Next
सहजीवनाच्या कल्पना
मंगला मराठे
Friday, September 20 | 04:00 PM
15 0 0
Share this story


लग्नाने बनणाऱ्या नात्यांमधे सर्वात महत्त्वाचे नाते असते पतीपत्नीचे. हे नाते घडण्यासाठीच लग्नाचा घाट घातला जातो. या नात्याची वैशिष्ट्ये सांगावी तेव्हढी थोडीच आहेत.
  • या एकाच नात्यासाठी आपण व्यक्तीची निवड करतो.
  • हे नाते प्रौढ वयात तयार होणारे आहे तरीही औपचारिकतेची सर्व बंधने तोडणारे आहे.
  • या नात्यात सर्वात जास्त सहअनुभूती आणि शेअरिंग आहे.
  • या नात्यात एकमेकांवर सर्वात जास्त हक्क असतो.
  • या नात्यात एकमेकांकडून सर्वात जास्त अपेक्षा केल्या जातात.
  • या एकाच नात्यात लैंगिक संबंध अंतर्भूत आहेत म्हणून हे नाते रोमॅंटिक आणि तरल आहे.
  • प्रत्येकाने या नात्याबद्दल खूप स्वप्ने बघितलेली असतात.
  • आणि हे एकच नाते असे आहे की जे कायद्याचा वापर करून संपवता येते; तोडता येते.
असे हे आयुष्यभराचे, दोघांच्याही आयुष्याला नवीन वळण लावणारे नाते आहे.
 या नात्याची पारंपरिक कल्पना म्हणजे पत्नीचे समर्पण, जे अजूनही लोकांच्या मनात रेंगाळत आहे. सिनेमा, मालिकांच्या नायिका अशाच असतात आणि त्या लोकप्रिय होतात. त्याचे कारण हेच आहे. असे संसार बाहेरून दिसायला खूप छान दिसतात. मतच नाही तर मतभेद कुठून होणार? पण, यात पत्नीचा विकास होत नाही.
दुसऱ्या प्रकारच्या नात्यात पूर्णपणे व्यावहारिक विचार असतो. असे संसार व्यवहाराच्या व कर्तव्याच्या पायावर उभे असतात. ते जोपर्यंत चालू असतात तो पर्यंत सुरळीत चालू असतात. घर व्यवस्थित चाललेले असते. परंतु या नात्याचा भावनिक पाया मात्र फारसा मजबूत नसतो. या पतीपत्नीमध्ये नाजूक रेशमी बंध कमी असतात.
तिसऱ्या प्रकारचे नाते मूलत: मैत्रीचे आहे. सहचराचे आहे. समानतेचे आहे. इतर नात्यांप्रमाणे पतीपत्नीचे नाते हेसुद्धा प्रथम दोन माणसांमधले नाते आहे. कुठल्याही नात्यासाठी हवा असणारा मैत्रभाव इथेही गरजेचा आहे. या मैत्रभावामुळे दोघांना एकमेकांबद्दल प्रेम तर असतेच, आदरही असतो. एकमेकांच्या ज्ञानाची, गुणांची कदर असते. दोघेही एकमेकांच्या मदतीने आपले करिअर, कार्य, छंद चालू ठेवू शकतात. दोघांनाही स्वत:चे असे विश्व (स्पेस) असते. त्यामुळे दोघांच्याही गुणांचा, विचारांचा, चित्तवृत्तींचा विकास होत राहतो. या नवराबायकोचे नाते छान मोकळे राहते. निर्णय अधिक विचारपूर्वक घेता येतात. ते एकमेकांच्या त्रुटी भरून काढू शकतात. असे नाते अधिक निकोप असते. अनुषंगाने इतर नातीही स्वच्छ राहतात. मात्र नाते असे नितळ, निकोप आपोआप बनत नाही. अक्षता पडल्या, विधी झाले, परस्परांना नात्याचा आणि व्यवहाराचा हक्क दिला म्हणजे नाते बनले असे होत नाही. इतर नात्यांप्रमाणे हे नातेसुद्धा खतपाणी घालून फुलवावे लागते.
