Next
लकब
अरुण घाडीगावकर
Friday, February 08 | 04:00 PM
15 0 0
Share this story

ऑक्टोबर १९७५ मध्ये ‘ती फुलराणी’ या नाटकाच्या तालमींना प्रारंभ झाला. बर्नार्ड शॉच्या ‘पिग्मॅलियन’वरून या नाटकाची रंगावृत्ती पु.ल. देशपांडे म्हणजेच भाई यांनी तयार केली होती आणि हे नाटक ‘इंडियन नॅशनल थिएटर’ (आय.एन.टी) व्यावसायिक रंगभूमीवर आणणार होती. भाईंनीच कलावंतांची निवड केली होती. प्रा. अशोक जहागीरदारच्या भूमिकेसाठी सतीश दुभाषी, डॉ. विश्वनाथ जोशीसाठी अरविंद देशपांडे आणि मंजुळासाठी भक्ती बर्वे. या नाटकाच्या तालमी व्हायच्या त्या ‘झारापकर टेलरिंग इन्स्टिट्यूट’च्या इमारतीतील पहिल्या मजल्यावरील हॉलमध्ये. दुभाषी, देशपांडे आणि भक्ती हे प्रमुख कलावंत सोडले तर साहाय्यक कलावंत नोकरदार होते. त्यांना नोकरीत तालीम आडवी येऊ नये म्हणून भाईंनी तालमीच्या वेळा, त्यांच्या सोयीनुसार ठरवल्या होत्या. सकाळी सात ते दहा आणि सायंकाळी सहा ते दहा. मधल्या वेळात नोकरी. साहाय्यक कलावंत आपापल्या नोकऱ्यांवर गेले की भाई दुभाषी-भक्ती-देशपांडे यांचे प्रवेश बसवत. त्यांच्या तालमी घेत.
गंमत अशी, की प्रमुख कलावंत सोडले तर इतर कुठल्याही कलावंताला ‘ती फुलराणी’ हे नाटक नेमकं काय आहे याचा अंदाज येत नव्हता. कारण या नाटकाची पूर्ण नाट्यसंहिता प्रमुख कलावंतांशिवाय इतर कुणाकडेच नव्हती. कलावंतांनाही त्यांच्या त्यांच्या पात्रांचे संवाद वहीत उतरवून दिलेले होते. ‘क्ल्यू’चं वाक्य आणि आपले संवाद चोख पाठ करणं, इतकंच त्यांच्या हातात होतं. खरं तर नाटकाचं सुकाणू भाईंसारख्या रंगधर्मीच्या हातात असताना, त्यांना चिंता करायला काही कारणच नव्हतं. या नाटकाच्या तालमींची आणि भाईंचीही जबाबदारी आय.एन.टी.नं सदाशिव चव्हाण यांच्यावर सोपवलेली होती. आय.एन.टी.च्या दामूभाई जव्हेरी यांचा विश्वास संपादन केलेले चव्हाण, हे भाईंना काही हवं नको ते पाहत असत. सुनीताबाई भाईंची आत्यंतिक काळजी घेत असत. भाईंची आबाळ होता कामा नये, त्यांनी काही तेलकट-तुपकट खायला लागू नये म्हणून त्या दक्ष असत. त्यांची काळजी घेण्याबाबत सुनीताबाईंनी दामूभाईंकडे चौकशी केली तेव्हा त्यांनी सदाशिव चव्हाणांचं नाव सांगितलं. ‘तुम्ही भाईंची अजिबात काळजी करू नका. सदा माझ्या विश्वासातला आहे. तो त्यांची सगळी काळजी घेईल.’

