Next
रिटेल क्षेत्राचा वाढता व्याप
नम्रता ढोले-कडू
Friday, May 31 | 02:00 PM
15 0 0
Share this story


रिटेल इंडस्ट्री हे खूप व्यापक क्षेत्र आहे. डिपार्टमेंटल स्टोअर्स, शॉपिंग मॉल्स, नामांकित ब्रॅण्ड्सची आऊटलेट्स या ठिकाणी ‘रिटेल मॅनेजमेंट’ आवश्यक असते. अनेक विद्यार्थ्यांना करिअरचा पर्याय म्हणून हे क्षेत्र अजून माहीत नाही. एक्स्पोर्ट हाऊसेस, डिपार्टमेंटल स्टोअर्स, मॅन्युफॅक्चरर्स, मार्केटिंग करणाऱ्या संस्था, आय.टी. आणि बी.पी.ओ., शैक्षणिक क्षेत्र, प्रकाशनसंस्था, क्रीडा आणि आरोग्यसेवेतील उत्पादनांची उत्पादनप्रक्रिया अशा कित्येक ठिकाणी या क्षेत्रातील नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत.
विविध रिटेल आऊटलेट्स ही अत्यंत व्यावसायिक दृष्टिकोनातून आणि त्या क्षेत्रातील तांत्रिक कौशल्य असणाऱ्या व्यक्तींकडून चालविली जात असतात. यात बड्या दुकानांतील वस्तूंची रचना, आकर्षक मांडणी, विक्री, इन्व्हेंटरी, वस्तूंची साठवणूक आणि पुरवठा, विक्री वाढविण्यासाठी प्रमोशन आणि जाहिरात-प्रसिद्धी अशा सर्व गोष्टी अंतर्भूत होतात. आज व्यापाराचे कोणतेही क्षेत्र हे रिटेलशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. सतत नवीन कंपन्या, नवे ब्रँड बाजारात येत असतात. सरकारकडून स्टार्ट अप कंपन्यांना प्रोत्साहन दिले जात आहे. त्यामुळे सर्वच क्षेत्रांत ‘रिटेल बिझनेस’मधील नोकरीच्या संधी वाढत चालल्या आहेत.
मुंबई विद्यापीठाच्या गरवारे व्यावसायिक प्रशिक्षण संस्थेद्वारे तीन वर्षे कालावधीचा ‘डिप्लोमा इन रिटेल मॅनेजमेंट’ हा पूर्णवेळ अभ्यासक्रम चालविला जातो. कोणत्याही शाखेतून बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना या पदवी अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेता येतो. याशिवाय याच संस्थेत कोणत्याही शाखेच्या पदवीधारक विद्यार्थ्यांसाठी एक वर्ष पूर्णवेळ अभ्यासक्रम चालविला जातो. मुंबईतील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ रिटेल मॅनेजमेंट (NIRM), वेलिंगकर इन्स्टिट्यूटमध्येदेखील याविषयीचे अनेक पार्ट टाइम कोर्सेस उपलब्ध आहेत.
हे एक सेवाक्षेत्र आहे आणि यात उद्योजकतेलाही खूप वाव आहे. या विषयात शिक्षण घेणारे विद्यार्थी पुढे स्टोअर मॅनेजमेंट, खरेदी-विक्री व्यवस्थापन, रिटेल व्यवस्थापन, मार्केटिंग मॅनेजमेंट, प्रॉडक्ट प्लॅनिंग, मार्केट रिसर्च, लघुउद्योग व्यवस्थापन, उत्पादनाची विक्रीच्या दृष्टीने सजावट (डिस्प्ले), प्रमोशन आणि डिस्ट्रिब्युशन, इ-टेलिंग अशा विविध प्रकारची कामे करू शकतात.
इ-टेलिंग म्हणजे काय, तर ऑनलाइन रिटेल व्यवस्था, जी तंत्रज्ञानाच्या साहाय्याने मार्केटिंग आणि रिटेलक्षेत्र यांना जोडते, तिला इ-टेलिंग असे म्हटले जाते. भारतात या क्षेत्राला विस्तारण्याची भरपूर संधी आहे. सध्या या क्षेत्रात करिअरसाठी उत्तम संधी आहेत. येथे कुशल मनुष्यबळाची अत्यंत आवश्यकता आहे.
सुपरमार्केट्स, होलसेल दुकाने, कॅश अँड कॅरी सुविधा, हायपर मार्केट्स यामध्ये कौशल्यपूर्ण काम करणाऱ्या व्यक्ती या हव्याच असतात. या क्षेत्रात डिप्लोमा, डिग्री, मास्टर्स आणि डॉक्टरल प्रोग्रॅम्स भारतातील तसेच परदेशातील अनेक संस्थांकडून चालविले जातात. या विषयातील व्यावसायिक शिक्षण घेतलेल्या युवकांना विविध पदांवर संधी मिळू शकते. रिटेल मॅनेजर, फ्लोअर मॅनेजर, इन्व्हेंटरी मॅनेजर, शॉपिंग ऑपरेशन मॅनेजर, कस्टमर सर्व्हिस अशा अनेक पदांवर तुम्ही काम करू शकता. आर्थिक उत्पन्नदेखील चांगले मिळते.
बारावीनंतर हा अभ्यासक्रम पूर्ण करता करता नोकरी करता येते. आर्थिक परिस्थिती बेताची असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी तर हा दिलासादायक करिअरपर्याय आहे.
या क्षेत्रासाठी आवश्यक कौशल्ये-
 • जबाबदारीने काम तडीस नेण्याची इच्छा आणि त्या दृष्टीने प्रामाणिक प्रयत्न करण्याची तयारी असणे हा अत्यंत आवश्यक गुण!
 • खरेदी, विक्री यांच्या आकडेवारीशी संबंध येत असल्यानेे त्यात रस आवश्यक.
 • घाऊक खरेदी कमीत कमी किमतीत करण्याचे कौशल्य, वस्तूंच्या विविध प्रकारांचे ज्ञान, बाजारातील घडामोडींचे विश्लेषण करण्याची कला अंगी असणे गरजेचे.
 • संघभावनेने काम, सकारात्मक ऊर्जा ही  महत्त्वाची कौशल्ये हवीतच.
 • प्रसन्न व्यक्तिमत्त्व आणि दिलखुलास संवाद साधण्याची कला अवगत हवी.

