Next
आला छोटा उन्हाळा
सुधीर थत्ते, नंदिनी थत्ते
Friday, September 27 | 01:45 PM
15 0 0
Share this story

“आपल्याकडचं हवामान तीन प्रकारचं असतं – गरम, जास्त गरम आणि अति गरम, असं विनोदानं म्हणतात,” सोहम म्हणाला.
“तसं तर आपण उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा असे तीन ऋतू मानतो,” सानिया म्हणाली.
“पण येत्या आठवड्यात आपल्याकडचा चौथा ऋतू सुरू होणार आहे. तो म्हणजे ‘ऑक्टोबर हीट’ किंवा ऑक्टोबरमधला छोटा उन्हाळा,” राहुलदादा म्हणाला.
“पावसाळा आणि हिवाळा यांच्यामध्ये हा छोटा उन्हाळा कसा येतो?” आश्चर्याने शाश्वतने विचारले.
“याचं मूळ कारण हे भारतीय उपखंडाच्या आगळ्यावेगळ्या जन्मात आहे,” स्वप्निलदादा म्हणाला, “३० कोटी वर्षांपूर्वी पृथ्वीवर सर्वभूमी (पॅनजिआ) हा एकमेव महाप्रचंड खंड होता आणि पृथ्वीच्या उरलेल्या भागात सर्वसागर (पॅनथलासा) हा महाप्रचंड समुद्र होता. टप्याटप्यात या सर्वभूमीच्या झालेल्या तुकड्यांमधूनच आजच्या सगळ्या खंडांचा जन्म झाला. यातला एक तुकडा म्हणजे भारतीय उपखंड.”
“पण याचा आपल्या हवामानाशी काय संबंध?” अमनाने विचारले.
“एकेकाळी पार दक्षिणेला सध्याच्या अंटार्टिकाच्या जवळ असणाऱ्या भारतीय उपखंडातली हवा तेव्हा प्रचंड गार होती. बराचसा प्रदेश तर बर्फाच्छादितच होता,” तनुजाताई म्हणाली.
“मग आज आपण विषुववृत्ताच्याही उत्तरेला कसे काय?” प्रथमेशने विचारले.
“पृथ्वीच्या पोटातल्या हालचालींमुळे भारतीय उपखंड झपाट्यानं उत्तरेकडे सरकायला लागला,” स्वप्निलदादा म्हणाला, “सरकत-सरकत तो थेट उत्तरेकडच्या प्राचीन युरेशियावर आदळला. ही टक्कर एवढी जोरदार होती की त्यामुळे ‘हिमालयीन पर्वतमाला’ या नावानं ओळखले जाणारे सगळे पर्वत निर्माण झाले. या हिमालयीन पर्वतमालेत हिमालयाबरोबरच अफगाणिस्तानातल्या हिंदुकुश पर्वतापासून ब्रह्मदेशातल्या ह्काकाबो राझीपर्यंतच्या पर्वतांचा समावेश होतो. या पर्वतमालेनं भारतीय उपखंडाभोवती तटबंदी उभारून अफगाणिस्तान, पाकिस्तान, भारत, नेपाळ, भूतान, बांगलादेश आणि ब्रम्हदेश यांनी बनलेल्या भारतीय उपखंडाला पश्चिम आशिया, तिबेट आणि पूर्व आशिया यांच्यापासून वेगळं केलं.”
“या भौगोलिक बदलांचा आपल्या हवामानावर नेमका कसा परिणाम झाला?” मुक्ताने विचारले.
“हिमालयीन पर्वतमालेच्या या तटबंदीमुळे आजूबाजूच्या देशांपेक्षा खूप वेगळं हवामान भारतीय उपखंडात निर्माण झालं,” विद्याताई म्हणाली, “या तटबंदीचे दोन फायदे आहेत. पहिला फायदा म्हणजे, अरबी समुद्र, बंगालचा उपसागर आणि हिंदी महासागर यांच्याकडून येणारे ढग हिमालयीन पर्वतमालेकडून अडवले गेल्यामुळे साधारणपणे जून ते सप्टेंबर या काळात भारतीय उपखंडात पाऊस पडू लागला. यालाच आपण पावसाळा म्हणतो. दुसरा फायदा म्हणजे, या तटबंदीनं उत्तर ध्रुवापासून दक्षिणेकडे येणारे अतिथंड वारे उत्तरेकडेच अडवून धरले. यामुळे भारतीय उपखंड तिबेटप्रमाणे वैराण बनण्याऐवजी उबदार हवामानाचा आणि सुजलाम-सुफलाम प्रदेश बनला आणि अख्ख्या भारतीय उपखंडाचं पर्यावरण सजीवांच्या जीवनाला अतिशय अनुकूल बनलं.”
