Next
केदारकडे दुर्लक्ष का?
अमित मधुकर डोंगरे
Friday, October 04 | 04:00 PM
15 0 0
Share this story

इंग्लंडमध्ये झालेल्या बाराव्या विश्वकरंडक क्रिकेटस्पर्धेसाठी भारतीय संघात निवड झाल्यानंतर पुण्याच्या मराठमोळ्या केदार जाधवचे विश्वचषकस्पर्धेत खेळण्याची स्वप्न साकार झाले. केदार जर एकदिवसीय सामन्यांत उपयुक्त खेळी करण्याची क्षमता सिद्ध करत आहे तर टी-२० संघासाठी त्याचा विचार का केला जात नाही, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
महाराष्ट्राच्या रणजीसंघातून भारतीय संघात स्थान मिळवलेल्या केदारला मिळालेली विश्वकरंडकस्पर्धेची संधी कौतुकाची गोष्ट ठरली. १९७५ पासून यंदा झालेल्या विश्वकरंडक क्रिकेटस्पर्धेत खेळणारा केदार महाराष्ट्र रणजीसंघाचा पहिलाच खेळाडू बनला. २६ मार्च १९८५ रोजी जन्मलेल्या केदारने एकदिवसीय संघात २०१४ मध्ये पदार्पण केले. आज त्याच्या नावावर पाच अर्धशतके आणि दोन शतके आहेत. अकराशेपेक्षा जास्त धावा करताना त्याने पाचव्या स्थानावर स्वत:ची उपयुक्तता सिद्ध केली आहे. पुण्यात झालेल्या इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात केदारने सामना जिंकून देणारी शतकी खेळी केली तेव्हाच त्याचे भारतीय संघातील स्थान पक्के झाले. आता तर त्याला विश्वकरंडकस्पर्धेतही संधी मिळाली, कारण या आधी महाराष्ट्र रणजीसंघाच्या खेळाडूंची संघात निवड झाल्यानंतरदेखील अंतिम अकरा खेळाडूंमध्ये संधी मिळालेली नाही. त्यामुळे केदारच्या निवडीला जास्त महत्त्व
प्राप्त झाले.
केदारने २००७ मध्ये क्रिकेट खेळायला सुरुवात केल्यानंतर अनेक चढउतार पाहिले, पण हार मानली नाही आणि प्रत्येक आव्हानाचा यशस्वीपणे सामना केला. त्यामुळेच तो आजचे हे यश बघत आहे. महाराष्ट्र रणजीसंघाकडे गुणवत्ता नव्हती असे नाही, मात्र या गुणवत्तेला कधी संधी मिळाली नाही. भारतीय संघात स्थान मिळवतील असे अनेक गुणी खेळाडू महाराष्ट्राकडे होते, पण निवडसमितीने जी दृष्टी केदारबाबत दाखवली ती याआधी कधीही दाखवली नाही. भारताच्या संघात सातत्याने स्थान टिकवत केदारने ६४ सामन्यांत खेळ केला. नऊ आंतरराष्ट्रीय टी-२० सामने तसेच शंभरच्या वर देशांतर्गत टी-२० सामने खेळून त्याने आपली उपयुक्तता दाखवूनही त्याला नंतर संघात खेळवले गेले नाही. वय त्या खेळाच्या आड येत नाही, मग निवडसमिती का आड येत आहे?
मागे एकदा महाराष्ट्राच्या निवडसमितीने उंचीने कमी असलेल्या मात्र अत्यंत अचूक गोलंदाजी करणाऱ्या एका खेळाडूला संघातून वगळले होते. त्यावेळी कारण देताना सांगितले होते, की त्याची उंची कमी आहे. जगातील सगळेच वेगवान गोलंदाज वेस्टइंडिजच्या गोलंदाजांसारखे ताडमाड उंच कसे असतील? ते जर मैदानावर कामगिरी चांगली करत असतील तर त्यांची उंची कुठे आड येते, पण ही एक शर्यत आहे आणि त्यात स्वत:चे घोडे दामटायचे हे निवडसमितीचे सूत्र आहे. त्यात परत अत्यंत दळभद्री कोटापद्धतदेखील खेळाडू्ंची कारकीर्द वेळेपूर्वी संपण्यासाठी पुरेशी आहे.
केदारकडे आणखी किमान दोन वर्षांचे क्रिकेट नक्कीच आहे. तसे पाहिले तर केदारकडे अफाट गुणवत्ता असूनही त्याचा टी-२० सामन्यांसाठी का विचार केला जात नाही, याचे आश्चर्य वाटते. ऑस्ट्रेलियात पुढील वर्षी होत असलेल्या टी-२० विश्वकरंडकस्पर्धेसाठी नवोदितांना संधी द्यायची व त्यातूनच धोनीचा पर्याय शोधायचा असा निवडसमितीचा दृष्टिकोन आहे. देशांतर्गत तसेच आयपीएल सामने खेळण्याचा केदारचा अनुभव लक्षात घेतला आणि त्याच्या कामगिरीवर नजर टाकली तर खरेतर केदारला पंतच्या जागी अगोदरच संधी मिळायला हवी होती. मागे संघाला गरज होती म्हणून तत्कालीन कर्णधार सौरव गांगुलीने राहुल द्रविडला यष्टीरक्षण करायला भाग पाडून खरेतर त्याची एकदिवसीय कारकीर्द वाचवली होती हा इतिहास निवडसमिती बहुतेक विसरलेली दिसते. निवडसमितीच्या सदस्यांपेक्षाही जास्त सामने केदार खेळला आहे, तरीदेखील निवडसमितीच्या मर्जीवर त्याची निवड अवलंबून आहे, ही खरी खंत आहे. हे चित्र कधी बदलणार?

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link