Next
हुकमाचं पान!
श्वेता प्रधान
Friday, June 28 | 04:00 PM
15 0 0
Share this story


‘बदमाश कंपनी’मध्ये शाहिद कपूरचा एक डायलॉग आहे; ‘वक्त बुरा हो या अच्छा, एक ना एक दिन बदलता जरूर है’. स्वतः शाहिदच्या आयुष्याला हा डायलॉग कमालीचा लागू पडतो. शाहिद हे चित्रपटसृष्टीचं हुकमाचं पान आहे. ते ज्याच्या हातात असतं, त्याच्या खेळीवर पुढचं यशापयश अवलंबून असतं. म्हणजे इम्तियाज अली (जब वी मेट), विशाल भारद्वाज (कमिने आणि हैदर), अभिषेक चौबे (उडता पंजाब) यांनी हा हुकमाचा डाव असा काही रंगवला, की बॉक्स ऑफिसवर नाणं खणखणीत वाजलं. पण, विकास बहल (शानदार), राजकुमार संतोषी (फटा पोस्टर निकला हिरो) इतकंच काय शाहिदचे वडील पंकज कपूर यांनाही ‘मौसम’मध्ये आपल्या मुलाचा पैलू ओळखता आला नाही. बाकीच्यांचं राहूदे, शाहिदनं तरी स्वतःला फारसं गांभीर्यानं ओळखलेलं नाहीच.

शाहिद - एक आत्मचरित्र
शाहिद कपूरचं खासगी आणि व्यावसायिक आयुष्य बघितलं, तर तो  स्वतःच्याच आत्मचरित्रात काम करतोय असं वाटत राहतं. वर वर पाहता संथ वाटणारं त्याचं आयुष्य प्रत्यक्षात चढउतारांनी भरलेलं आहे. पोरगेलासा दिसण्यावरून झालेली टिंगल, अंगानं भरण्यासाठी केलेली मेहनत, चॉकलेट हिरोची इमेज पुसण्यासाठी प्रयत्न, करिअरमध्ये यश,अपयशाच्या हिंदोळ्यावर सतत हेलकावे खाणं, वादळी प्रेमप्रकरणं, तेरा वर्षांनी लहान मुलीशी लग्न वगैरे सगळं कसं एखाद्या चित्रपटाच्या पटकथेसारखं वाटतं. 

गडद छटा
शाहिदच्या व्यावसायिक प्रवासात तीन वळणं लागतात - एक, सपशेल अपयशी सिनेमांचं, दुसरं, गोंडस भूमिकांचं आणि तिसरं रावडी, रासवट गडद छटेचं. ही छटा त्याला ‘कमिने’मुळे गवसली. बोबडा चार्ली आणि तोतरा गुड्डू या जुळ्या भावंडांच्या जीवनात एका दिवसात घडणाऱ्या थरारक घडामोडी ‘कमिने’ला सुपरहिट आणि शाहिदला अंतर्मुख करून गेल्या. ‘कमिने’ हा केपर थ्रिलर पठडीतला म्हणजे प्रेक्षकांच्या डोळ्यांदेखत नायकाच्या गुन्ह्यांची रोमांचक साखळी उलगडणारा चित्रपट होता. अशा चित्रपटांना आवश्यक असणारा काहीसा तीव्र, उग्र, विक्षिप्त आणि अस्वस्थ नायक शाहिदनं असा काही धरून ठेवला की ती त्याची नवी प्रतिमा म्हणून उदयाला आली.  विशाल भारद्वाजनं पुन्हा एकदा हे ओळखलं आणि विल्यम शेक्सपीयरच्या ‘हॅम्लेट’चं आधुनिक रूपांतर दाखवण्यासाठी शाहिदकडे ‘हैदर’ सोपवला. वडिलांच्या मृत्यूचं रहस्य, आईच्या वागण्यातला बदल, काकानं केलेली बेईमानीनं उद्विग्न झालेल्या हैदरच्या कहाणीला काश्मीरमधल्या राजकीय परिस्थितीची स्फोटक पार्श्वभूमी होती. सर्वोत्कृष्ट नायकाच्या पुरस्कारासह टीकाकारांनी ‘मैलाचा दगड’ म्हणत केलेल्या कौतुकामुळे शाहिदच्या कारकिर्दीला एका भक्कम वळणावर आणून उभं केलं. सुडानं पेटलेला, विफलतेनं वेडा झालेला हैदर ही शाहिदच्या कारकिर्दीतली सर्वोत्कृष्ट व्यक्तिरेखा मानली जाते.

