Next
अभेद्य लाल भिंत
पुष्कर सामंत
Friday, November 23 | 05:00 PM
15 0 0
Share this story

चीनची २१ हजार किलोमीटर लांबीची ऐतिहासिक भिंत म्हणजे साऱ्या जगासाठी आकर्षणाचा विषय. चंद्रावरून दिसणारी एकमेव मानवी रचना म्हणजे ही भिंत. युरेशिया, मंगोलिया अशा पूर्व आणि उत्तरेकडून होणाऱ्या परकीय आक्रमणांपासून बचाव करण्यासाठी इसवी सनपूर्व सातव्या शतकापासूनच या भिंतीच्या बांधणीला सुरुवात झाली. पूर्वीच्या सिल्क रूटवरील (रेशीमव्यापाराचा खुष्कीचा मार्ग) व्यापारावर कर आणि इतर नियम लागू करण्यासाठी आखून दिलेली सीमा म्हणूनही या भिंतीकडे पूर्वी पाहिले जायचे. पण मूळ उद्देश होता तो मात्र चीनच्या जनतेचे संरक्षण. परकीय लोक आपल्यावर आक्रमण करतील ही भीती चिनी राज्यकर्त्यांमध्ये तेव्हापासून निर्माण झाली ती आजतागायत आहे. या भीतीतूनच निर्माण झालेल्या आक्रमकतेमधून अनेक अदृश्य अशा भिंती चीनने आजही आपल्या देशाभोवती बांधलेल्या आहेत. या भिंतींमुळेच की काय, चीनच्या भूमीवर अद्याप एकही दहशतवादी हल्ला झालेला नाही.

मुळातच इस्लामी दहशतवादावर चीनने कधीही उघड भूमिका घेतलेली नाही. त्यांच्या कुठल्याच नेत्याने कुठल्याही प्रकारच्या आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर अमुक एका दहशतवादी संघटनेचा किंवा राष्ट्राचा थेट निषेध नोंदवलेला नाही. त्यामुळे कुठल्याही दहशतवादी संघटनेच्या रडारवर चीन असण्याची शक्यता कमीच. त्यातही ऑटोमन साम्राज्याच्या अस्तापासून इस्लामविरूद्ध ख्रिस्ती असे एक छुपे युद्ध सुरू झाले. त्यामुळे दहशतवादाचे लक्ष्य हे कायम पाश्चिमात्य, भांडवलशाही देशच राहिले आहेत. पूर्व आशियातील, विशेषतः चीन, जपान, कोरियासारख्या देशांशी इस्लामी दहशतवादाचे थेट वैर कधीच नव्हते. मुळातच या देशांची (प्रामुख्याने जपानची आणि नंतर चीनची) विस्तारवादी भूमिका ही पूर्वेपर्यंतच मर्यादित राहिली. त्यामुळे मध्य आशियातील मुस्लिमबहुल देशांशी (पूर्वाच्या ऑटोमन साम्राज्याशी) असलेले संबंध हे फक्त व्यापारापुरतेच मर्यादित राहिले. 

चीनवर दहशतवादी हल्ला किंवा देशात घातपात न होण्याचे आणखी एक महत्त्वाचे कारण म्हणजे चीनमधील निधर्मी जनतेची संख्या. चीनमधली जवळपास ७०-७५ टक्के जनता ही ताओइझ्म किंवा स्थानिक देवदेवतांना मानते. पूर्वजांचे स्मरण आणि पूजन यालाच चिनी लोक महत्त्व देतात. त्यामुळे चीनमध्ये या जनतेला निधर्मीच मानले जाते. १५ टक्के जनता ही बौद्ध धर्माचे आचरण करते. उर्वरित जनता ही ख्रिस्ती आणि इस्लाम धर्मांना मानते. हा आकडाच मुळात इतका कमी आहे की त्यातून उद्भवणाऱ्या समस्या या अगदीच फुटकळ असतात. सरकारही कुठल्या एका धर्माला झुकते माप देत नसते. विशिष्ट धर्माच्या, जातीच्या, पंथाच्या वर्गाला गोंजारण्याचे काम चीनमध्ये होत नाही. त्यामुळेच एखाद्या विशिष्ट धर्माचे वर्चस्व नसल्याने इतर कुठल्याही धर्माला असुरक्षित वाटण्याचा प्रश्नच येत नाही. स्वाभाविकच मग त्यातून होणारे धार्मिक तणाव आणि हिंसक उद्रेकालाही खतपाणी मिळत नाही.