या क्षेत्रातील खाचाखोचा -
 • कुशल मनुष्यबळाची कमतरता ही मोठी समस्या या क्षेत्रात आहे. करिअरसंधी व शिक्षणाचे पर्याय माहीत नसल्याने अनेक विद्यार्थी  या क्षेत्राकडे वळत नाहीत.
 • या क्षेत्रात काम करायचे तर सुरुवातीला ९-१० तास सतत उभ्याने काम करावे लागते. ही वाटते तितकी सोपी गोष्ट नक्कीच नाही. सुरुवातीच्या काळात हे थोडे कठीण जाते. मात्र आपल्याला कामाची गोडी लागली की याची जाणीव होत नाही. आणि तुम्ही वरच्या पदांवर पोचलात की हे कष्ट कमी होतात.
 • या क्षेत्रात तुम्हाला ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सतत नावीन्यपूर्ण कल्पना राबवाव्या लागतात. व्हिजुअल मर्कंटाइल म्हणजे विक्रीच्या वस्तू दुकानात आणि विंडो डिस्प्लेसाठी आकर्षक पद्धतीने रचून ठेवणे, हीही एक कष्टसाध्य कला आहे.
 • सध्या ऑनलाइन मार्केटिंगचा जमाना आहे, त्यामुळे आता व्हर्च्युअल ट्रायल रूम्सच्या साहाय्याने आपण हव्या त्या वस्तू खरेदी करण्याआधी संगणकावर करून बघू शकतो. अनेक मोठे ब्रॅण्ड्स ‘डू इट युवरसेल्फ’सारख्या संकल्पना घेऊन येताहेत, ज्यात ग्राहकाला आपल्या आवडीनुसार वस्तू डिझाईन करता येते.
 • ग्राहकांच्या गरजा ओळखून त्यांच्या जीवनशैलीला अधिक सुखकारक बनविण्यासाठी आपले उत्पादन कसे योग्य आहे, हे ग्राहकांना पटवून देणे, त्यांच्या तक्रारींचा योग्य पाठपुरावा करणे, शंकानिरसन करणे या सर्व बाबी कस्टमर सर्व्हिस या संकल्पनेत आहेत. त्या करता यायला हव्यात.
 • पूर्वी आपण दुकानांत प्रत्यक्षात जाऊन खरेदी करत होतो. आता ऑनलाइन शॉपिंग, स्मार्ट फोनवरून खरेदीचेे प्रमाण खूप वाढत चालले आहे. विविध वेबसाइट्सवरून, ब्लॉग्जच्या माध्यमातून उत्पादने विकली जात असल्याने त्या वेबसाइट्सचे सेटअप करणे, अॅप बनविणे हाही कामाचा भाग बनला आहे. त्यामुळेच रिटेल इंडस्ट्रीत आणि अभ्यासक्रमातही काळानुरूप बदल झाले आहेत.
    रिटेल मॅनेजमेंटच्या क्षेत्रात उत्तम संधी उपलब्ध आहेत. हे क्षेत्र वेगाने विस्तारत आहे. या क्षेत्राचा विचार युवकांनी नक्की करावा.

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link