दामूभाईंच्या या विश्वासावर सुनीताबाई भाईंबाबत निश्चिंत झाल्या. तालमींच्या काळात भाई वरळीला ‘आशीर्वाद’ इमारतीत एक खोली भाड्यानं घेऊन राहत होते. तिथून त्यांना तालमींना घेऊन यायचं आणि परत सोडण्याचं कामही सदाशिव चव्हाण करायचे. शिवाय भाईंच्या खाण्यापिण्याची जबाबदारी त्यांच्यावरच होती. चव्हाणही वरळीला सन मिल गल्लीत राहायचे. वरळीत ‘बापूनं घर’ या खाणावळीतून  चव्हाण भाईंसाठी डबा घेऊन यायचे. रात्री तालीम संपली की  चव्हाण, नाटककार सुरेश चिखले यांची मैफल जमायची. अर्थात, भाईच किस्से सांगत आणि चव्हाण-चिखले हे फक्त श्रोते. नशीबवान! त्यावेळी सदाशिव चव्हाण सेंट्रल बँकेत मेडिकल विभागात नोकरीला होते. फावल्या वेळेत आय.एन.टी.मध्ये मिळेल ते काम करायचे. मेडिकल विभागात असल्याने त्यांच्या अंगावर चार खिशांचा पांढरा अॅप्रन असायचा. या खिशांत बऱ्याच वस्तू असायच्या.त्यांच्या दोन्ही हातांचे पंजे खालच्या दोन्ही खिशांत असत. ही सवय त्यांच्या इतकी अंगवळणी पडली होती की नोकरीव्यतिरिक्तही त्यांच्या वेशभूषेत अॅप्रनशैलीचे शर्ट अविभाज्य झाले. ‘ती फुलराणी’च्या तालमीलाही ते या वेशभूषेत येत असत. सदाशिव चव्हाणांचं हे वेगळेपण, त्यांच्या लकबी, वेशभूषा हे सारं भाईंच्या पारखी नजरेनं हेरलेलं होतं.

जेमतेम पाच फूट उंचीच्या या माणसाच्या लकबींचा वापर आपण कुठंतरी करावा, असं भाईंना वाटत होतं, पण जागा सापडत नव्हती. भाईंना जे हवं ते चव्हाण आणून देत असत. मात्र नाटक पूर्णत्वाकडे झुकू लागलं तसं भाईंचं टेन्शन वाढू लागलं. ते सतत नाटकाच्या विचारात असत. भाईंना कधी सामिष भोजनाची इच्छा झाली तर ते चव्हाणांना सांगत.मग रात्री रूमवर, चव्हाण कुणाच्याही नकळत दादरच्या ‘सचिन’मधून माशांचे तळलेले दोन तुकडे भाईंसाठी घेऊन जात. हा चोरीचा मामला असे. एकदा रवींद्र नाट्यमंदिरमध्ये तालमीच्या मध्यंतरात भाईंना भजी खायची तलफ आली. चव्हाणांनी ती गपचूप आणून भाईंना दिली.भाईंनी एक भजं तोंडात घातलं तेवढ्यात सुनीताबाई तिथे आल्या. ते पाहून त्या संतापल्या. ‘भाई, काय हे?’ म्हणत त्यांच्या हातातील भजी त्यांनी उडवली. ‘थूंक ती तोंडातील भजी,’ म्हणत भाईंना ती भजी थुंकायला लावली. या प्रकरणात चव्हाणांना सुनीताबाईंचा तडाखा बसला आणि भाईंना शाब्दिक तडाखा. भाई गप्प राहिले. सुनीताबाईंना त्यांनी उलट उत्तर दिलं नाही की सफाईही! सुनीताबाईंचा फटका खाल्लेले चव्हाण एका बाजूला मान खाली घालून अॅप्रनच्या खालच्या खिशात हात घालून खिशातल्या चावीशी चाळा करत उभे होते. चव्हाणांकडे भाई अपराधी भावनेनं पाहत असतानाच त्यांना कल्पना सुचली. सदाच्या याच लकबीचा वापर करायचा. फुलराणीच्या दुसऱ्या अंकात प्रा. जहागीरदार आपल्या आईला भेटायला घरी जातात तेव्हा त्यांच्या खिशात त्यांनी चिल्लर ठेवून त्याचा नाद करत ‘मातृदेव भव’ असा संवाद दुभाषींना म्हणायला सांगितला. पैसे खुळखुळण्याची ही लकब नाट्यरसिकांनी खूपच भावली. काही नाट्यरसिकांनी त्याचं अनुकरण केल्याचीही उदाहरणं आहेत.

सृजनात्मक दिग्दर्शक असतील आणि त्यातही भाईंसारखे रत्नपारखी असतील, तर छोटीशी लकबही अजरामर करतील!n
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link