
नमस्कार, या आठवड्यापासून पुढचे चार आठवडे या सदरातून मी तुमच्याशी गप्पा मारणार आहे. सुरुवातीला थोडी माझ्या गाण्याची पार्श्वभूमी सांगते. माझा जन्म सांगीतिक कुटुंबातच झाला. माझी पणजी तारामती घारपुरे त्याकाळी नाट्यअभिनेत्री होती तर आजी कुसुम शेंडे किराणा घराण्याची ज्येष्ठ गायिका आणि संगीत नाटक अभिनेत्री. छोटा गंधर्वांबरोबर तिने अनेक संगीत नाटकात काम केलेलं आहे. त्यामुळे गाण्याचा वारसा मला घरातूनच मिळाला. लहानपणापासून गाणं कानावर पडत होतंच. माझे वडील संजीव शेंडे हेही उपशास्त्रीय गायक. ठुमरी, दादरा, टप्पा, गझल, भावगीत यात त्यांची मास्टरकी आहे. त्यामुळे हे बाळकडू मला त्यांच्याकडून मिळालं. आमच्या घरात सगळेच कलाकार. छंद म्हणून कुणी गाण्याकडे कधीच पाहिलं नाही. गाणं ही गांभीर्यानं घेण्याची आणि समर्पित होऊन शिकण्याची कला आहे हीच सगळ्यांची भावना होती. आजी, वडील, सावनी आणि मग मीही गाण्यात उतरले. माझी आई मेधा शेंडे हिलाही गाण्याची प्रचंड आवड. घरात कलाकारांची मोट एकत्र बांधून ठेवणं हे खूप अवघड असतं परंतु माझ्या आईनं तिची नोकरी सांभाळून हे शिवधनुष्य लीलया पेललं. मला आठवतंय एकवेळ अशी आली होती की आता नोकरी करायची की मुलींच्या कार्यक्रमासाठी वेळ द्यायचा हे ठरवण्याची! कारण तोपर्यंत आम्ही दोघी कार्यक्रम करू लागलो होतो. त्यावेळी मात्र तिनं तिच्या नोकरीचा त्याग केला आणि पूर्णपणे आमच्या पाठीशी उभी राहिली. नोकरीत तिचं स्वतःच स्थान निर्माण झालेलं असताना तिनं ती सोडणं हा फारच मोठा त्याग होता. मी नेहमी म्हणते की आज मी जी काही आहे त्यामागे तिचा खूप मोठा हातभार लागलेला आहे. बाकी गुरू तर घरातच होते. शिकवणी घेताना बाबा कडक शिस्तीचे गुरू असतात आणि शिकवणी संपली की मग पुन्हा वडिलांच्या भूमिकेत जातात.
आमच्या घरी नेहमी मोठमोठ्या गायक मंडळींचं येणं व्हायचं. प्रभा अत्रे, मालिनी राजूरकर, वीणा सहस्रबुद्धे, शांता शेळके, छोटा गंधर्व, शोभा गुर्टू, पं.अजय पोहनकर असे अनेक मातब्बर कलाकार यायचे. आम्हीही अनेक मोठमोठ्या गायकांच्या मैफालींना जायचो. मी आठ वर्षांची आणि सावनी दहा वर्षांची. त्याही वयात तीन-तीन तास न कंटाळता, चुळबुळ न करता पूर्ण मैफल ऐकायचो. त्यात कुठेही आई-वडील सक्ती करताहेत म्हणून बसतोय असं नसायचं. आम्ही आवडीने बसायचो. जे ऐकत होतो ते आतमध्ये कुठेतरी झिरपत होतं आणि म्हणूनच मला वाटतं की मी त्या प्रवाहात पडणं हे फारच स्वाभाविक होतं.
