनी भेटायला बोलावलं आहे. त्यांना फोन द्या.” असं फोनवर सांगितलं. पलीकडच्या व्यक्तीनं ‘ते जेवायला घरी गेले आहेत. आले की त्यांना निरोप देतो.’ असं सांगून फोन ठेवला. जेवण आटोपून ‘मला जणू काही माहीतीच नाही’ अशा आविर्भावात पुन्हा ऑफिसमध्ये गेलो आणि काम करू लागलो. मला पाहताच व्यवस्थापक म्हणाले, “अरे, तुला सांस्कृतिक मंत्र्यांनी तातडीनं भेटायला बोलावलं आहे. तू निघ लगेच.” असं करून मी प्रयोगाला गेलो आणि प्रयोग केला. आता नोकरी करून प्रयोग करणं कठीण आहे हे मी ओळखलं. त्याचवेळी सख्ख्या आत्तेभावानं मला त्याच्या ‘मनी मॅनेजर्स इंडिया लिमिटेड’ या  कंपनीत काम करण्याची ऑफर दिली.  बँकेची गृहकर्ज, क्रेडिट कार्ड्स विकायची होती. त्यासाठी मला महिन्याचं एक टार्गेट दिलं जाणार होतं. मी ती ऑफर स्वीकारली, कारण तिथे मला ऑफिसमध्ये अमुक एवढे तास बसण्याची सक्ती नव्हती. महिन्याचं टार्गेट पूर्ण करणं हीच एक अट होती. डॉक्टर, अभियंते, वकील, सीए यांच्यासाठी ते गृहकर्ज होतं. मग मी प्रयोगादरम्यान हे काम करायचो आणि महिन्याचं टार्गेट पूर्ण करायचो. हे काम इतकं चांगलं जमलं की मी कंपनीत एक-दोनदा नव्हे तर अनेकवेळा ‘स्टार ऑफ दि मंथ’ ठरलो. कधी ओव्हर टाइम करून, कधी शनिवार-रविवार लोकांच्या घरी जाऊन महिन्याचा कोटा मी पूर्ण करायचो. मेहनतीला माझा कधी ‘ना’ नसायचा. जर एखाद्या व्यक्तीनं रात्री भेटायला बोलावलं तर मी प्रयोग संपवून पुन्हा ऑफिसच्या कपड्यांमध्ये रात्री लोकांच्या घरी जाऊन गृहकर्जाची माहिती द्यायचो. हा काळ होता १९९७-९८ चा. दरम्यान माझ्या प्रयोगांची संख्याही वाढू लागली होती. दूरदर्शनवर ‘दामिनी’ मालिकेतही काम करत होतो. यात माझी खूप धावपळ होत होती. दोन दगडांवर पाय ठेवले होते. अखेर जुलै १९९८ मध्ये मी नोकरी सोडून पूर्णवेळ नाटकासाठी रुजू झालो. घरच्यांनीही नाटकात जायला मला प्रोत्साहन दिलं त्यामुळे मी सगळं लक्ष नाटकावर केंद्रित करू शकलो.
याचं काळात आणखी एक वळण आलं ते म्हणजे लग्नाचं. बँकेत मी ज्या डेस्कवर बसून काम करायचो तो डेस्क नंतर एका मुलीला देण्यात आला. त्या डेस्कच्या खणात माझी एक डायरी राहिली होती व ती मला हवी होती म्हणून मी त्या डेस्कवर फोन केला. तो रुफिना अॅन्थोनी नावाच्या मुलीनं उचलला. तिला मी त्या डायरीबद्दल सांगितलं. त्याआधीही कामाच्या निमित्तानं आमचं एकदा बोलणं झालं होतं. त्यामुळे एकमेकांना थोडंफार ओळखत होतो. मग डायरी घेण्याच्या निमित्तानं भेटायचं आम्ही ठरवलं. परत एकदा कामानिमित्त भेटायचं ठरलं. दुसऱ्यावेळी ती म्हणाली, ‘आज मला जास्त वेळ थांबता येणार नाही कारण मला पाहायला मुलगा येणार आहे.’ त्यावर मी म्हटलं की, ‘अरे वा! तुझं लग्न ठरलं तर मला सांग कारण मी आतापर्यंत ख्रिश्चन लग्नाला कधी गेलो नाहीये.’ त्यावर ती म्हणाली, ‘तुझं लग्न ठरलं की तुही मला सांग. मला तुमच्या पद्धतीचं लग्न पाहायचं आहे, मला तुमचा मसालेभात खूप आवडतो.’ मग मी तिला थेट विचारलं की, ‘यापेक्षा आपणच एकमेकांशी लग्न केलं तर?’ त्या वळणावर लग्नाची गोष्ट पक्की झाली आणि आयुष्यात करिअरच्या बरोबरीनंच हा एक नवा अध्याय सुरू झाला.
या प्रवासात आणखी एक ग्रेट व्यक्ती सतत माझ्याबरोबर होती ती म्हणजे ज्येष्ठ अभिनेते सुधीर जोशी. त्यांची मला आजही पदोपदी आठवण येते. माझ्या लग्नात सही करायला ते आवर्जून हजर होते. आमचा बाप-लेकासारखा ऋणानुबंध जुळला होता. माझ्यासाठी ते खूप काही होते. सुधीरकाका खूप लवकर गेले याचं आजही वाईट वाटतं. त्यांच्याकडून जे शिकायला मिळालं त्याची शिदोरी कायम माझ्याबरोबर असेल. सुरुवातीला लोक मला ‘दामिनी’ मालिकेतील ‘माँन्टी’ म्हणून ओळखायचे. ही ओळख नंतर बदलत गेली व लोक मला अभिनेता पुष्कर श्रोत्री म्हणून नावानं ओळखू लागले. आता माझी जबाबदारी अधिकच वाढली होती. वर उल्लेख केलेल्या दिग्गज कलाकारांकडून एकेक गोष्टी मी शिकत शिकत मी पुढची वाटचाल कशी केली, त्याबद्दल पुढच्या भागात.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link