Next
अ‍ॅनिमिया आणि योगोपचार
वृंदा प्रभुतेंडुलकर
Friday, September 27 | 02:00 PM
15 0 0
Share this story

अ‍ॅनिमिया म्हणजे रक्तातील लाल पेशींची कमतरता. लालपेशींमधील महत्त्वाचा घटक आहे हिमोग्लोबिन. शरीराला लोह हे खनिज कमी पडले की हिमोग्लोबिनची निर्मिती होऊ शकत नाही. परिणामी रक्तातील लाल पेशींचे प्रमाण घटू लागते. लाल पेशींचे कार्य आहे, प्राणवायू सर्व अवयवांपर्यंत नेऊन पोचवणे. हे कार्य मंदावल्यानंतर थकवा, धाप लागणे, हृदयाची वाढलेली धडधड, चक्कर येणे, अशक्तपणा अशी लक्षणे दिसतात. प्रामुख्याने स्त्रिया, लहान मुले आणि वृद्धांना भेडसावणारा अ‍ॅनिमिया हा आजार वरवर सामान्य वाटत असला तरी यात रोगप्रतिकारकशक्ती ढासळत असल्याने व्यक्ती इतर गंभीर आजारांना सहज बळी पडू शकते. पुरेसा प्राणवायू न मिळाल्याने अंतर्गत अवयवांची हानी होते. प्रदीर्घ अ‍ॅनिमियामुळे हृदयविकाराचा धोका वाढतो.
स्त्रियांच्या बाबतीत अ‍ॅनिमियाचे मुख्य कारण मासिक पाळीदरम्यान किंवा प्रसूतीनंतर होणारा अतिस्राव हे असते. आजकाल युवावर्गात अ‍ॅनिमियाचा वाढता प्रादुर्भाव हा सदोष, अपुऱ्या आहारामुळे दिसून येतो. सकाळी पुरेसा नाश्ता न करता बाहेर पडणारी ही युवापिढी दुपारपर्यंत अभ्यास, काम यात व्यग्र राहून दुपारी अल्पोपाहार, कित्येकदा जंकफूड खाऊन दिवस काढते. शरीराला आवश्यक ते अन्नघटक न मिळाल्याने ते सहजच अ‍ॅनिमियाचे शिकार बनतात आणि निदान होईपर्यंत खूप वेळ निघून गेलेला असतो. रक्ती मूळव्याध या विकारात मलविसर्ग काळ्या रंगाचा होत असतो, कारण मलामध्ये मिसळून रक्त शरीराबाहेर पडत असते. हे कळेपर्यंत अ‍ॅनिमिया झालेला असतो. आणखी एक कारण म्हणजे दूषित अन्नपाण्यातून शरीरात शिरलेले जंत. हे अन्नरस शोषून घेऊन स्वत: पोसले जातात आणि अ‍ॅनिमिया शरीरात घर करतो.
अ‍ॅनिमियाचे नेमके कारण ओळखून त्यानुसार उपचार घेण्याबरोबरच आहाराची काळजी घेणे जरुरीचे असते. लोहाचे प्रमाण वाढवण्यासाठी हिरव्या भाज्या, खजूर, गूळ आहारात असणे आवश्यक आहे. रक्तातील हिमोग्लोबिनची मात्रा सुधारण्यासाठी कणिक आणि दुधाची पावडर मिसळून केलेली चपाती दुधातून खाल्ल्याने त्वरित फायदा होतो.
वरील उपचारांच्या जोडीने योग (योगासने नव्हेत) अ‍ॅनिमियापासून लवकर सुटका करून घेण्यास साहाय्यकारी ठरतो. योगासने करण्यासाठी आवश्यक असलेले किमान त्राणसुद्धा अ‍ॅनिमियाग्रस्त शरीरात शिल्लक नसते. अशावेळी बसून करण्याच्या योगाच्या काही क्रिया केल्याने श्वसन, पचन, उत्सर्जन, रक्ताभिसरण इत्यादी संस्था जोमाने काम करू लागतात. चयापचयक्रिया सुरळीत होऊ लागली, की
हळूहळू अशक्तपणा कमी होतो. अशा काही क्रियांची माहिती आता घेऊ.