सणकी व्यक्तिरेखांचा उदय
बीभत्स वर्तणुकीला तडाखेबंद संवादांची फोडणी दिली,  ग्लॅमरची धूळ फेकली आणि जगाची पर्वा न करणारा बेछूट, बेभान नायक उभा केला, की त्याच्यासाठी शिट्ट्या, टाळ्या वाजवणारे हात मुबलक असतात. ‘उडता पंजाब’ आणि ‘कबीर सिंग’ या दोन्ही चित्रपटांतल्या शाहिदच्या व्यक्तिरेखांनी हेच सिद्ध केलं. हे दोन्ही चित्रपट जगण्याची भेसूर बाजू दाखवणारे आणि त्यामुळे साहजिकच कलाकाराला आव्हान देणारे. ‘उडता पंजाब’मध्ये दाखवलेल्या भीषण परिस्थितीत शाहिदनं उभा केलेला टॉमी सिंग हा अंमली पदार्थांच्या आहारी गेलेला रॉकस्टारही अंगावर काटा आणणारा होता. निर्व्यसनी असलेल्या शाहिदसाठी व्यसनाधीनतेमुळे बेफाम झालेल्या माथेफिरू गायकाची भूमिका साकारणं सोपं नव्हतं. पण त्यानं ते काम इतकं बेमालूम करून दाखवलं की पुरस्कारांची खैरात तर झालीच, शिवाय ‘उडता पंजाब’ हा त्याच्या कारकिर्दीतला त्यावेळचा सर्वाधिक यशस्वी चित्रपट ठरला.  गडदपासून भेसूरपर्यंतच्या व्यक्तिरेखांमध्ये शाहिद प्रेक्षकांना आवडायला लागला. आताच्या ‘कबीर सिंग’नं हेच सिद्ध केलं. दिलीपकुमारच्या ब्लॅक अँड व्हाइट आणि शाहरूख खानच्या रंगीबेरंगी देवदासशी मिळताजुळता हा कबीर सिंग. त्यात अभय देओलच्या ‘देव डी’चीही झलक. म्हणजे प्रेमभंगानंतरच्या दुःखाचं आणखी एक भेसूर रूप शाहिदनं रंगवलं. तेलुगू चित्रपट ‘अर्जुन रेड्डी’चा रिमेक असणाऱ्या ‘कबीर सिंग’ची तिकिटं हातोहात विकली जाताहेत. हे यश स्वतः शाहिदच्याही ध्यानीमनी नसेल. त्यानं साकारलेला दारूच्या आहारी गेलेला सर्जन, प्रेयसीला मुठीत ठेऊ पाहणारा प्रियकर, तिचं लग्न दुसऱ्याशी झाल्यावर दारू-सिगरेटच्या व्यसनांवर जगणारा उद्विग्न एकलकोंडा, रागावर नियंत्रण ठेऊ शकत नसल्यानं कधीही आणि कोणावरही आगपाखड करणारा सणकी मनुष्य बघण्यासाठी थिएटरमध्ये गर्दी होतेय. त्या व्यक्तिरेखेचा राग, व्यसनं, उद्धटपणा, विक्षिप्त स्वभावाची मिजास बघायला आवडणारे आणि या ‘डार्क ड्रामा’ सपशेल नाकारणारे असे सध्या दोन गट पडलेत. एकीकडे चित्रपटानं शंभर करोडचा व्यवसाय केलाय. डॉक्टरांचं भडक आणि उग्र रूप दाखवल्याची तक्रारही दुसरीकडे दाखल झालीये. ‘कमिने’ व्हाया ‘हैदर’, ‘उडता पंजाब’ ते आता ‘कबीर सिंग’ करता-करता विक्षिप्त, भडक, सणकी व्यक्तिरेखांच्या प्रतिमेत शाहिद अडकतोय की काय, अशी एकीकडे त्याच्या चाहत्यांना आणि समीक्षकांना चिंता वाटतेय.   

कुठे हरवला तो गोंडस चेहरा?
२००३ साली ‘इश्क विश्क’ हा त्याचा पहिला चित्रपट प्रदर्शित झाला, तेव्हापासून शाहिदला चॉकलेट बॉय म्हटलं जाऊ लागलं. शाहिदला मात्र ही उपमा जराही आवडली नाही. परंतु सुरुवातीच्या काळात गोड-गोड प्रेमकथांमधला गोंडस नायक होण्याव्यतिरिक्त त्याला आणखी काही करताही आलं नाही. तरुणी त्याच्या क्युट चेहऱ्यावर फिदा होत्या आणि तरुणांना भुरळ पडली होती त्याच्या डान्सची. हृतिक रोशनसारखा डान्स येणारा आणि शाहरुखसारखा रोमान्स करणारा हिरो अशीही त्याची प्रतिमा बनून गेली. ‘फिदा’, ‘दिल मांगे मोअर’, ‘चुप चुप के’, ‘किस्मत कनेक्शन’, ’तेरी-मेरी कहानी’या प्रेमकहाण्या करून शाहिदला अपेक्षित यश मिळालं नाही. साखरपुडा-लग्न आणि लग्नानंतरचं जीवन रंगवणाऱ्या सूरज बडजात्याच्या ‘विवाह’नं मात्र घवघवीत यश मिळवलं. मात्र त्याचा फायदा शाहिदच्या कारकिर्दीला झाला नाही.  त्यानंतर आला ‘जब वी मेट.’ शाहिदचा शांत, संयमी, प्रगल्भ चष्मिश आदित्य कश्यप कमालीचा भाव खाऊन गेला. परंतु त्याला शोभून दिसणाऱ्या अशा भूमिका परत वाटेला आल्या नाहीत. किंबहुना शाहिदनंही आपल्याला नेमकं काय काय शोभून दिसतं, याचा फारसा विचार त्यावेळी केला नसावा.