“पण यातून ऑक्टोबर हीटचा जन्म कसा झाला?” प्रथमेशने विचारले.
“उत्तरेकडून दक्षिणेकडे सरकणाऱ्या सूर्याच्या भारतीय आकाशातल्या ऑक्टोबरमधल्या विशिष्ट स्थानामुळे उन्हानं हवा तापायला लागते,” स्वप्निलदादा म्हणाला, “त्यामुळे भारताच्या भूप्रदेशावरचा पावसाळ्यात कमी झालेला हवेचा दाब पुन्हा वाढायला लागतो. या वाढत्या दाबामुळे नैऋत्य मोसमी वाऱ्यांचा जोर कमी होऊन पावसाळा संपत जातो. पाऊस पडायचा थांबताच हवेतली आर्द्रता कमी होऊन हवा कोरडी होत जाते. तसंच, आकाशातून ढग नाहीसे झाल्यामुळे दिवसभर थेट जमिनीवर पडणाऱ्या उन्हानं तापमान अधिकच वाढायला लागतं. जमीन कोरडी झाल्यामुळे पावसाळी वनस्पती नाहीशा होतात. परिणामी, आपल्याला कोरड्या, गरम हवेचा अनुभव यायला लागतो. त्यामुळे ऑक्टोबरमध्ये दिवसाचं कमाल तापमान २८ ते ३४ अंश सेल्शिअसपर्यंत वर जातं. यालाच आपण ऑक्टोबर हीट म्हणतो.”
“मग छोट्या उन्हाळ्याकडून हिवाळ्याकडे हवामान कसं वळतं?” मुक्ताने विचारले.
“ऑक्टोबरनंतर सूर्याची दक्षिणेकडची वाटचाल सुरूच राहते,” राहुलदादा म्हणाला, “सूर्याचे किरण भारतावर अधिकाधिक तिरपे पडायला लागतात. तसंच, दिवसाची लांबीही कमी-कमी होत जाते. त्यामुळे हवेचं तापणं कमी होऊन हवा गार होत गेल्यानं ऑक्टोबर हीटनंतरचा हिवाळा सुरू होतो.”
“ऑक्टोबर हीटचा प्रभाव सगळीकडे दिसतो का?” सोहमने विचारले.
“ऑक्टोबर हीटचा प्रभाव सगळ्या भारतीय उपखंडावर काही प्रमाणात होत असला तरी तो प्रामुख्यानं महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान आणि मध्यप्रदेश या भागांत त्यांच्या विशिष्ट भौगोलिक स्थानामुळे मोठ्या प्रमाणावर जाणवतो,” विद्याताई म्हणाली, “गेल्या ३० वर्षांत पर्यावरणात झालेल्या बदलांमुळे ऑक्टोबर हीटमध्ये हवेचं वर जाणारं तापमान आणखी वाढायला लागून त्यात सरासरीनं सुमारे पाऊण अंश सेल्शिअसची भर पडली आहे. जागतिक तापमानवाढीमुळे यात उत्तरोत्तर अधिकाधिक वाढ होऊन छोट्या उन्हाळ्याची तीव्रता आणि कालावधीदेखील मोठा होत जाईल, अशी शक्यता हवामानतज्ज्ञ वर्तवतात.”
“ऑक्टोबर हीटचा त्रास टाळण्यासाठी काय करायला हवं?” सानियाने विचारले.
“या छोट्या उन्हाळ्यात काही गोष्टी करणं खूप महत्त्वाचं आहे,” तनुजाताई म्हणाली, “पावसाळ्याच्या काळात भरपूर पाणी पिण्याची आपली सवय मोडलेली असते. पण छोट्या उन्हाळ्यातल्या उष्ण आणि कोरड्या हवेमुळे शरीरातलं पाण्याचं प्रमाण कमी होऊन निर्जलीभवनाचा म्हणजे डिहायड्रेशनचा धोका संभवतो. म्हणून या काळात भरपूर पाणी पिणं आवश्यक आहे. या काळात फिकट रंगाचे, सुती, पातळ कपडे वापरणंही हितावह ठरतं. तसंच, ऐन दुपारचं सूर्याचं ऊन टाळायला हवं. घराबाहेर पडताना पांढरी टोपी किंवा छत्री वापरावी. अशा खबरदाऱ्या घेतल्या तर ऑक्टोबर हीटची बाधा होणार नाही.”
“गेली एवढी वर्षं ऑक्टोबर हीटचा त्रास सहन करतच होते,” ललिताम्मा हसून म्हणाल्या, “पण मधेच येणाऱ्या या छोट्या उन्हाळ्यामागचा निसर्गाचा लाखो वर्षं चाललेला खेळ आजच्या गप्पांमधून उलगडल्यामुळे मला यंदाचा छोटा उन्हाळा सुसह्य वाटेल, हे नक्की!”
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link