प्राणाकर्षण क्रिया
वज्रासनात बसावे. मूलबंध लावावा. डोळे मिटावेत. दीर्घ पण सहज श्वसन सुरू करावे. श्वासोच्छ्वासाचा आवाज तसेच शरीराची हालचाल होऊ देऊ नये. श्वास घेताना “सो s” आणि सोडताना ‘हं’ असा मनातल्या मनात ‘सो s हं’चा जप करावा. या मानस जपामुळे श्वासावर लक्ष एकाग्र करणे सोपे जाते. अंदाजे ३ मिनिटे प्राणाकर्षणाची क्रिया करावी. चांगला सराव झाल्यावर हीच क्रिया पुढीलप्रमाणे करावी.
वज्रासनात बसल्यावर श्वास भरताना कल्पना करावी, की श्वास गुदद्वारापासून (पिंड) भरत भरत पाठीच्या कण्यामधून हळूहळू मेंदूपर्यंत (ब्रह्मांड) जात आहे आणि श्वास सोडताना पुन्हा हळूहळू ब्रह्मांडापासून पिंडापर्यंत जात आहे.
जे वज्रासनात बसू शकत नाहीत त्यांनी सुखासनात (मांडी घालून) किंवा खाली बसता येत नसल्यास खुर्चीवर बसून प्राणाकर्षणाची क्रिया केली तरी चालेल.
अ‍ॅनिमियामुळे प्राणवायूचे वहन नीट होत नसल्याने शरीर अधिकाधिक प्राणवायूची मागणी करत असते. याचा परिणाम म्हणून श्वासोच्छ्वासाची गती सरासरीपेक्षा जास्त वाढते व याचा ताण हृदयावर पडतो. प्राणाकर्षण क्रियेमुळे ही गती हळूहळू मंदावते आणि हृदय व फुप्फुसांवरील ताण कमी होतो. श्वास नियंत्रित झाले, की चित्तही स्थिर होते. वज्रासन कमजोर झालेल्या शरीराला स्थिरता प्राप्त करून देते. मरगळ दूर होते.

अनुलोम-विलोम
शरीरात दोन मुख्य नाड्या आळीपाळीने काम करत असतात. सूर्य नाडी (पिंगला) मूलाधारापासून निघून उजव्या नाकपुडीपर्यंत येते व शरीराला उष्णता प्रदान करते. चंद्र नाडी (इडा) मूलाधारापासून निघून डाव्या नाकपुडीपर्यंत येते व शरीराला शीतलता प्रदान करते. या दोन्ही नाड्यांच्या कार्याचे संतुलन करून शरीराला समशीतोष्ण ठेवण्यासाठी ही
क्रिया आहे.
वज्रासन, पद्मासन, सुखासन किंवा खुर्चीवर बसावे. प्रथम उजव्या हाताच्या अंगठ्याने उजव्या नाकपुडीचे छिद्र बंद करावे आणि डाव्या नाकपुडीतून दीर्घ श्वास घ्यावा. आता डाव्या नाकपुडीचे छिद्र अनामिकेच्या साहाय्याने बंद करावे व उजवी नाकपुडी उघडून, घेतलेला श्वास उजव्या नाकपुडीतून सोडावा. याच उघड्या उजव्या नाकपुडीतून दीर्घ श्वास भरून घ्यावा व ती अंगठ्याच्या साहाय्याने बंद करावी. घेतलेला श्वास डावी नाकपुडी उघडून सोडावा. या प्रकारे १५ ते २०
श्वास-प्रश्वास करावेत.
या क्रियेने हृदय व फुप्फुसांना बळकटी येते आणि प्राणवायूचे ग्रहण अधिक प्रमाणात होते. शरीरातल्या सूक्ष्मातिसूक्ष्म नाड्यांची शुद्धी होते.
 
अ‍ॅनिमियावर प्रभावी ठरणाऱ्या आणखी काही क्रिया पुढील लेखातून पाहू.

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link