Next
त्यांच्या पोटात दडलंय काय?
समीर कर्वे
Friday, December 28 | 11:52 AM
15 0 0
Share this storyगोव्याच्या दक्षिणेकडील एका किनाऱ्यावर १९९९ साली झालेल्या भारतीय नौदलाच्या युद्धसराव कवायती आजही आठवतात. पहाटे चारपासून आम्ही तिथे जमलो होतो. काळ्या डंगरीमध्ये आलेल्या कमांडोंनी फायरिंग करत त्या किनाऱ्यावर चाल केली. पुढच्याच क्षणाला हवाईदलाच्या हेलिकॉप्टरमधून सैनिकांच्या तुकड्या तिथे उतरल्या. उजाडू लागले तोच क्षितिजावरून किनाऱ्यावर अवतरलेल्या अजस्त्र युद्धनौकांची तोंडे आ वासून उघडली. या नौकांची नावे त्यांच्या अवताराला साजेशीच होती. आयएनएस मगर, आयएनएस घडियाल अशी उभयचर प्राण्यांची नावे. खरोखरच मगरीचे तोंड उघडावे आणि पोटातून काहीतरी बाहेर पडावे, त्याप्रमाणे या नौकेच्या पोटातून एका रॅम्पवरून रणगाडे, ट्रक आणि सैनिकांच्या तुकड्या बाहेर पडल्या. क्षणार्धात त्या किनाऱ्यावर नौदलाच्या युद्धनौकांमधून लष्कराच्या पायदळ व चिलखती दलांचा डेरा दाखल झाला.

अॅम्फिबिअस वॉरफेअर म्हणजेच जल आणि भूमीवरील युद्ध हेच या युद्धनौकांचे कार्य. वेगवेगळ्या युद्धनौकांच्या जगात डोकावताना आज आपण माहिती घेणार आहोत, ती लँडिंग शिपटँक किंवा एलएसटी या नावाने ओळखल्या जाणाऱ्या मोठ्या आकाराच्या श्रेणीतील युद्धनौकांची. दुसऱ्या महायुद्धात फ्रान्सच्या उत्तरेकडील डंकर्कच्या किनाऱ्यावर ब्रिटिश व मित्रराष्ट्रांच्या फौजांना जर्मनांच्या कचाट्यातून बाहेर पडणे किती कठीण गेले होते, ते नुकत्याच येऊन गेलेल्या ‘डंकर्क’ चित्रपटात पाहायला मिळाले. डंकर्क मोहिमेतूनच धडा घेऊन आपल्याला पायदळाच्या तुकड्या व लष्करी सामग्रीची मोठ्या प्रमाणात ने-आण करणाऱ्या युद्धनौकांची गरज तत्कालीन पंतप्रधान विन्स्टन चर्चिल यांनी ओळखली. त्यानुसारच अमेरिकेने लँडिंग शिपटँक या अॅम्फिबिअस प्रकारातील युद्धनौकांचे उत्पादन मोठ्या प्रमाणात सुरू केले. सिसिली, इटली, नॉर्मन्डी आणि उत्तर फ्रान्स येथील मोहिमांमध्ये लँडिंग शिपटँक वापरण्यात आल्या. मित्रराष्ट्रांनी नॉर्मन्डीच्या किनारपट्टीवर सर्वात मोठ्या संख्येने लष्करी तुकड्या, रणगाडे उतरवण्याची पार पाडलेली मोहीम ही नॉर्मन्डी लँडिग्ज म्हणून प्रसिद्ध आहे व त्यातील एलएसटी युद्धनौकांचे कार्य ‘सेव्हिंग प्रायव्हेट रायन’ या चित्रपटातूनही समोर आले होते.ज्या भूभागात किनाऱ्यानजीक बंदरे किंवा धक्के नाहीत किंवा ज्या किनारपट्टीवर गुप्तपणे फौजा उतरवून तो भूभाग काबीज करायचा आहे, अशा ठिकाणी समुद्रमार्गे धडक देणे, हा लँडिंग शिपटँक श्रेणीतील नौकांचा उद्देश असतो. भारतीय नौदलात १९८०च्या दशकात एलएसटी दाखल झाल्या. खासकरून पूर्व किनारपट्टीवर व अंदमान-निकोबार येथील मोहिमा तसेच गरज पडल्यास इतर देशांतील आव्हानांचा सामना ही उद्दिष्टे त्यामागे होती. आक्रमक आघाडी उघडण्याबरोबरच आपल्या फौजांचे किंवा नागरिकांचे स्थलांतर किंवा सुटका हाही उद्देश या नौकांच्या कार्यात असतो.

