Next
बारिश
प्रदीप निफाडकर
Friday, June 07 | 04:15 PM
15 0 0
Share this story

एक शेर गालिबचाचांच्या नावे सांगितला जातो, तो त्यांचा नाही, पण आहे छान. तो असा आहे-

ऐ बारिश इतना न बरस, जरा थम के बरस, कि वो आ सके
वो आने के बाद, इतना बरस, जरा जम के बरस, कि वो जा न सके

 आपल्या प्रिय व्यक्तीची वाट पाहताना पावसाला विनंती करणारा शायर, ती व्यक्ती आल्यानंतर कसा वाग हेही सांगतो. खरेच तसे घडावे. कुणाचीही प्रिय व्यक्ती भेटल्यानंतर पावसाने तसेच वागावे, अशीच आपलीही इच्छा असते. तसा पाऊस वागताना कतील शिफाईंना प्रत्येक थेंब असा काही वाटतो की-

गुनगुनाती हुई आती है फलक से बूँदें
कोई बदली तेरे पाजेब से टकराई है

जणू थेंबन् थेंब गुणगुणत येत आहे. बहुधा एखाद्या मेघाची आणि प्रेयसीच्या पैंजणांची टक्कर झाली असावी, त्याशिवाय असे होणार नाही. कतीलजींना प्रत्येक पावसात असेच काही वाटायचे. एकदा ते म्हणाले-

धुप सा रंग है और खुद है वो छाँवो जैसा
उसकी पायल में बरसात का मौसम छनके

तिचा रंग म्हणजे अगदी कोवळ्या उन्हासारखा. ती माझी प्रेयसी साक्षात सावलीसारखी आहे. तिच्या पैंजणांमध्ये पावसाचा मोसम गाळून येतोय. किती सुंदर कल्पना आहे ना? पाऊस आल्यावर काय करायचे हे शह़जाद अहमद सांगतात-

अभी तो खुश्क़ है मौसम,बारिश हो तो सोचेंगे
हमें अपने अरमानों को किस मिट्टी में बोना है

आता तर कोरडे वातावरण आहे. आपल्या इच्छांना कोणत्या मातीत टाकायचे, रुजवायचे त्याचा नंतर पाऊस आल्यावर विचार करू. मोहम्मद अल्वी यांनाही प्रतीक्षा आहे, पहिल्या पावसाची. उन्हाने त्यांच्याकडे एक मागणी केली आहे. मागणी तरी कसली पाहा-

धूप ने गुज़ारिश की
एक बूँद बारिश की

उन्हाने इच्छा केली. कसली? तर एक थेंब पावसाची. आता उन्हाची इच्छा पूर्ण झाली तर मग काय ? ते म्हणाले,

और बाज़ार से क्या ले जाऊँ
पहली बारिश का मज़ा ले जाऊँ

बाजारातून सर्व घेतले. आता काय नेऊ? आता पाऊस येईल मग थोडी त्या पहिल्या पावसाची मजा घेऊन जाऊ का? नव्हे, जातोच. माझ्या प्रियेला ते नक्कीच आवडेल. आकाशात काळे मेघ दिसताच कैफ़ भोपाली यांना आता एकांत संपणार याची खात्री झालीच.

दर-ओ-दीवार पे शक्लें सी बनाने आई
फिर ये बारिश मिरी तन्हाई चुराने आई

दरवाजांवर आणि भिंतीवर काही सुंदर आकार, चेहरे, चिन्हे बनविण्यासाठी आला. हा पाऊस माझा एकांत चोरण्यासाठी आला. ती चिन्हे पाहिली की मला प्रेयसीची आठवण येणार आणि पुन्हा माझ्या एकांतात खळबळ माजणार. पावसा पावसा हा एकांत संपू दे रे. मुनीर नियाज़ी म्हणाले, हे पावसा, बघ ना त्या रस्त्यावर फिरणाऱ्या मुली बघ-

घटा देख कर ख़ुश हुईं लड़कियाँ
छतों पर खिले फूल बरसात के

मेघांना पाहून तरुणी खुश झाल्या. मेघ, छे ती तर छतावर पावसाची फुले उमलली आहेत, असेच वाटू लागले आहे. नासिर काज़मी यांनाही पूर्वीच्या पहिल्या पावसाची आठवण तीव्रतेने आली-

