Next
राष्ट्रवादीत धुसफूस सुरू
विशेष प्रतिनिधी
Friday, October 12 | 01:30 PM
15 0 0
Share this storyदेशात पुढील वर्षी लोकसभेची निवडणूक होत असून त्याला अजून सहा ते सात महिन्यांचा अवकाश आहे. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसनं आतापासूनच या निवडणुकीतील आपले उमेदवार कोण असतील, याची चाचपणी सुरू केली आहे. त्या अनुषंगानं पक्षाची दोन दिवसांची महत्त्वपूर्ण बैठक नुकतीच मुंबईत पार पडली. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये लोकसभेच्या उमेदवारीवरून काही मतदारसंघामध्ये तीव्र संघर्ष होण्याची चिन्हं असल्याचं या बैठकीत समोर आलं. राष्ट्रवादीच्या तीन विद्यमान खासदारांना पुन्हा उमेदवारी देण्यास या बैठकीत विरोध झाल्यानं निवडणुका जशा जवळ येतील, तसा पक्षांतर्गत संघर्ष वाढण्याची चिन्हं आहेत.

लोकसभेच्या २०१४ च्या निवडणुकीत राज्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची आतापर्यंतची सर्वात खराब कामगिरी ठरली. काँग्रेसनं केवळ दोन, तर राष्ट्रवादी काँग्रेसने चार जागा जिंकल्या होत्या. सातारा, कोल्हापूर, बारामती आणि माढा अशा या चारही जागा पश्चिम महाराष्ट्रातल्या होत्या. त्यानंतर नुकत्याच लोकसभेच्या भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीत विजय मिळवून राष्ट्रवादीच्या खासदारांची संख्या पाचवर पोहोचली.२०१४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीत राष्ट्रवादीनं २४ जागा मागितल्या होत्या. मात्र त्यांच्या वाट्याला २१ जागा आल्या. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसला २५ जागा हव्या असून काँग्रेसच्या काही जागांवर दावा सांगण्याची तयारी राष्ट्रवादीनं सुरू केली आहे. मागील वेळचे २१ मतदारसंघ आणि अधिकचे मतदारसंघ यांचा आढावा राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत घेण्यात आला.  या मतदारसंघात उमेदवार कोण असेल याची प्राथमिक चाचपणीही पक्षातर्फे करण्यात आली. ही चाचपणी करत असताना काही मतदासंघांत पक्षनेत्यांमधले मतभेद उघड झाले. दिग्गज उमेदवारांमधली धुसफूस बाहेर आली.

प्रामुख्यानं लोकसभेच्या सातारा मतदारसंघात राष्ट्रवादीचा उमेदवार कोण असणार याबाबत उत्सुकता आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज उदयनराजे भोसले हे राष्ट्रवादीचे सातारचे विद्यमान खासदार आहेत. त्यांच्या उमेदवारीला साताऱ्यातील काही आमदार आणि पदाधिकाऱ्यांचा विरोध आहे. उदयनराजे यांच्याऐवजी रामराजे नाईक-निंबाळकर यांना किंवा अन्य कुणालाही उमेदवारी द्यावी अशी टोकाच्या विरोधाची भूमिका उदयनराजे यांच्या विरोधकांनी या बैठकीत घेतली. या मतदारसंघात रामराजे नाईक-निंबाळकर यांच्याशिवाय श्रीनिवास पाटील निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत.काँग्रेसकडे असलेल्या पुणे मतदारसंघावर यावेळी दावा सांगण्याचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेसनं घेतला आहे. या ठिकाणाहून शरद पवार यांनी निवडणूक लढवावी अशी विनंती पुण्यातील काही जणांनी शरद पवारांना केली आहे. मावळ मतदारसंघातून अजित पवारांचे चिरंजीव पार्थ पवार निवडणूक लढवणार असल्याची चर्चा सुरू झाल्यावर त्यावर खुद्द पवारांच्याच वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण झाला. मावळमधून पार्थ पवार उभे राहिले तर हमखास निवडून येतील असा इथल्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा दावा आहे. त्यामुळे मावळच्या उमेदवारीबाबत अंतिम निर्णयाकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय.

रायगड लोकसभा मतदारसंघातून सुनील तटकरेंचा २०१४ साली थोड्या मतांनी पराभव झाला होता. त्यामुळे २०१९ साली तटकरेच लोकसभेचे उमेदवार असतील, त्यांना पक्षातून कुणीही स्पर्धक नसेल अशी शक्यता होती. मात्र राष्ट्रवादीच्या बैठकीत आमदार भास्कर जाधव यांनी अनपेक्षितपणे आपण रायगडमधून लोकसभा लढवण्यास इच्छुक असल्याचं सांगितलं. जाधव आणि तटकरे यांच्यात जुना संघर्ष आहे, मध्यंतरी हा वाद मिटवण्याचा प्रयत्न झाला, मात्र तो मिटला नसल्याचं यामुळे उघड झालंय.

खासदार उदयनराजे भोसले यांच्यासह पक्षातील आणखी दोन विद्यमान खासदारांना पुन्हा उमेदवारी देण्यास पक्षातून विरोध होतोय. यात कोल्हापूरचे खासदार धनंजय महाडिक आणि माढ्याचे खासदार विजयसिंह मोहीते-पाटील यांचा समावेश आहे. माढ्यातून राज्य शासनातील एका बड्या निवृत्त अधिकाऱ्यानं उमेदवारी मागितली आहे. त्यामुळे सद्य परिस्थितीत शरद पवार या दोन विद्यमान खासदारांना डावलून नवीन उमेदवार देणार का याबाबत उत्सुकता आहे.

