Next
आई नव्हे मैत्रीण
अनिता शिंदे
Friday, July 05 | 04:00 PM
15 0 0
Share this story

जिद्द, चिकाटी, मेहनत म्हणजेच माझी आई, शांता जनार्दन दांडे! अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत आई मोठी झाली. तिचे वडील म्हणजे माझे आजोबा एक वेठबिगारी होते. त्यामुळे घरची परिस्थिती बेताचीच होती. बापलेकीचं प्रेम अफाट होतं. आई हे त्यांचं एकुलत एक अपत्य! जमेल तसे तिचे लाड पुरवले जायचे. अवघ्या पंधराव्या वर्षांतच आईचं लग्न माझे बाबा जनार्दन दांडे यांच्याशी झालं. आम्ही त्यांना दादा म्हणत असू. दादा ड्रायव्हर होते. रेतीची वाहतूक करायचे. चार-चार दिवस ते घरी यायचे नाहीत. आम्ही चार भावंडं आईसोबत आजी-आजोबांकडे राहायचो. दादा ट्रकड्रायव्हर असल्याने साहजिकच त्यांना दारूचं व्यसन होतं. पुढे हे व्यसनच त्यांना मारक ठरलं. दारूच्या व्यसनामुळे त्यांचं लिव्हर खराब झालं. कमावता माणूस घरी बसला म्हटल्यावर आईनं कंबर कसली. आमच्या सगळ्यांची जबाबदारी तिनं उचलली. महिला गृहउद्योगाच्या कपडे धुण्याचे साबण व पावडर बनवणाऱ्या कंपनीत आई कामाला लागली. त्या नोकरीच्या बळावर आईनं आमला शिकवलं, वडिलांचा आजार बरा केला. मात्र दादा शरीरानं खंगले होते. ते मेहनतीचं काम करू शकत नव्हते. म्हणून मग आईनं नोकरी सुरूच ठेवली. पुढे याच कंपनीची आणखीन एक नवीन शाखा आमच्या घोडबंदर गावात उभारण्यात आली, ज्याचं संचालकपद माझ्या चौथी शिकलेल्या आईला मिळालं. गावातल्याच महिलांना या रोजगारसंधीचा लाभ घेता यावा म्हणून तिनं प्रत्येकीच्या घरचा उंबरठा झिजवला. २०-२२ वर्षं आई संचालकापदावर होती. तिला देऊ केलेली गाडी आणि ड्रायव्हर तिनं अतिशय नम्रपणे नाकारली. ती इतर महिलांसोबतच मिनीबसनं जायची आणि यायची. संचालकपदाचा तिनं कधीही गैरवापर केला नाही किंवा मोठेपणा मिरवला नाही.
     या कामाच्या बळावरच आईनं माझ्या मोठ्या बहिणीच लग्न केलं. मला मनासारखं शिक्षण घेऊ दिलं. पुढे दादांना टीबी आणि दम्याच्या आजारानं ग्रासलं. आठेक वर्षं या आजारांशी वडील लढत होते. माझ्या दहावीनंतर या आजारांना घेऊनच दादांनी देहयात्रा संपवली. मात्र आई अजिबात खचली नाही. वडिलांनतरही तिनं आमचा सांभाळ केला. खरं तर तिला हे माहीत होतं, की आज ना उद्या दादांची साथ सुटणार आहे. म्हणूनच एका तरी मुलाचं लग्न त्यांनी पाहावं, म्हणून माझ्या मोठ्या बहिणीच लग्न तिनं दादांदेखत लावून दिलेलं. तिच्या गोंडस मुलीला पाहून दादा खूप आनंदित झाले होते. थरथरत्या हातांनी दादांनी बाळाच्या तोडांवरून हात फिरवला तो शेवटचा! बावीस वर्षांच्या नोकरीत आईनं आमचं शिक्षण पूर्ण केलं, घराचं बांधकाम पूर्ण केलं, आमचं लग्नकार्यही केलं. आज ती पाच नातवंडांची आजी आहे. तरीही तितक्यात उत्साहानं  कामात सक्रिय आहे. आम्हा कोणाही भावंडावर आई अवलंबून नाही.