याद आई वो पहली बारिश
जब तुझे एक नज़र देखा था
 
मला तो पहिला पाऊस आठवला, जेव्हा तुझ्याकडे मी एक कटाक्ष टाकला होता. पाकिस्तानचे दर्जेदार शायर हबीब जालिब यांनाही ह्या पावसाकडून खूप अपेक्षा आहेत. हा शेर वाचताना बघा, नव्या सरकारबद्दल तर ते बोलत नाहीत ना असे वाटते-

आने वाली बरखा देखें क्या दिखलाए आँखों को
ये बरखा बरसाते दिन तो बिन प्रीतम बे-कार गए

येणारा पाऊस या डोळ्यांना काय काय दाखवतो बघूच. गेला पावसाळा तर प्रियेविनाच बेकार गेला. आता हा तरी तिच्यासोबत जाईल, अशी आशा आहे. ख़ालिद मोईन म्हणाले, हो ना -

अजब पुर-लुत्फ़ मंज़र देखता रहता हूँ बारिश में
बदन जलता है और मैं भीगता रहता हूँ बारिश में

विरहाने अंग जळत आहे आणि मी पावसात भिजत आहे असे दृश्य मला दर पावसाळ्यात दिसते. यंदातरी हा पाऊस माझ्या जळणाऱ्या देहाची आग विझवेल अशी आशा आहे. तो पाऊस आल्यानंतर तिनेही त्यात भिजावे नाहीतर आमची अवस्था जमाल एहसानी यांच्यासारखी होईल-

उस ने बारिश में भी खिड़की खोल के देखा नहीं
भीगने वालों को कल क्या क्या परेशानी हुई

तिने एवढा सुंदर पाऊस असूनही खिडकी उघडली नाही आणि मलाही पाहिले नाही. भिजणाऱ्यांना काल काय त्रास झाला तिला काय कळणार? नज़ीर कैसर यांनाही गेल्यावेळचा पाऊस आठवला. काय मस्त पाऊस पडत होता आणि ती?

बरस रही थी बारिश बाहर
और वो भीग रहा था मुझ में

बाहेर पाऊस कोसळत होता आणि ती माझ्या आत आत भिजत होती. माझ्या प्रेमात भिजत होती. ती अशी भिजावी म्हणून आराधना करावी लागते.  अमजद इस्लाम अमजद यांनी तशी तमन्ना केली, आराधना केली-

पेडों की तरह हुस्न की  बारिश में नहा लूं
बादल की तरह झूम के घिर आओ किसी दिन

पावसात जशी झाडे न्हाऊन निघतात तसे मला तुझ्या सौंदर्यात न्हाऊन निघायची इच्छा आहे. तू कधीतरी मेघांसारखी लहरत, विहरत येना. मेघ, पाऊस, गारा सारी आपलीच मालमत्ता असल्यासारखे शायरांना वाटत असते. म्हणून एका शायरने तर आपल्या प्रेयसीला लिहिले-

बरसता, भीगता मौसम है कमज़ोरी मेरी लेकिन
मैं ये रिमझिम, घटा, बादल तुम्हारे नाम करता हूँ

हा ओला ऋतू, ही पावसाळी हवा माझी कमजोरी आहे. तरीही मी ही रिमझिम, हे मेघ तुझ्या नावे करतो. पण तू ये. तिने जायलाच हवे. नाही गेली तर काय मजा? तुम्हालाही कुणी अशी साद देत असेल तर जा. बशीर बद्र यांनी तसा संदेश दिला आहे, तो ऐका-

सदाओं को अल्फाज़ मिलने न पाएँ
न बादल घिरेंगे न बरसात होगी

(जर हाकेला ओ मिळाली नाही, प्रेमाला प्रतिसाद मिळाला नाही, तर ढग कसे येणार आणि पाऊस कसा पडणार? तेव्हा प्रतिसाद देत जा. मस्त पावसात हातात हात घालून भिजा. गरम गरम भजी खा, छान चुलीवर भाजलेली कणसे खा, तारुण्य परत येत नसते आणि पावसात भिजण्याची मजा तारुण्यातच कळते. जा भिजा, आपल्या प्रिय व्यक्तीसोबत...             
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link