Next
ॐ कारस्वरूप परब्रह्म
मानसी वैशंपायन
Friday, October 26 | 04:00 PM
15 0 0
Share this story

अनादि अनंत अशा या परब्रह्माला नाव नाही, रूप नाही. सर्वसामान्य लोकांना ते ओळखता यावे, यासाठी श्रुतींनी एक चिन्ह तयार केले, ते म्हणजेच ॐ असे ज्ञानदेव म्हणतात. अशा लोकांना परब्रह्माकडे जाण्यासाठी हा एक आधार आहे, संकेत आहे. यासाठी ज्ञानदेव एक दृष्टांत देतात,

उपजलिया बाळकासी | नाव नाही तयापासीं|  
ठेविलेनि नांवेंसी | ओ देत उठी ||


नवजात बालकाला कोणतेही नाव नसते. त्याला नाव ठेवल्यावर त्या नावाने हाक मारताच ते प्रतिसाद देते. तसे ॐ हे परब्रह्माचे ठेवलेले नाव आहे. ॐ उच्चारताच निर्गुणनिराकार परब्रह्मापर्यंत ती हाक पोहोचते. संसाराच्या तापाने पोळलेल्या, शिणलेल्या लोकांना आपले गाऱ्हाणे देवापर्यंत न्यायचे असते. त्या लोकांना प्रतिसाद देणाऱ्या नावाची खूण म्हणजे ॐ असे ज्ञानदेव म्हणतात. पुढे ज्ञानदेव ॐ हे गणेशस्वरूप आहे, याचेही वर्णन करतात.

मंत्र हे भारतीय संस्कृतीचे वैभव मानले जाते. मंत्रउच्चारणातून शक्तीचा उगम होतो. ‘ज्याचे सतत मनन केल्याने आपले रक्षण होते तो मंत्र’ अशी मंत्राची व्याख्या केली जाते. विविध मंत्रांमध्ये ॐ हा मंत्र सर्वश्रेष्ठ असून साडेतीन मात्रांचा हा लघुत्तम मंत्र परिणामकारक ‘ध्वनी’ व महान ‘अर्थ’ या दोन्ही गुणांनी संपन्न आहे. म्हणून तो प्रभावशालीदेखील आहे. ॐकाराचा उच्चार करताना त्यात कंपने, घुमारा, स्पंदने, आघात, माधुर्य हे सारे अंतर्भूत असते. ॐकाराचा जप त्याच्या अर्थासह व सात्त्विक भावनेसह केल्यास साधकाला दिव्य व सूक्ष्म आध्यात्मिक लाभ मिळू लागतो.

ॐ या एकाक्षरी मंत्रात अ, उ, म हे तीन वर्ण सामावलेले आहेत. ‘अ’ची एक मात्रा, ‘उ’ची दुसरी मात्रा, ‘म’ची तिसरी मात्रा व अनुस्वाराची अर्धमात्रा मिळून एकूण साडेतीन मात्रा होतात. ॐकाराचा उच्चार करताना उ+उ =ओ असा एकत्र उच्चार करावा लागतो. ‘ओ’चे उच्चारस्थान आहे कंठ व ओठ. ‘म’चे उच्चार स्थान आहे ओठ. अनुस्वाराचा उच्चार नाकातून होतो. म्हणजेच ॐकार उच्चारताना कंठ, ओठ आणि नाक यांचा उपयोग केला जातो.

ॐकार उच्चारण्यासाठी ‘ओ’ व ‘म’चे प्रमाण किती असावे याबाबत विविध मते आहेत. ॐकार उच्चारण्याच्या एकत्रित वेळात एकतृतीयांश वेळा ‘ओ’च्या उच्चारणास व दोनतृतीयांश वेळ अनुस्वारासह ‘म’च्या उच्चारणासाठी द्यावा. यातून निर्माण होणाऱ्या ‘ध्वनिलहरीकंपने आणि स्पंदने’ यामुळे मेंदू, शीर्षस्थ व कंठस्थ ग्रंथी, विविध नाड्या, ज्ञानेंद्रिये यांना चैतन्य लाभते व त्यांचे कार्य पूर्ण क्षमतेनिशी होऊ लागते. विविध मनोकायिक लाभ होतात. शरीर व मन, शांत, सुखी होऊ लागते.