कोलकात्याच्या गार्डनरीच शिपबिल्डर्स आणि इंजिनीयर्स (जीआरएसई) या गोदीने एलएसटी-एल म्हणजे मोठ्या आकाराच्या श्रेणीतील युद्धनौकाबांधणीत प्रावीण्य मिळवले आहे. या श्रेणीतील भारतीय नौदलाची पहिली एलएसटी आयएनएस मगर जुलै १९८७मध्ये दाखल झाली. त्यानंतर त्याच श्रेणीची दुसरी आयएनएस घडियाल १९९७ मध्ये आली. या दोन्ही नौका ५६०० टनांच्या आहेत. त्यानंतर सन २००७ मध्ये आलेल्या आयएनएस शार्दूल या ५६६५ टनांच्या श्रेणीत आयएनएस केसरी (एप्रिल २००८)  व आयएनएस ऐरावत (मे २००९) या लँडिंग शिपटँकही समाविष्ट झाल्या. आयएनएस मगरने श्रीलंकेतील भारतीय शांतिसेनेच्या ‘ऑपरेशन पवन’मध्ये भाग घेतला होता. त्याचप्रमाणे आयएनएस घडियाल ही सप्टेंबर २०१७ मध्ये बांगलादेशात रोहिंग्या निर्वासितांसाठी ९०० टनांची मदतसामग्री घेऊन चित्तगाँगला गेली होती. आपत्तीकाळातील मदतकार्य किंवा नागरिकांची सुटका करण्याच्या कामातही या नौका वापरल्या जाऊ शकतात.मगर, शार्दूल श्रेणीतील नौकांच्या पुढच्या भागात एक रॅम्प (उतार) तयार केलेला असतो. किनाऱ्याच्या पुळणीवर ही नौका आल्यावर तो उघडतो आणि त्यावरून नौकेच्या पोटात सामावलेले रणगाडे, ट्रक वाळूत उतरतात. त्याचप्रमाणे या नौकेच्या डेकवर चार लँडिंग शिप युटिलिटी क्राफ्ट म्हणजे कमी खोलीच्या किनाऱ्यावरही पोहोचू शकणाऱ्या छोट्या बार्जसारख्या नौकाही टांगलेल्या असतात. नौकेवर दोन हेलिकॉप्टर ठेवण्याची सोय असते. स्वसंरक्षणार्थ रॉकेटलाँचर्स व अन्य शस्त्रसामग्री असतेच. सर्वात आव्हानात्मक काम असते ते म्हणजे साडेपाच हजार टनांची नौका रणगाडे व सामग्रीसह किनारपट्टीलगत आणणे. त्यासाठी विशिष्ट योजना असते. नौकेचे बुड एरव्ही इंग्रजी ‘व्ही’ आकाराचे असते, त्याऐवजी या नौकांचे बुड सपाट असते. ज्यायोगे वाळूत आल्यावर ती कलंडणार नाही. काहीवेळा मागचा नांगर टाकून नौका स्थिर केली जाते. ही नौका कोणत्या किनारपट्टीलगत नेता येईल, याची अगोदरच हायड्रोग्राफी (जलशास्त्र) तंत्रानुसार शास्त्रीय चाचपणी केली जाते. त्यासाठी किनाऱ्याचा कोन (ग्रेडिअन्ट) तपासावा लागतो. पश्चिम किनारपट्टीवर या मोहिमांना अनुकूल किनारे फारसे नाहीत. नौका किनाऱ्याजवळ येते, तेव्हा तिच्या बुडातील बलास्ट टँकमध्ये (वजन समतोलासाठी भरलेले पाणी) पंपद्वारे पाणी भरले जाते, त्यामुळे तिचा पुढचा भाग जड होतो. त्यातील रणगाडे, आदी बाहेर पडल्यावर माघारी फिरताना हे पाणी काढले जाते, ज्यायोगे ती हलकी झाल्याने पाण्यावर तरंगू लागते. त्याचप्रमाणे मागे फिरताना भरतीची कमाल मर्यादा गाठण्यापूर्वी या नौकेला किनारा सोडावा लागतो. अन्यथा ओहोटीमध्ये ती रुतून बसण्याचा धोका असतो. मोठ्या युद्धनौका खोलपाण्यासाठी तयार केलेल्या असतात, एलएसटी मोठ्या श्रेणीतील असूनही बरोबर याउलट भूमिका त्यांना पार पाडावी लागते.

या नौकेवर सैनिकांच्या तुकड्यांची सोय केलेली असल्याने इतरवेळी त्या प्रशिक्षणनौका म्हणून वापरणे सुलभ जाते. आयएनएस मगर ही आता नौदलाच्या दक्षिण कमांडमध्ये प्रशिक्षणनौकेची भूमिका बजावत आहे. 
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link