ट्रेंडी दाढी


‘जब वी मेट’ची पुनरावृत्ती काही होईना. चित्रपटसृष्टीनं पुन्हा एकदा त्याच्या चिकन्याचुपड्या चेहऱ्याकडे आणि पोरगेलासा दिसण्याकडे बोट दाखवलं. त्यानंतर अचानक त्यानं आपला लूक बदलला. कधी गालाला चिकटून, कधी बोटभर लांब, कधी भरघोस दाढी ठेवायला सुरुवात केली. चेहऱ्यावरचा गोंडस भाव, मिश्किल हास्य दाढीच्या आड झाकलं गेलं आणि वयही जरा परिपक्व दिसायला लागलं. हा नवा ‘मॅचो ट्रेंड’ समजला जाऊ लागला. सोशल मीडियावर हा लूक इतका व्हायरल झाला, की त्याचे फॅन्स आजतागायत शाहिदसारखी दाढी घेऊन वावरतात.   

काही हटके प्रयत्न
‘दिल बोले हडिप्पा’, ‘चान्स पे डान्स’, ‘बदमाश कंपनी’, ‘पाठशाला’ असे काही निराळे प्रयोग त्यानं करून बघितले. ‘आर राजकुमार’सारखा तद्दन मसालापट करून भरपूर नाचूनही घेतलं.बेसुमार अॅक्शन दृश्यांत कपाळापासून पायापर्यंत रक्ताचे पाटही वाहू दिले. मग आला संजय लीला भन्साळीचा ‘पद्मावत.’ तांत्रिक दृष्ट्या बघायचं, तर शाहिदनं साकारलेला राजा रतन सिंग हाच नायक; पण नायकाचं श्रेय रणवीर सिंगच्या नावावर प्रामुख्यानं नोंदलं गेलं. खलनायकी व्यक्तिरेखा असूनही सर्वोत्कृष्ट नायकाचे बहुतांश पुरस्कारही रणवीरलाच मिळाले. असं काहीसं होईल की काय याची शाहरूख खानला कुणकुण लागल्यानं त्यानं आधीच राजा रतन सिंगची व्यक्तिरेखा नाकारली असावी. ‘अभिनयात जिवंतपणा नव्हता’ म्हणत काही टीकाकारांनी शाहिदवर टीकाही केली. ‘पद्मावत’च्या यशाचा म्हणावा तसा फायदा त्याला झाला नाहीच. शाहिदसाठी स्ट्रगल, यशापयशाचे हेलकावे खाणं किंवा एकामागून एक प्रयोग करणं काही नवीन नाही. दहाव्या वर्षापासून त्यानं शामक दावरकडे नृत्याचे धडे गिरवले. ं ‘दिल तो पागल है’, ‘ताल’ या चित्रपटांतल्या गाण्यात शाहिदला हिरोइनच्या मागं ग्रुपमध्ये उभं केलं होतं, तो उभा राहिला. स्ट्रगलच्या काळात ‘मोहनदास बीएएलएलबी’ या मालिकेसाठी साहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करायला सांगितलं, त्यानं केलं. एकमेव नायक असणारे चित्रपट त्याला अभावानंच मिळाले, त्यानं तेही स्वीकारलं. परंतु कारकिर्दीला सोळा वर्षं होऊन गेल्यानंतर स्वतःसाठी भूमिका लिहून घेण्याची वेळ नक्कीच आली आहे. ‘कबीर सिंग’नंतर आपल्या हातात एकही चित्रपट नसल्याचं त्यानं अलिकडेच मुलाखतीत सांगितलं होतं. अभिनय, नृत्य, कॉमेडी, ॲक्शन, प्रयोगशीलता सगळ्यांतच प्रगती करूनही शाहिद जिंकण्याच्या बाबतीत इतका उदासीन का राहिला असेल? हुकमाच्या पानानं स्वतःची किंमत ओळखत ‘अपने पे भरोसा है तो एक दाव लगा ले’  म्हणत आता बाजी पलटायला हवी!