मी वयाच्या आठव्या वर्षी आजीकडे गाण्याचे धडे गिरवायला सुरुवात केली. तिच्या लक्षात आलं, की ही काळी एक, पांढरी एक, पांढरी दोन या सुरात सहज गातेय. आजीचा सूर काळी पाच किंवा पांढरी सहा होता, जो शास्त्रीय किंवा नाट्यसंगीताला जवळचा होता. माझा सूर चढा आहे हे कळल्यावर तिला वाटलं की, आता हिला एखाद्या पुरुष गायकान शिकवायला पाहिजे म्हणजे तो सूर कायम राहील. मग मी वडलांकडे शिकायला सुरुवात केली. अजूनही मी बाबांकडे शिकते आहेच. त्याबरोबर सावनीकडूनही शिकते. बाबा जेव्हा त्यांच्या शिष्यांना शिकवायचे त्यावेळी मी जरी दुसऱ्या खोलीत खेळत असले तरी माझा एक कान, बाबा आज काय शिकवताहेत ह्याकडे असायचा. इतरांना शिकवत असताना ते जे सांगायचे ते माझ्या चांगलं लक्षात राहतं हे बाबांनाही एव्हाना लक्षात आलं होतं. हिचं आकलन चांगलं आहे, हिचा आवाज त्या पठडीचा आहे तेव्हा बघूया हिला शिकवून असं त्यांना वाटलं. आजीचं म्हणणं त्यांना पटलं होतं. परंतु केवळ आपलीच मुलगी आहे म्हणून नाही तर माझा आवाज खरंच तसा आहे का हे आधी त्यांनी जोखून घेतलं. मला गाण्याची आवड आहे हे माहीत होतं पण खरी आवड आहे का हेही त्यांनी तपासून घेतलं आणि मगच मला रीतसर गाणं शिकवायला सुरुवात केली. शाळा-कॉलेजच्या स्पर्धांमध्ये मी कधी भाग घ्यायचे नाही. कारण मला बाबा नेहमी सांगायचे, ‘स्पर्धेत गाता आलं म्हणजे गाणं आलं असं नाही.’ त्यामुळे आम्ही दोघींनी बालवयात कधीही स्पर्धांमध्ये फारसा भाग घेतलेला नाही.
मला शिकवायला सुरुवात करण्यापूर्वी बाबांनी पहिली अट घातली. ते म्हणाले, “गाण्याची आवड वगैरे ठीक आहे पण तुला गाणं करायचं असेल तर प्रोफेशनली गाणं करावं लागेल. ते जमणार असेल तरच कर. उगाच शिकायचं म्हणून शिकू नकोस. करून बघू, नाहीतर सोडून देऊ असं चालणार नाही. गाणं हे फावल्या वेळेचं काम नाही. पूर्णतः त्यात झोकून द्यावं लागेल. या कलेमध्ये सुरांना शरण जाणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. तरच ती कला कुठेतरी आत्मसात करता येते आणि तुम्हालाही मग ती साथ देऊ इच्छिते. गाणं करायचं तर ते पूर्णत्वास न्यायचा विडा उचलावा लागेल.” बाबांची ही अट मी मान्य केली आणि गाणं शिकण्याचा विडा उचलला. बाबांनी माझा निश्चय पाहिला. मग त्यांच्याकडे रीतसर शिक्षण सुरु झालं. त्यानंतर पुण्यात जेव्हा पहिला कार्यक्रम झाला त्यावेळी माझं खूप कौतुक झालं. पुण्यात कौतुक झालं की आता तो कलाकार कुठेही सुखानं नांदू शकतो असं म्हटलं जायचं. त्या कौतुकानं मला खूप प्रोत्साहन दिलं. लोकांकडून शाबासकीची थाप मिळाल्यामुळे हुरूप वाढला व मला हे करायला आवडतंय ही भावना दृढ झाली. मग पुढचा मार्ग ठरलेला होताच. त्या मार्गावर बाबा सोबतीला होतेच. तसेच रवी दाते, ज्यांच्याकडून मी उर्दू आणि मराठी गझलांचं खास शिक्षण घेतलं तर यादवराज फड यांच्याकडून शास्त्रीय संगीताचं मार्गदर्शन घेतलं, त्यांचीही साथ होती आणि मग वयाच्या सोळाव्या वर्षी एक मोठं वळण आलं ते म्हणजे हिंदी ‘सारेगम’. त्याविषयी बोलेनच पुढच्या भागात...