Next
बोगस पावत्यांच्या आधारे ७७ कोटींचा घोटाळा
विशेष प्रतिनिधी
Friday, September 20 | 01:00 PM
15 0 0
Share this story

काही कंपन्यांना ४२० कोटी रुपयांचा माल पुरवल्याच्या खोट्या पावत्या तयार करून त्याद्वारे ७७ कोटी रुपयांचा जीएसटीचा लाभ उकळण्याचा घोटाळा जीएसटी गुप्तवार्ता महासंचालनालयाने उघड केला आहे. याप्रकरणी मे. हायग्राऊन्ड एन्टरप्रायझेस लिमिटेडचा व्यवस्थापकीय संचालक संदीप ऊर्फ करण अरोरा यास अटक करण्यात आली आहे.
 जीएसटी गुप्तवार्ता महासंचालनालयाच्या मुंबई युनिटच्या सहसंचालक उज्ज्वला भागवत यांनी या गैरव्यवहाराविषयी सांगितले, प्रत्यक्ष माल किंवा सेवा न घेताच त्याबदल्यात रक्कम अदा झाल्याच्या खोट्या पावत्या मिळवून त्याआधारे आपली उलाढाल फुगवून दाखवण्याचा त्याने प्रयत्न केला. प्रत्यक्षात काम केलेच गेले नव्हते व ही मोठी साखळी होती. त्यामुळेच सर्व व्यवहारांची छाननी करण्यासाठी याप्रकरणी संचालनालयाने नवी दिल्ली, कोलकाता, हैदराबाद, बंगळुरू, पुणे अशा विविध ठिकाणी तपास केला व भरपूर कागदपत्रांचे पुरावे गोळा केले. अनेकांचे जबाब नोंदवले. तेव्हा प्रत्यक्षात खरेदी-विक्री किंवा सेवाच दिली गेली नसल्याचे उघड झाले. अशा व्यवहारांद्वारे मोठी उलाढाल दाखवून बँकांकडून कर्ज मिळवण्यासाठीही वापर केला जातो. या प्रकरणी या उलाढालीत जीएसटी भरल्याचे दाखवण्यात आले. या कंपनीकडून जे ७७ कोटी रुपये सरकारच्या तिजोरीत जमा व्हायला हवे होते, ते जमा झाले नाहीत.  मे. हायग्राऊन्ड एन्टरप्रायझेस या कंपनीने अनेक जणांकडून सेवा घेतल्याच्या किंवा माल घेतल्याच्या पावत्या सादर केल्या होत्या. प्रत्यक्षात मात्र त्या बोगस कंपन्या असून त्यांची या प्रकारचा व्यापारउद्योग करण्याची क्षमताच नाही, असे आढळले. यातल्या काही कंपन्या अस्तित्वात होत्या, परंतु  त्यांनी केवळ पावत्या दिल्या होत्या. सखोल तपास केल्यावर करण अरोरा हाच या घोटाळ्याचा सूत्रधार असल्याचे उघड झाले. त्याला अटक करून अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांपुढे हजर करण्यात आले. त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे. याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.
ब्रिटनही करणच्या शोधात
ब्रिटिश सरकारही ४५ लाख पाऊन्ड इतक्या रकमेच्या गैरव्यवहारप्रकरणी करण अरोरा याचा शोध घेत आहे. हासुद्धा करविषयक घोटाळाच आहे. तेथे त्याने एका फिल्मविषयक कराचा परतावा मागितला, मात्र ही फिल्म एक तर बनलीच नव्हती किंवा तिच्याशी त्याचा काही संबंध नव्हता. लंडन पोलिस, मेट्रोपोलिटन पोलिस सर्व्हिस व ब्रिटिश नॅशनल क्राइम एजन्सी यांच्या संयुक्त कृती दलाने काढलेल्या नोटिशीत हे नमूद करण्यात आले आहे. करण अरोराचे व्यवहार सक्तवसुली संचालनालय व प्राप्तिकर खाते यांचीही करण अरोरावर करडी नजर असून त्याच्या व्यवहारांची छाननी सुरू असल्याची माहिती तपासात उघड झाली.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link