काळाबरोबर पतीपत्नीचे नाते बदलले. सहजीवनाच्या कल्पना बदलल्या. विस्तारल्या. खरे म्हणजे काळाबरोबर आपली सगळीच नाती बदलली आहेत. बाकी नात्यातले बदल आपण सहज स्वीकारले. लग्नाने तयार होणाऱ्या नात्यांच्या बाबतीत मात्र मन थोडे मागे रेंगाळते आहे. तिथे पारंपरिक भूमिका मनात घर करून आहेत. या पारंपरिक चित्राला, समर्पण आणि अतिरेकी त्यागाला सिनेमा, कथा, कादंबऱ्यांनी प्रेमाचा साज चढवला. त्यामुळे या चित्राचा प्रत्येक पिढीतल्या तरुणतरुणींनाही मोह पडतो. आपले नाते असेच असावे असे प्रत्येकाला वाटते, पण त्या पडद्यावरच्या गोष्टी आहेत. खऱ्या आयुष्यात माणसे अशी एकरूप होऊ शकत नाही. ‘दो जिस्म मगर एक जान है हम’ वगैरे काव्यातच होऊ शकते. स्त्री असो की पुरुष कुणालाही आपल्या जन्मजात वृत्ती आणि बालपणापासून तयार झालेले व्यक्तिमत्त्व अचानक टाकून देता येत नाही. दोघांनाही एकमेकांसाठी स्वत:त बदल करावे लागतात. ही पटकन होणारी गोष्ट नाही. यादी करून ‘तू हे बदल कर मी हे बदल करीन’ असे होत नाही. हळूहळू दोघांची मिळून एक मध्यम जीवनशैली तयार होते. त्यासाठी थोडा काळ जावा लागतो. प्रथम एकमेकांना आहे तसे स्वीकारायला हवे, समजून घ्यायला हवे. लग्नानंतर अनेक गोष्टी बदलतात हे मान्य करायला हवे. विशेषत्वाने मुलांना हे लक्षात घेऊन (consciously) करावे लागते. ‘तिच्या एकटीसाठी सगळे घर बदलणार नाही.’ या पद्धतीचा विचार केला तर सहजीवन फुलू शकणार नाही. लग्नानंतर जीवनशैली बदलते, दिनचर्या बदलते. फुलपाखरी जगण्यावर बंधने येतात. बाकीचे नातेसंबंधही थोडे थोडे हलतात. कारण पतीपत्नीचे नाते हे नवीन असले तरी प्राथमिकतेत सर्वात वर येते. बाकीची नाती तुटत नाहीत की पातळही होत नाहीत. ती व्यक्त करण्याची पद्धत थोडी बदलते इतकेच. असे बदलणे ही कमीपणा वाटण्याची गोष्ट अजिबात नाही. आजवर दोघे आपल्या आपल्या वाटेने चालत होते. आता दोघांनाही एका सामायिक वाटेवरून हातात हात घालून चालायचे आहे. त्यासाठी दोघांनाही एकमेकांच्या दिशेने आपली वाट वळवून घ्यायची आहे.
शहरी धावपळीतून अशी वाट बनवण्यासाठी काही जण ‘चहा एकत्रच प्यायचा.’ ‘दर रविवारी फिरायला जायचेच.’ असे काही नेम करतात. केवळ पतीपत्नीनेच नाही तर घरातल्या सगळ्यांनीच एकत्र बसून चहा-कॉफी पिणे, गप्पा मारत बसणे, फिरायला जाणे या गोष्टींना नात्याच्या दृष्टीने खूप महत्त्व आहे. म्हणून काही त्याचे टाइमटेबल बनवून नियम बनवायचे नाहीत. त्यात लवचीकता हवी. ‘आज नवरा माझ्यासाठी चहा प्यायला थांबला नाही.’ ‘मी घरी आलो तर बायको घरात नव्हती.’ असल्या गोष्टींचा बाऊ करू नये. सरुवातीच्या नवलाईच्या काळात हे ठीक असते. त्यावेळी हे रुसवे गोड वाटतात, पण कायमच या गोष्टी ताणत राहिले, तर त्यांची बेडी बनते. हळूहळू नात्याचा आधार वाटण्याऐवजी ओझे वाटू लागते.
सर्वात जवळचे असलेले हे पती आणि पत्नी. इतरांच्या दृष्टीने ते एकच युनिट असते. त्यांच्या चांगल्या-वाईट दोन्ही गोष्टींचे धनीपण एकत्र मोजले जाते. एक युनिट असले तरी त्या दोन स्वतंत्र व्यक्ती आहेत. दोन व्यक्ती म्हटल्यावर मतभेद आणि वाद होणारच. आपण आपल्या माणसाशीच वाद घालतो. फक्त वाद घालताना भान ठेवायचे की जोडीदाराच्या भावना आणि मतेसुद्धा आपल्याइतकीच सच्ची आहेत. विरोध करताना चांगल्या शब्दांत करावा. आपले माणूस आहे म्हणून कसेही बोलू नये. कुठल्याही प्रसंगी एकमेकांना डावलल्याची, टाळल्याची किंवा मूर्खात काढल्याची भावना होईल असे बोलू नये. असे झाले तर नात्यावर पुसता न येणारा ओरखडा येतो.
हे नाते असे आहे की दोन माणसांमधल्या प्रत्येक नात्याचा प्रत्येक गुण आणि अवगुण या नात्यात आहे. म्हणून तर या नात्यावर बोलावे तितके कमीच ठरते. पतीपत्नीचे नाते ही तीन पायांची शर्यत नाही, त्या दोघांना हातात हात गुंफवून चालायचे आहे. त्यांची वाट एका घरकुलाकडे जाते. या घरकुलाच्या भिंती असतात प्रेम, सहकार्य, विश्वास, आदर यांच्या. या भिंती संसाराला ऊब देतात.

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link