Next
शाह यांच्या भेटीत ठरली अयोध्यावारी?
प्रतिनिधी
Friday, November 23 | 04:00 PM
15 0 0
Share this story

भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्या मातोश्रीभेटीतच शिवसेनेच्या अयोध्यावारीची बीजे रोवली गेली असावीत, अशी शक्यता वर्तवली जात आहे. शिवसेनेने राममंदिराचा मुद्दा हाती घेतल्यामुळे राष्ट्रीय राजकारणात पक्षाचे स्थान मजबूत होईल, अशी आशा सामान्य शिवसैनिकांना वाटत आहे. तर शिवसेनेच्या माध्यमातून राममंदिराच्या मुद्द्यावर रान पेटले, तर त्यात इतर मुद्दे बाजूला सरतील, अशी भाजपमधील नेत्यांचीही धारणा असावी. त्यामुळेच या दोन्ही पक्षांनी अयोध्येत शरयूतीरावर आमनेसामने येण्यापेक्षा समेटानेच राममंदिर निर्माणाचा मुद्दा उचलायचा, अशी खेळी असावी, असे दिसत आहे.

                                    

अयोध्येत गेल्यावर शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी सभा घ्यावी, असा आग्रह पक्षातील नेतेमंडळींकडून होत होता. मात्र तेथे जमावबंदीचे कलम १४४ लागू असल्याच्या कारणास्तव सभा शक्य नसल्याचे सांगण्यात आले. प्रत्यक्षात सभा घेऊन संघर्ष करण्यापेक्षा तेथील धार्मिक नेतेमंडळींशी सलोख्याने आपला जनसंपर्क वाढवावा, असेच उपक्रम शिवसेनेने आखल्याचे दिसत आहे.

उद्धव ठाकरे यांनी २७ जुलै २०१८ रोजी, वाढदिवसाच्या दिवशी एक आवाहन  केले होते, की “मी अयोध्येत जाणार, रामजन्मभूमीचे दर्शन घेणार आणि गंगापूजन करणार. तेथील साधुसंताना भेटणार. या आवाहनानंतर शिवसेनेची राष्ट्रीय राजकारणाच्या नकाशावर चर्चा होईल, अशी अटकळ बांधली गेली. शिवसेनेने हिंदुत्ववादी पक्ष म्हणून ओळख कायम ठेवावी की प्रादेशिक स्तरावरची ओळख, याबद्दल नेहमी संभ्रम असतो. निवडणुका जवळ आल्या की शिवसेना हिंदुत्त्ववादी ही ओळख अधोरेखित करते. गेल्या २३ जानेवारीला बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीच्या दिवशी शिवसेनेची राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. त्यावेळच्या कार्यक्रमात उद्ध्व ठाकरे यांनी स्वबळाचा नारा दिला.  त्यानंतर ते कायमच त्याचा पुनरुच्चार करत राहिले. त्यानंतरच भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. ही भेट बंद दरवाजाआड झाली होती. त्यावेळी राज्यात शिवसेना-भाजप युती करण्यावर तत्त्वतः शिक्कामोर्तब झाले, अशी माहिती मिळाली. त्याच बैठकीत हा राममंदिर फॉर्म्युलाही ठरला असावा, अशी शक्यता आता वर्तवली जात आहे.

शिवसेनेने राममंदिराचा मुद्दा पुढे आणायचा, त्यामुळे पुढील काळात आंदोलने-मोर्चे होतील व भाजपला लोकांच्या दबावामुळे राममंदिराचा अध्यादेश काढण्याचे मान्य करावे लागेल व त्यास शिवसेना पाठिंबा देईल, असे सूत्र  तयार झाले असावे.

राफाल प्रकरण, नोटाबंदी या प्रकरणांवरून मोदी सरकारच्या झालेल्या कोंडीतून बाहेर पडण्यास भाजपलाही हे सोयीचे जाईल, असा विचार सध्या भाजपमध्ये असावा. नोटाबंदीवरून मोदी सरकारला टीकेच्या भडिमाराला सामोरे जावे लागले, तेव्हा प्रत्येक वेळी शिवसेनेनेही टीका करण्याची संधी सोडलेली नाही. या सर्व मुद्द्यांना बाजूला करणे भाजपपुढेही आव्हान आहे. त्यामुळेच या मुद्द्यांवर पडदा टाकण्यासाठी राममंदिरासारखा भावनिक मुद्दा चुर्चेत आणायचा आणि परिस्थिती बदलायची आणि निवडणूक जिंकण्याचा मार्ग निर्वेध करायचा, असा प्रयत्न तर नाही ना, अशी चर्चा आहे.

सुरक्षिततेचे कोणतेही प्रश्न निर्माण होऊ नयेत, याची या दौऱ्यात उध्दव ठाकरे यांनी काळजी घेतली होती. महिला आघाडीच्या कार्यकर्त्या व युवा सैनिकांना महाराष्ट्रातच थांबण्याचे आदेश देण्यात आले. त्याऐवजी महाराष्ट्रातच कार्यक्रम घेण्यात आला. त्याचा शिवसेनेला निवडणुकीत फायदा होऊ शकतो, असे गणित त्यामागे होते. आपला पक्ष राष्ट्रीय राजकारणात आल्यास त्याचा निवडणुकीत लाभ मिळेल, असे गावोगावच्या शिवसैनिकांनाही वाटते.

 राममंदिर न्यासाचे अध्यक्ष जन्मेन्जयशरनजी महाराज यांनी उद्धव ठाकरे यांना मुंबईत अयोध्येचे निमंत्रण दिले होते. शिवसेनेशिवाय राममंदिर पूर्ण होऊ शकत नाही आणि अयोध्या हा शिवसेनेचा गड आहे, असे वक्तव्य त्यांनी केले. आता आमचे हिंदुत्व तुमच्यापेक्षा ज्वलंत, असे दाखवण्याचा शिवसेनेचा प्रयत्न यशस्वी होतो का, त्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.  

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link