Next
धाकाच्या गोष्टीची सांगता
मिथिला दळवी
Friday, April 26 | 04:00 PM
15 0 0
Share this story

“रिया, हे काय!” राग आल्यामुळे रियाने तिच्या छोट्या भावाच्या, रौनकच्या हातातलं नवं खेळणं ओढून घेतलं आहे. आईपण रियावर रागावली आहे.
“सॉरी म्हण रिया त्याला!”
पाच वर्षांची रिया सॉरी म्हणायला अगदी टाळाटाळ करते. तिचं काही चुकलं की तिने सॉरी म्हणावं, अशी तिच्या आईबाबांची अपेक्षा असते. तिने सॉरी म्हणावं म्हणून ते जंग जंग पछाडतात, हैराण होतात, रागवतात. पण, ती काही सहसा बधत नाही. मग अशा एखाद्या बागुलबुवाची भीती दाखवली जाते.
“बघ, सांताक्लॉजला नाही आवडत मुलं सॉरी म्हणत नाहीत ते. मग तो आपल्याला ख्रिसमसला गिफ्ट नाही देत.’ आई भात्यातून हत्यार काढते आणि म्हणते, “रौनकला देणार सांताक्लॉज गिफ्ट.”
रियाचा राग आता आणखी अनावर झालेला असतो, पण ती घुश्शातच सॉरी असं पुटपुटते. आईही निःश्वास टाकते. रियाने सॉरी म्हटलं त्यामुळे तिचं आतापुरतं काम झालं आहे असं तिला वाटतं.
रौनकचं खेळणं हिसकावून घेतल्याचा रियाला खरंच खेद वाटतो आहे का?
नाही. सान्ताक्लॉज खेळणी देणार नाही, याचा धाक वाटून तिनं सॉरी म्हटलं आहे. तेही तिच्या इच्छेविरुद्ध म्हटलं आहे. त्यामुळे ती अर्थातच नाराज झाली आहे. आईने कोंडीत पकडल्यासारखं तिला वाटतं आहे आणि म्हणून त्या सगळ्या प्रसंगामध्ये रियाला खेद वाटणं तर दूरच राहिलं, तिला आता चक्क आणखी आणखी राग येतो आहे. या सगळ्या भावना कदाचित रियाच्या वयाला अशा संगतवार सांगता येणार नाहीत, पण तिच्या वागण्यातून ही संगती आपल्याला लावता येते. या सगळ्यातून ती पुढच्या वेळी मनापासून सॉरी म्हणायची शक्यताही खूपच मावळते. शिवाय खेळणं हिसकावून घेणं ही योग्य गोष्ट नाही हे रियाला कळणं, ही मुख्य गोष्ट आता मागेच पडली आहे.
त्यामुळे मुलानां असा तेवढ्यापुरता धाक दाखवण्यातून खरोखरच काय हासिल होतं? असा धाक दाखवायची का गरज वाटते आपल्याला, हे आपण मागच्या भागात पाहिलं होतं. मुलांना एखादी गोष्ट करण्यापासून परावृत्त करायचं असेल, त्यांना चांगल्या-वाईटामधला फरक आपल्याला समजावून सांगता येत नसेल, तेव्हा पोलिस येईल, बुवा बघतोय, देवबाप्पाला नाही आवडणार... असं बरंच काही सांगितलं जातं ... अनेक बागुलबुवे तयार करून धाक दाखवला जातो.
पण मग काय करायचं? बऱ्या-वाईटामधला भेद मुलांना कसा सांगायचा? उत्तर अगदी सरळ साधं आहे. तुम्हाला ती गोष्ट मुलांना करताना पाहून कसं वाटतं, तेच सांगायचं. रियाचंच उदाहरण घेउया. तिने रौनकच्या हातातून खेळणं हिसकावून घेतलं, ही गोष्ट तुम्हाला आवडली नाही. तर तेच सांगायचं.
‘मला नाही आवडलं. मला नाही बरं वाटलं. मी चिडले आहे.’
यातली आपल्या भावनेची जी तीव्रता ( इण्टेन्सिटी) असेल, ती त्या प्रमाणात व्यक्त करायची. (याला ‘आय मेसेज’, (‘I–message’) असं म्हणतात) आणि आपली जी भावना असेल, ती व्यक्त करताना, आपल्या चेहऱ्यावर त्यानुसार भाव उमटतातच. त्यामुळे मूल अगदी लहान असताना, जेव्हा त्याला शब्दांच्या अर्थाच्या वेगवेगळ्या छटांमधला फरक कळत नाही, तेव्हाही आपल्या देहबोलीमधून मुलापर्यंत नेमका मेसेज पोहोचतो. किंबहुना यामुळे मुलांची एखादी कृती पालक म्हणून आपल्याला कशी वाटते, हे अगदी मोजक्या शब्दांत आणि प्रभावीपणे मुलांपर्यंत पोहोचवता येतं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मूल कितीही मोठं झालं, तरी या प्रकारे मुलांशी बोलत राहता येतं. मूल लहान असेपर्यंतच बागुलबुव्याचं तंत्र चालतं आणि मग मुलं मोठी होत जातात तसे नवनवे बागुलबुवे बनवत राहावं लागतं - या सगळ्या अवघड आणि तेवढ्यापुरत्या उपायांमधून आपलीही सुटका होते. यातून आणखी काय साध्य होतं पाहुया. रियानं रौनकच्या हातातून खेळणं हिसकावून घेतलं ही गोष्ट ‘योग्य नाही’, याच्यावर फोकस राहतो. त्याला कुठलेही इतर फाटे फुटत नाहीत ... सॉरी म्हणणे, त्यातूनची रियाची नाराजी, मग बागुलबुवा दाखवावा लागणं इत्यादी.
या मार्गाने मुलांच्या कोणत्याही वयाला आपल्याला आवडणाऱ्या, खटकणाऱ्या, नावडणाऱ्या सगळ्या बाबी आपल्याला मुलांपर्यंत पोहोचवता येतात. मुळात एखाद्या बाबीबर मुलांशी मनमोकळं बोलता येऊ लागलं, की बागुलबुवांमार्फत मुलांना धाक दाखवायची गरजच नाहीशी होऊ लागते. आपल्या शब्दांची बूज आपणच राखू लागलो, की नेमक्या मात्रेचा धाक पोहोचतो मुलांपर्यंत आणि शिवाय मुलांबरोबरच्या संवादाची दारंही उघडी राहतात. पालक म्हणून हेच तर हवं असतं ना आपल्याला! धाकाच्या गोष्टीची सांगता अशीही होऊ शकते की!
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link