मीरा का मोहन


शाहिद कपूर अरेंज्ड मॅरेज आणि तेही आपल्यापेक्षा तेरा वर्षांनी लहान असलेल्या एका विद्यार्थिनीशी करेल, असं कोणालाही वाटलं नव्हतं. शाहिदला चित्रपटाच्या झगमगाटापासून दूर असणारी साधीसुधी बायको हवी होती. मीरा राजपूतनं ती अपेक्षा पूर्ण केली. शाहिद, मीरा आणि त्यांची दोन मुलं मिशा आणि झैन या चौकोनी कुटुंबाला सोशल मीडियावर चांगलीच लोकप्रियता मिळालीये. कधी नोकरी करणाऱ्या स्त्रियांच्या मातृत्वाबद्दल, कधी स्त्रीवादी विचारांबद्दल, तर कधी बॉलिवूडला प्राणिसंग्रहालय संबोधत मीरानं वादग्रस्त विधानं करायची आणि त्यावर शाहिदनं स्पष्टीकरण देत बसायचं हेही नेहमीचंच झालंय.

घरपण असंही..
शाहिदच्या जन्मानंतर तीन वर्षांनी त्याच्या आई-वडिलांचा म्हणजे पंकज कपूर आणि नीलिमा अझीम यांचा घटस्फोट झाला. पंकज कपूर यांनी सुप्रिया पाठकशी लग्न केलं आणि त्यांना दोन मुलं झाली, पैकी सना हिला आपण शाहिदसोबत ‘शानदार’मध्ये बघितलंय.
नीलिमा अझीम यांनी राजेश खट्टर यांच्याशी लग्न केलं. त्यांचा मुलगा ‘धडक’फेम इशान. सगळ्या भावंडांशी, विशेषतः इशानशी शाहिदचं जिव्हाळ्याचं नातं आहे.

अधुरी कहाणी
करीना कपूरचा उल्लेख केल्याशिवाय शाहिदची कहाणी पूर्ण होऊ शकत नाही. या दोघांची प्रेमकथा चर्चेत होती, आदर्श जोडी म्हणूनही त्यांच्याकडे पाहिलं जात होतं. कोणत्याही क्षणी लग्न करतील असं वाटत असतानाच या दोघांचा ब्रेकअप झाला. व्यावसायिक अहंकार, अमृता राव-शाहिद, करीना-सैफ अशी विविध कारणं यामागे दिली जातात.
‘आंखों में तेरा ही चेहरा’ या म्युझिक अल्बममध्ये झळकलेल्या किशोरवयीन शाहिदचं नाव सहकलाकार ऋषिता भटशी आधी जोडलं गेलं होतं. पुढे करीनाशी ब्रेकअप झाल्यानंतर प्रियांका चोप्रा, विद्या बालन, सोनाक्षी सिन्हा यांचीही नावं शाहिदशी जोडली गेली.

निग्रही
एखादी गोष्ट करायचं ठरवलं, की शाहिद तसूभरही मागे हटत नाही. शाकाहारी होण्याचा निर्णयही त्यानं असाच कट्टर निग्रहानं पाळला. भूमिकेची तयारी करण्याचीही त्याची विशिष्ट पद्धत आहे. ‘कमिने’मध्ये बोलण्यात दोष असलेल्या दोन जुळ्या भावांची व्यक्तिमत्त्वं रंगवायची आहेत म्हटल्यावर त्यानं थेरपिस्टकडे जाऊन या दोषाच्या शारीरिक आणि मानसिक मुद्यांचा अभ्यास केला. पैकी चार्लीच्या भूमिकेसाठी शरीरयष्टी बदलण्यासाठी त्याला एक वर्ष कसून सराव करावा लागला.
‘पद्मावत’चा राजा रतन सिंग होण्यासाठी चाळीस दिवस कठोर शारीरिक मेहनत आणि आणि तितकंच टोकाचं डाएट करून तलवारबाजी आणि इतर युद्धकौशल्यांचंही प्रशिक्षण घेतलं.

अबोल की उद्धट?
शाहिद अबोल वाटत असला, तरी चित्रपटसृष्टीत त्याच्या उद्धटपणाचे किस्से प्रसिद्ध आहेत. ‘चान्स पे डान्स’च्या शूटिंगमध्ये विनाकारण अडथळे आणणं, ‘शुद्ध देसी रोमान्स’ स्वीकारल्यानंतर काही दिवसांनी अचानक तडकाफडकी सोडून देणं, ‘बँग बँग’, ‘गोरी तेरे प्यार में’, ‘वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई दोबारा’ या चित्रपटांसाठी निर्मात्यांना तंगवणं आणि नंतर नकार देणं असं मसालेदार गॉसिप गाजलं होतं. तसंही शाहिदच्या चेहऱ्याकडे बघून त्याच्या मनात चालणाऱ्या घडामोडींचा थांगपत्ता लागत नाहीच!
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link