राष्ट्रवादीनं काँग्रेसकडील ज्या जागांवर दावा सांगण्याचा निर्णय घेतलाय, त्यात मुंबईतीलही एका जागेचाही समावेश आहे. मुंबईतील सहा जागांपैकी सध्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे ईशान्य मुंबई ही एकच जागा आहे. याव्यतिरिक्त गुरुदास कामत यांनी लढवलेली वायव्य मुंबई किंवा प्रिया दत्त यांनी लढवलेली उत्तर-मध्य यापैकी एक जागा राष्ट्रवादीला हवी आहे. याशिवाय हातकणंगले, औरंगाबाद, जालना या जागाही राष्ट्रवादीला हव्या आहेत व अमरावती आणि परभणी या जागांची अदलाबदल करण्यास ते तयार आहेत. आगामी निवडणुकीसाठी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडीत इतर मित्रपक्षही सहभागी होणार आहेत. यात राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचाही समावेश आहे. राजू शेट्टी यांना राष्ट्रवादीच्या कोट्यातून जागा दिली जावी असा राष्ट्रवादीचा आग्रह असून त्यासाठीच काँग्रेसकडे असलेला हातकणंगले मतदारसंघही राष्ट्रवादीला हवा आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर पक्षातील मतभेद मिटवून उमेदवार निश्चित करण्याबरोबरच काँग्रेसकडील काही मतदारसंघ स्वतःच्या पारड्यात पाडून घेण्यासाठीही राष्ट्रवादीच्या पक्षश्रेष्ठींना संघर्ष करावा लागणार आहे.

आमच्या घराण्यातून केवळ मीच
प्रत्येक मतदारसंघात एकापेक्षा जास्त इच्छुक आहेत, ही एक चांगली बाब आहे. लोकांना विश्वास आहे, आपण राष्ट्रवादीतून उभे राहिलो तर निवडून येऊ शकतो. उदयनराजेंना उमेदवारी देण्याचा अधिकार मला नाही, पण तो निर्णय अद्याप झालेला नाही. पक्षात एक सिस्टीम असते त्यानुसार लवकरात लवकर सगळेच निर्णय होतील. पार्थ पवार यांच्याबाबत मीडियामध्ये गैरसमज झाला आहे, आमच्यापैकी त्याबाबत कोणीच बोललेलं नाही. अजितदादा एवढंच म्हणाले होते की त्यांची इच्छा नाही की त्यांच्या कुठल्या मुलानं निवडणूक लढवावी,  पण प्रत्येकाला अधिकार आहे. पार्थचीही इच्छा नाही. आमच्या घराण्यात फक्त मी निवडणूक लढवणार आहे.
 - सुप्रिया सुळे
 
पवारांनी मोठ्या पदावर जावं
राष्ट्रवादी काँग्रेसची लोकसभा आढावाबैठक संपल्यानंतर छगन भुजबळ यांना शरद पवार यांच्या पुण्यातील उमेदवारीबाबत प्रश्न विचारला असता,  शरद  पवार यांनी मोठया पदावर जावं, हीच माझी इच्छा आहे, असं उत्तर दिलं. मला खूप वाटतं पवारसाहेबांनी मोठ्या पदावर जावं, असंही ते म्हणाले.
 - छगन भुजबळ
 
माझेही सर्व पक्षांत मित्र
मला विरोध झाला तरी माझ्यावर प्रेम करणाऱ्या लोकांची संख्या जास्त आहे. मी साताऱ्यातून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहे. पवारसाहेबच याबाबत निर्णय घेतील. पवारसाहेबांचे जसे सर्व पक्षात मित्र आहेत, तसे माझेही सर्व पक्षांत मित्र आहेत.
 - उदयनराजे भोसले
 
 पुणे काँग्रेसकडेच
पुणे लोकसभा मतदारसंघ काँग्रेसचा पारंपरिक मतदारसंघ आहे, त्यामुळे एकत्र बसून चर्चा झाल्याशिवाय काहीच सांगता येणार नाही. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार पुण्यातून लोकसभा लढवणार यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांची प्रतिक्रिया.
 - अशोक चव्हाण
 
पुणे पवारांचं कर्मस्थळ
पवारसाहेब पुण्यातून निवडणूक लढणार असतील तर ते आमच्यासाठी आमचं भाग्यच ठरेल. पुण्यात राष्ट्रवादीची ताकद वाढलेली आहे. त्यामुळे इथली जागा राष्ट्रवादीला मिळावी, अशी आमची मागणी आहे. त्याबाबत पवारसाहेब निर्णय घेतील. ते लढणार असतील तर विरोधात कुणीही असला तरी पवारसाहेब निवडून येतील. पवारसाहेबांचं जन्मस्थळ बारामती असलं तरी पुणे त्यांचं कर्मस्थळ आहे. त्यामुळे त्यांना मतदान करायला मिळालं तर त्यात आनंदच नव्हे, तर अभिमान आहे.
- अंकुश काकडे

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link