या सगळ्याच्या बरोबरच आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे माध्यमांवर असणारे निर्बंध. चीनच्या राज्यघटनेनुसार प्रत्येक व्यक्तीला भाषणस्वातंत्र्य, विचारस्वातंत्र्य आहे. माध्यमांनादेखील हे असे स्वातंत्र्य दिलेले आहे. परंतु चीनमधील माध्यमांसाठी असणारी नियमावली बरीच अपारदर्शी आहे. त्यामुळेच ‘देशाविषयीची गोपनीय माहिती उघड केली आणि देश संकटात आहे’ असा आरोप लावून तिथला अधिकारीवर्ग कधीही कुठलीही बातमी दाबून टाकू शकतो. थोडक्यात माध्यमांच्या नाड्या या तिथल्या अधिकारीवर्गाच्या आणि पर्यायाने सरकारच्या हातात आहेत. त्यामुळे एखाद्या संवेदनशील विषयावरची बातमी छापून आली किंवा प्रसारित झाली तर त्यानंतर होणारी कारवाई ही खूपच कठोर असते. थेट देशद्रोहाचा आरोप लावून त्या व्यक्तीला आणि तिच्या परिवाराला उर्वरित आयुष्य हलाखीच्या परिस्थितीत काढावे लागते. या भीतीमुळेच चिनी पत्रकार, संपादक सरकारच्या थेट विरोधात जाऊन फारसे काही लिहीत नाहीत.

माध्यमांबरोबरच प्रत्येक व्यक्तीच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवण्याचे प्रकारही चिनी सरकारी यंत्रणा करत असते. मुळातच चीनमध्ये गुगल, फेसबुक, ट्विटर, यूट्यूब या पाश्चात्त्य देशांमधून विकसित झालेल्या आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर वापरात असणाऱ्या समाजमाध्यमांवर बंदी आहे. चीनच्या भूमीवर पाऊल ठेवताच या साऱ्या वेबसाइट्स, मोबाइल अॅप्स चालेनाशी होतात. चिनी जनता देशी समाजमाध्यमांचाच वापर करते. एखादी व्यक्ती या अशा व्यासपीठांवर कोणत्या प्रकारचे आशय-विषय कसे हाताळते यावर सरकारी यंत्रणांचा डोळा असतो. यंदाच्या वर्षीच्या मार्च महिन्यातली घटना याबाबत फारच बोलकी आहे. ट्विटरसारखे चीनमध्ये वायपो नावाचे अॅप आहे. त्यावर तरुण-तरुणी व्यक्त होत असतात. दक्षिण-पूर्व चीनमधल्या चचिआंग प्रांतातल्या वूयी शहरात राहणाऱ्या शॉन चांगच्या आईला स्थानिक पोलिसांनी फोन केला. शॉनने चीनचे राष्ट्राध्यक्ष शी चिनफिंग (जीनपिंग असं म्हणत असले तरी खरा उच्चार हा चिनफिंग असा आहे) यांच्यावर टीका करणारी पोस्ट त्याच्या वायपोच्या अकाउंटवर रिपोस्ट केली होती. ही पोस्ट चांगली नाही आणि ती त्वरित काढून टाकण्यात यावी यासाठी पोलिसांनी शॉनच्या आईला फोन केला होता. विशेष म्हणजे शॉनने ही पोस्ट कॅनडातल्या व्हँकुव्हरमधून केली होती. याचाच अर्थ चिनी समाजमाध्यमे वापरणाऱ्या वापरकर्त्यांच्या हालचाली तिथल्या सरकारी यंत्रणा कुठूनही टिपत असतात असाच होतो. घातपात किंवा दहशतवादी हल्ला करायचा असेल तर त्यासाठी परस्परसंवाद, योजनांची आखणी, आर्थिक व्यवहार अशा अनेक बाजू असतात. सरकारी सुरक्षायंत्रणांची संवादमाध्यमांवर अशी घट्ट पकड असेल तर कटकारस्थाने आखण्यावरच अंकुश बसतो. आर्थिक व्यवहारांविषयी बोलायचे झाले तर तिथेही असाच प्रकार आहे. अलिबाबा ही चीनमधली इ-कॉमर्सच्या क्षेत्रातली सर्वात मोठी कंपनी आहे. चीनमध्ये गेल्या काही वर्षांमध्ये ऑनलाइन खरेदी-विक्री आणि व्यवहारांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. या व्यवहारांविषयीचा ऑनलाइन डेटा सरकारी यंत्रणा मागतील तेव्हा त्यांना पुरवण्यात यावा, अशी तरतूदच सरकारने करून ठेवली आहे. या क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या सर्वच कंपन्यांसाठी ते बंधनकारक आहे.

