Next
मन सुखावले, पण…
विशेष प्रतिनिधी
Friday, July 05 | 04:00 PM
15 0 0
Share this story

गेल्या आठवडाभरापासून पावसाने महाराष्ट्र आणि विशेषत: मुंबई ओलीचिंब करून टाकली आहे. जूनच्या शेवटच्या दिवसापर्यंत उन्हाने काहिली होत असल्याने लोक पावसाची आतुरतेने वाट पाहात होते, त्यामुळे जुलैच्या पहिल्या दिवसाच्या पावसाने सर्वांचे मन सुखावले होते, पण पावसाने सुखाचा जरा अतीच मारा केला आणि मुंबईकरांचे जीवन पहिल्याच फटक्यात विस्कळीत झाले. नुसते विस्कळीत झाले असे नाही तर त्याने मुंबईबरोबरच पुण्यात आणि कोकणात हाहाकार उडवून अनेक बळीही घेतले. मुंबईची अशी दाणादाण उडाली की त्याला कोण जबाबदार याची नित्य होते तशी चर्चा झाली आणि दोषारोपांचा मोसमही सुरू झाला. परंतु मुंबई दाटीवाटीच्या अशा टोकाला पोहचली आहे, की तेथील समस्यांसाठी कोणत्या एका घटकाला जबाबदार धरणे अवघड व अन्यायाचे आहे. दररोज हजारो लोकांचे लोंढे आणि शेकडो वाहनांचे ताफे या शहरात दाखल होत असतात. शहरभर सर्वत्र बांधकामांचे पेव फुटले आहे, त्यात मेट्रोच्या बांधकामाने आणखी भर घातली आहे. मुंबई हे समुद्रसपाटीवरचे शहर असल्यामुळे मोठा पाऊस झाला की पाण्याच्या निचऱ्याची समस्या निर्माण होते, त्यामुळे जागोजाग पाणी साचणे अपरिहार्य आहे. मात्र त्यामुळे नागरी जीवन विस्कळीत झाले की मनात असंतोष साचू लागतो व नंतर बांध फुटून तो सैरावैरा धावू लागतो. परिणामी सरकार, महापालिका, रेल्वेयंत्रणा यांच्यावर दोषारोप सुरू होतात. शहर सुरळीत चालवण्याची जबाबदारी या यंत्रणांवर आहे, यात काही शंका नाही, परंतु कुठल्याही यंत्रणांची असामान्य परिस्थिती हाताळण्याची एक विशिष्ट क्षमता असते, त्यापलिकडे ही असामान्य स्थिती गेली तर काहीच करता येत नाही हे गेल्या अनेक पावसाळ्यांनी सिद्ध केले आहे. मुंबई हे एक बेट आहे व हे बेट आपल्या भौगेलिक सीमा ओलांडून विस्तारत आहे, त्यामुळे त्याचे काही दुष्परिणाम होणे साहजिक आहे. आता तर शहरातील नैसर्गिक जंगले कापून तिथे इमारतींची, मेट्रो, बुलेट ट्रेनची बांधकामे सुरू झाली आहेत. आरेचे जंगल येत्या पाच वर्षांत नष्ट झालेले असेल, त्यानंतर बोरीवलीचे राष्ट्रीय उद्यान, येऊरचे जंगल यांचा क्रम लागताना दिसतो आहे. नवी मुंबईतील टेकड्या व डोंगर सपाट केले जात आहेत, याचा पर्यारवणीय प्रकोप येत्या काही काळात होणे अपरिहार्य आहे. याला आपण सगळेच जबाबदार आहोत, त्यामुळे त्याचे परिणाम आपणालाच भोगावे लागतील. ‘झी मराठी दिशा’तील ‘ही वसुंधरा’ या सदरातून आम्ही वाचकांना पर्यारवणाबाबत जागरुक करण्याचा प्रयत्न करीत असतो, परंतु सरकार, बिल्डर व अन्य हितसंबंधी मंडळींना त्याचे काहीही सोयरसुतक नसते. त्याचे परिणाम सामान्य नागरिकांना भोगावे लागतात. नागरिकांनी येत्या विधानसभा निवडणुकीत आपल्या मतदारसंघातील उमेदवारांना मुंबईतील समस्यांबाबत ते काय करत आहेत याची विचारणा केली तरच या समस्यांची जाणीव राजकारण्यांना होईल. मतदारांनी याबाबत लोकप्रतिनिधींना भंडावून सोडले तरच या समस्यांची दखल घेतली जाईल. पावसाच्या आगमनाबरोबरच पंढरीच्या वाऱ्याही सुरू होतात. या काळात भक्तीचाही महाराष्ट्रात पूर येतो. नद्या, ओढे यांचे प्रवाह जसे समुद्रात विलिन होतात तशा महाराष्ट्राच्या विविध भागांतून निघणाऱ्या दिंड्या पंढरीच्या भक्तीसागरात विलिन होतात व एक मंगलमय वातावरण महाराष्ट्राच्या भूमीत पसरते. या मंगलमय वातावरणाचा वेध घेण्याचा प्रयत्न ‘झी मराठी दिशा’ने या अंकात केला आहे, वाचकांना तो आवडेल अशी अपेक्षा आहे.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link