Next
शिवशाहीर बाबासाहेब
डॉ. अनुराधा हरकरे डॉ. अंजली कुलकर्णी
Friday, November 30 | 06:30 PM
15 0 0
Share this story

अवघ्या देशाला शिवप्रेमाने न्हाऊन काढणारे, शिवाजी महाराजांचे निस्सीम भक्त! दुर्दम्य इच्छाशक्ती आणि अक्षय ऊर्जेचा स्रोत असणारे शिवशाहीर बाबासाहेब म्हणजे बळवंत पुरंदरे. त्यांचा जन्म २९ जुलै १९२२ रोजी पुण्यातील शिर्केवाड्यात झाला. आई सरस्वतीबाई आणि वडील मोरेश्वरराव. देशभक्ती, इतिहासाची आवड, छत्रपतींबद्दल श्रद्धा या गोष्टी जणू बाळकडू म्हणून मिळाल्या. लहानपणापासून त्यांना वाचनाची, त्यातल्या वेगवेगळ्या प्रसंगांचे सादरीकरण करण्याची आवड होती. एकदा ते पुण्याजवळील ताथवडे येथे नरसिंहमंदिरात गेले होते. काही कारणाने कीर्तनकारबुवा आले नाहीत. मग ऐनवेळी कुलोपाध्याय गुरुजींनी बाबासाहेबांनाच पुढे केले. आधी त्यांना थोडी भीती वाटली. नंतर मात्र त्यांनी कथा छान सांगायला सुरुवात केली. नरसिंहअवताराचा अत्युच्य क्षण तर त्यांनी असा काही रंगवला की समस्त गावकऱ्यांनी गुलाल आणि फुले उधळून जयजयकार केला. अवघ्या नवव्या वर्षी अनपेक्षितपणे सुरू झालेल्या या ‘पब्लिक परफॉरमन्स’चा प्रवास आजही त्याच उत्साहात चालू आहे.
शाळेतील एका स्पर्धेदरम्यान शिक्षकांनी त्यांना चक्क प्रेमळ धमकीच दिली, ‘छान भाषण कर नाहीतर झोडपून काढेन!’ त्यांच्या दरडावणीमुळे उत्कृष्ट भाषण करण्याची सवय लागली, असे बाबासाहेब म्हणाले.
बाबासाहेबांचे प्रचंड वाचन आणि जबरदस्त पाठांतर यामुळे त्यांनी लहानपणी केलेल्या नकला जिवंत वाटत. एके वर्षी प्रत्यक्ष स्वातंत्र्यवीर सावरकरांसमोर त्यांचीच नक्कल करण्याचा प्रसंग आला. तेव्हा अर्थातच बाबासाहेबांना घाम फुटला, घसा कोरडा झाला. तरीही बाबासाहेबांनी स्वातंत्र्यवीरांच्या भाषणाचा उतारा त्यांच्याच आविर्भावात म्हणून दाखवला. सावरकर आनंदले. पाठीवर हात फिरवून म्हणाले- “फार सुंदर! पण आयुष्यभर केवळ लोकांच्या नकला करू नकोस. स्वतःचे म्हणून काहीतरी असू दे.”
 लहानपणी छत्रपतींच्या जीवनावरचे ‘सुवर्णमाला’ नावाचे चित्रमय पुस्तक त्यांच्या घरात होते. ते हाती पडताच खजिना मिळाल्याच्या आनंदात त्यांनी पुस्तक उचलले आणि त्यातली चित्रे कापून वहीत चिटकवून ठेवली. हे वडिलांना कळल्यावर त्यांनी जमदग्नीचा अवतार धारण केला, पण बाबासाहेबांनी स्वत:ची चिकटवही दाखवल्यावर ते निवळले.
आपल्या चिरंजीवांची आवड बघून त्यांनी इतिहासाची पुस्तके आणून दिली आणि म्हणाले, “चित्र गोळा करण्यापेक्षा पुस्तके जमवा आणि ती वाचा.”
एकदा तर गंमतच झाली. त्यांच्या घरी चैत्रगौरी हळदीकुंकवासाठी एका मातीच्या लहान सुबक हत्तीवर गौर बसवली जायची. मग वर्षभर त्या हत्तीची रवानगी माळ्यावर होत असे. काही कारणाने बाबासाहेब माळ्यावर चढले असताना तिथे त्यांना हा हत्ती दिसला. त्याच्या मातीचा लहानसा तुकडा निघाला होता. बाबासाहेबांनी तो तुकडा तोंडात टाकला. शाडूच्या मातीची ती चव त्यांना खूप आवडली. झाले! रोज गुपचूप एकेक तुकडा गट्टम! हळूहळू तो अख्खा हत्ती बाबासाहेबांनी फस्त केला!
पुढच्या वर्षी हळदीकुंकवाच्या वेळी त्या हत्तीचा शोध सुरू झाला. बाबासाहेबांनी मौन पत्करले आणि हत्तीचे गुपित खऱ्या अर्थाने ‘पोटातच’ राहिले.
मिश्कीलपणा, दंगा, खोडकरपणा हे सारे अंगात होते, तरी त्यांचे मन मात्र मोठे होते. एके वर्षी नागपंचमीच्या दिवशी नवा रेशमी झब्बा घालून अंगणात खेळत असताना एक गारुडी आला. घरच्यांनी पूजा केली, त्याला पैसे दिले. जाताना गारुडी म्हणाला, “काही कापड असेल तर द्या.”
बाबासाहेबांनी कोणताही विचार न करता अंगातला नवा झब्बा तिथल्या तिथे त्याला काढून दिला.
पुण्यात पुरंदरेवाड्यात राहत असताना सभोवतीच्या शेतात चिंच, आंबे, जांभळे, पेरू, बोरे, सीताफळे असा सारा मुलांचा आवडता रानमेवा मस्त बहरलेला असायचा. शेजारच्या राऊतवाडीच्या पहारेदाराला चुकवून मित्रमंडळींसोबत तो गोळा करणे म्हणजे एखादी लढाई जिंकल्यासारखे होते. परंतु ही पळवापळवी पुरंदरेवाड्यातील बाबासाहेब आणि सेनेची आहे हे समजल्यावर स्वतः राऊतमामा पहारेदारासोबत मुलांसाठी खाऊ पाठवत असत.
एकदा सारे कुटुंबीय सिंहगडावर गेले असताना बाबासाहेब अचानक दिसेनासे झाले. सगळे शोधाशोध करू लागले. मात्र बाबासाहेबांच्या वडिलांनी बरोबर अंदाज बांधला. ते तानाजी मालुसरे यांच्या समाधीजवळ गेले. तर हळव्या मनाचे बाबासाहेब त्या समाधीसमोर असलेल्या वृंदावनाला बिलगून अश्रू ढाळत होते. असेच एकदा ज्ञानेश्वरमाऊलीच्या दर्शनाला आळंदीला गेले असताना बाबासाहेबांना समाधीपुढे बसल्यावर गहिवरून आले आणि त्यांनी आसवांना वाट मोकळी करून दिली.
कडक स्वभावाच्या पण प्रेमळ व अत्यंत जागरूक असलेल्या वडिलांच्या मार्गदर्शनाखाली बाबासाहेब अशा गमतीजमती करत मोठे झाले. ‘महाराष्ट्रभूषण’सह अनेक मानाच्या पुरस्कारांचे मानकरी असणारे बाबासाहेब यांनी त्यांचे इतिहासप्रेम जपले, वाढवले आणि इतरांनाही इतिहासाची गोडी लावली.
(समाप्त)
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link