परमहंस योगानंद यांनी थोडी वेगळ्या प्रकारची ॐकारसाधना सांगितली आहे. ध्यानाच्या एका विशिष्ट अवस्थेत पंचज्ञानेंद्रिये पूर्णपणे अंतर्मुख होतात आणि थोड्याच वेळात ती शून्य होतात. या अवस्थेत बाहेरच्या कुठल्याही नादाने वा विचारतरंगाने साधक विचलित होत नाही. अशा अवस्थेत प्राणशरीरातील सात चक्रांतून सहजपणे निर्माण होणारे नाद साधकाला ऐकू येऊ लागतात. प्रत्येक चक्राचा नाद निराळा असला तरी सर्व चक्रांचा एकत्रित नाद मात्र ॐकारासारखा असतो. पूर्णपणे अंतर्मुख होऊन हा ॐकारनाद साधकाने ऐकावा. कारण येथे वैखरी वाणीने ॐकारजप करणे अभिप्रेत नाही.

माणूस हा पंचतत्त्वांपासून बनलेला आहे आणि शेवटी पंचतत्त्वांमध्ये विलीन होणार आहे, हे सांगणारी एक कथा आहे. एक मुलगा मंदिरात गेला. त्याने घंटा वाजवली. घंटेतून आवाज आला. त्याने पुन्हा घंटा वाजवली. पुन्हा आवाज आला. असे तीन-चारवेळा केल्यानंतर त्याने पुजाऱ्याला विचारले, ‘हा आवाज कुठे गेला?’ पुजारी उत्तरला, ‘तो पुन्हा घंटेत गेला.’ मुलाला नवल वाटले. त्याने पुन्हा विचारले, ‘काय! आवाज पुन्हा घंटेत जातो?’ पुजारी म्हणाला, ‘होय, तू कधीही, कितीही वेळा येऊन याचे प्रत्यंतर घेऊ शकतोस.’ मुलाने चार-पाच दिवस रोज मंदिरात जाऊन हा प्रयोग करून पहिला. त्याला समजून आले, की अव्यक्तापासून व्यक्त झालेली सृष्टी पुन्हा अव्यक्तात विलीन होते.

छांदोग्य उपनिषदात आद्यदेवता ॐकार मानली गेली आहे. ॐकार हा एकाक्षरी बीजमंत्र आहे, असे कठोपनिषदात म्हटले आहे, तर ॐकारध्यानाने अध्यात्मध्यान, ब्रह्मज्ञान, आत्मज्ञान प्राप्त होते, असे मुंडकोपनिषदात वर्णन आहे. खोल पाण्याच्या तळाशी शांतपणे पहुडलेला मंडूक म्हणजे बेडूक जसा स्वेच्छेने उडी मारून काठावर येऊन बसू शकतो त्याचपद्धतीने भौतिकात गुरफटलेल्या संसारसागरात खोलवर बुडालेला मूढ मानव ओंकारसाधना निष्ठापूर्वक करत राहिला, तर जीवनमुक्त होऊ शकतो, असे वर्णन यात आहे.

तैत्तरीय व प्रश्नोपनिषदामधेही ॐकारउपासना सांगितली आहे. आपल्या ठायी जे शुद्ध चैतन्य आहे त्याला आपण परमात्मा, ब्रह्म, ईश्वर, देव अशा अनेक नावांनी संबोधत असतो. म्हणजेच या सर्वांचा अनुभव ज्या प्राणाच्या, श्वासाच्या माध्यमातून येत असतो व ते जे काही आहे ते अन्यत्र कोठेही नसून आपल्या आतच आहे. त्याचेच नाव ॐ आहे. म्हणजे आपल्याच अंतर्यामी वसलेल्या प्राणस्वरूपी ईश्वराची ओळख होण्याचा ॐकारसाधना हा राजमार्ग आहे. मानवाने आपल्या उन्नयनासाठी ॐकार ध्यानसाधना करावी, असे पतंजलीऋषी सांगतात..
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link