ज्यावेळी घोडबंदर शाखेच्या महिला गृहउद्योगाच्या कामगारांनी संप पुकारला त्यावेळी त्याचा काहीच निकाल न लागल्यानं ती शाखा बंद करावी लागली. मात्र आईच्या कामाचा सच्चेपणा पाहून तिला आधीच्या शाखेमध्ये नोकरी दिली गेली. आई कधीच कोणाच्या वाकड्यात गेली नाही. तिनं तिचं काम अत्यंत चोखपणे व नम्रपणे केलं. मला एक प्रसंग चांगलाच आठवतो. ससा साबणाची कंपनी गावातच असल्यानं कुतुहलापोटी आम्ही मुलं बऱ्याच वेळा साबणाच्या वड्या बनवताना पाहायला जायचो. तेव्हा एका मोठ्या टँकमध्ये अॅसिड साठवून ठेवलं होतं. अॅसिडच्या टँकची नळी व्यवस्थित बंद न केल्याने बरंच अॅसिड खाली पसरलेलं होतं. त्यावेळी कोणाचा पाय त्यात पडू नये म्हणून आईनं हातानंच ते एका घमेल्यात साठवायला घेतलं. ज्या महिला अॅसिड घेऊन गेल्या होत्या त्या हॅण्ड ग्लोव्हज घेऊन धावत आलेल्या. मुख्य संचालिकाताईंचा त्या महिलांना नंतर चांगलाच ओरडा पडलेला. मात्र आईच्या हातावर फोड उठलेले. तो सगळा प्रकार पाहून खूप वाईट वाटलेलं. आई आमच्यासाठी किती कष्ट करत होती, याचा प्रत्यय त्याचवेळी आला होता. म्हणूनच पार्टटाइम जॉब  करून पुढचं शिक्षण पूर्ण करायचं निर्धार मी त्याच वेळी केला होता. पुढे मी लायब्ररीयनची पदवी घेऊन त्याच पोस्ट वर रूजू झाल्याचं पाहून खूप समाधान वाटलं तिला. परिस्थितीमुळे आईला शिकता आलं नाही म्हणून तिनं मला खूप शिकू दिलं. मला शिक्षण, नोकरी आणि लग्नाचही स्वातंत्र्य दिलं. खरं तर तिनं आम्हाला स्वावलंबी बनवलं. निर्णय घेण्याचं स्वातंत्र दिलं. विशेषतः आमच्यावर कधीही तिच्या अपेक्षेचं ओझं लादलं नाही. कधी कुठल्या बंधनात अडकवलं नाही. किंवा इतरांप्रमाणे इमोशनल ब्लॅकमेल केलं नाही. उलट परिस्थितीला कसं सामोरं जायचं ते शिकवलं. तिच्यातील हा गुण आमच्यात आपसूकच आला असावा. तुळजापूरच्या अंबाबाईची भक्त असलेली माझी आई देवीवर कवणंही लिहायची. मात्र जबाबदारीच्या ओझ्याखाली तिचा तो छंद मागे पडला. तिचा लिहिण्याचा छंद माझ्यात जशाचा तसा उतरला. मी कथा, कवितांच्या प्रेमात पडले. लहानपणी आई आम्हाला पोटाशी घेऊन गोष्टी सांगायची. विचारांचे डोस पाजायची. जगरहाटी समजावून सांगायची. ती आई म्हणून कधीच तिच्या कर्तव्यात कमी पडली नाही. आज तिच्याच आभाळमायेखाली एक वेगळं आकाश निर्माण करण्याची संधी दिल्याबद्दल कितीही कृतज्ञता व्यक्त केली तरी ती कमीच आहे.
दु:खात बिलगायला आईची मिठी असते
भीतीत लपायला पदराखाली जागा असते
आईची सर कशालाच नसते
म्हणूनच माझी आई ही माझीच असते
तिची जागा कोणालाच नसते

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link