नागरिकांवर पाळत ठेवण्यासाठी चीनने उचललेले नवीन पाऊल मात्र भन्नाट आहे. चीनधल्या अनेक मोठ्या शहरांमध्ये ठिकठिकाणी फेशिअल रेकग्निशन कॅमेरे बसवण्यात आले आहेत. केंद्रीय पोलिसांच्या डेटाबेसमध्ये असणाऱ्या नागरिकांच्या चेहऱ्याशी रस्त्यावर निष्काळजीपणे चालणाऱ्या एखाद्या नागरिकाचा चेहरा जुळत असेल तर त्या नागरिकाचे संपूर्ण नाव, फोटो, त्या नावाशी जोडलेली सर्व प्रकारची आयडी कार्ड याची माहिती रस्त्यावरच लावण्यात आलेल्या मोठ्या स्क्रीनवर झळकते. तसेच गस्तीवर असणाऱ्या किंवा जवळच्याच पोलिस स्टेशनला त्याविषयी कळवण्यातही येते. शनचनसारख्या शहरांमध्ये तर ही माहिती समाजमाध्यमांवर प्रसारित करण्यात येते. फुचिआन प्रांतातल्या फूचाऊ शहरामध्ये तर ती व्यक्ती ज्या ठिकाणी काम करते तिथल्या वरिष्ठांपर्यंत ही माहिती पोहोचवली जाते. काही ठिकाणी तर पोलिसांना फेशिअल रेकग्निशन ग्लासेस/चष्मेही पुरवण्यात आले आहेत. आजूबाजूला वावरणाऱ्या नागरिकांमधील संशयित नागरिक किंवा वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या नागरिकांची माहिती त्वरित त्यांच्या काचेवर झळकते. या अशा चष्म्यांचा वापर करून आतापर्यंत चीनमध्ये वाहतुकीपासून मानवी तस्करीपर्यंत अनेक गुन्हेगार शोधण्यात मदत झाली आहे.

मात्र गेल्या काही वर्षांपासून चीनच्या पश्चिमेकडील शिनचिआंग (ऊईघूर) प्रांतामध्ये सारे काही आलबेल आहे असे म्हणता येणार नाही. शिनचिआंग हा चीनमधला एकमेव मुस्लिमबहुल प्रांत. कझाकस्तान, किरगिझस्तानशी याच्या सीमा जोडलेल्या आहेत. तुर्की मुस्लीम हे इथले रहिवासी. जगभरात फोफावलेला इस्लामी दहशतवाद आपल्यापर्यंत पोहोचू नये म्हणून चीनने अत्यंत कठोर पावले उचलली आहेत. शिनचिआंगमध्ये चिनी सरकारी यंत्रणांनी ‘व्होकेशनल प्रशिक्षणा’ची केंद्रे उभारली आहेत. एक कोटी लोकसंख्या असणाऱ्या या प्रांतातले जवळपास १० लाख नागरिक (बहुतांश तरुण आणि मध्यमवयीन पुरुष) या केंद्रांमध्ये ‘प्रशिक्षण’ घेत आहेत असे चिनी सरकारचे म्हणणे आहे. मात्र प्रत्यक्षात ही केंद्रे म्हणजे छळछावण्या असल्याचे पाश्चिमात्य माध्यमांचे म्हणणे आहे. तिथल्या स्थानिक मुस्लिमांवर चिनी सरकार अत्याचार करत असल्याच्या बातम्या सध्या सर्वत्र प्रसिद्ध होत आहेत. मोहम्मद, जिहाद आणि अराफत ही नावे आपल्या मुलांना ठेवू नयेत असा नियमच चीनने या वर्षाच्या सुरुवातीला काढला आहे. काही वर्षांपूर्वीच मशिदीवरील भोंगे आणि इस्लामी ध्वजावरही चीनने बंधने घातली होती. या सगळ्यामुळेच की काय आयसिसने चीनविरूद्ध युद्ध जाहीर केले. मात्र आतापर्यंत आयसिस चीनच्या जवळपासही फिरकू शकलेले नाहीत.

मुळातच शिनचिआंगमधील कायदेदेखील वेगळे आहेत. कशागर या तिथल्या सर्वात मोठ्या शहरामध्ये रस्त्यावरून चालणाऱ्या कोणत्याही नागरिकाचा मोबाइल फोन पोलीस केव्हाही तपासू शकतात. इतकेच नाही, तर तिथल्या प्रत्येक नागरिकाला त्याच्या मोबाइलवर चिंगवांग नावाचे मोबाइल अॅप इन्स्टॉल करण्याची सक्ती करण्यात आली आहे. हे अॅप मोबाइलमधील फोटो, व्हिडिओ, ऑडिओ, इ-बुक्स आणि इतर फाइल्स स्कॅन करू शकते. आणि काही आक्षेपार्ह आढळल्यास त्याची माहिती केंद्रीय पोलीस यंत्रणेकडे पाठवून देते.

या सगळ्यामध्ये भर म्हणून गेल्या वर्षापासूनच शी चिनफिंग सरकारने अंतर्गत सुरक्षेतील अर्थसंकल्पामध्ये वाढ केलेली आहे. अशी सगळी भक्कम यंत्रणा अस्तित्वात आणि वापरात असताना, धर्माच्या वादात न पडण्याची भूमिका असताना, दहशतवाद्यांना आश्रय देणाऱ्या देशालाही भक्कम अर्थसाहाय्य पुरवत असताना कुठली दहशतवादी संघटना चीनकडे वाकड्या नजरेने पाहील?

 
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link