Next
२४ तासांत चकाचक रस्ता शक्य
विशेष प्रतिनिधी
Friday, October 19 | 03:30 PM
15 0 0
Share this story

खड्डे, रस्त्यांची चाळण, पाणी तुंबणे याबद्दल मुंबई महापालिकेवरील टीकेचा भडिमार काही नवा नाही. परंतु याच मुंबई महापालिकेतील एका तरुण अभियंत्याच्या संशोधनातून चकाचक मजबूत रस्तेबांधणीचे नवे तंत्रज्ञान जन्माला आले आहे. धुळ्याहून मुंबईत येऊन आपले उच्च शिक्षण व पीएचडी पूर्ण करणारे अभियंता डॉ. विशाल ठोंबरे यांनी अवघ्या सात दिवसांत रहदारीसाठी खुल्या होणाऱ्या रस्त्याचे तंत्रज्ञान शोधून काढले. या तंत्रज्ञानास आता इंडियन रोड काँग्रेसची मान्यताही मिळाली असून सात दिवसच नव्हे, तर अवघ्या २४ तासांत रहदारीसाठी चकाचक रस्ता खुला करण्याचीही क्षमता या तंत्रात गवसली आहे. डॉ. विशाल ठोंबरे सध्या मुंबई महापालिकेच्या कोस्टल रोड विभागात साहाय्यक अभियंता म्हणून कार्यरत असून त्यांनी काम करताकरताच आयआयटी, मुंबईतून पीएचडी पूर्ण केली. मराठी विज्ञान परिषदेतर्फे अलिकडेच डॉ. ठोंबरे यांना विश्वेश्वरय्या पुरस्काराने गौरवण्यात आले. सिमेंट, काँक्रीट व अल्ट्राथिन व्हाइट टॉपिंग या तंत्रज्ञानावर हुकूमत असणारे देशातील ते एकमेव आघाडीचे अभियंता ठरले आहेत. त्यांना आतापर्यंत दोन वेळा अभियंतादिनी उत्कृष्ट अभियंता पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. धुळ्यामधून प्रथम अभियांत्रिकीची पदविका घेतल्यानंतर पुणे विद्यापीठातून त्यांनी बीईची पदवी घेतली. त्यानंतर व्हीजेटीआय या अग्रगण्य अभियांत्रिकी संस्थेतून मेकॅनिकल शाखेतच  पदव्युत्तर पदवी (एमइ) त्यांनी पूर्ण केली. या दरम्यानच्या काळात ते मुंबई महापालिकेत रुजू झाले होते. आयआयटी, मुंबईतून डॉक्टरेटवर काम करण्यास सुरुवात केल्यावर त्यांनी आपल्या प्रकल्पासाठी खड्डेमुक्त चकाचक रस्त्यांचा प्रकल्प घेतला. मुंबई महापालिकेत १९९७ मध्ये रुजू झाल्यापासून त्यांनी दर्जानियंत्रण, नियोजन व पाणी खात्यातील संशोधन विभागातही काम केले. मुंबईच्या नियोजन आराखड्यात योगदान दिले. त्यांचे प्रावीण्य पाहून त्यांना रस्ते विभागात नेमले. त्यांनी एम ६० या दर्जाचे काँक्रीट वापरण्यास प्रथम सुरुवात केली. या काँक्रीटची रेसिपी दिल्यानंतर तसा माल काँक्रिट कारखान्यातून मिळू लागला. या एम ६० दर्जाच्या काँक्रिटचा थर वापरून मुलुंड येथे विठ्ठलभाई पटेल मार्ग हा रस्ता प्रथम करण्यात आला. त्याचा अनुभव चांगला आल्याने मुलुंडमध्ये गणेश गावडे मार्ग, जीव्ही स्कीम २, चेंबूर व घाटकोपरमधील काही रस्ते, स्टर्लिंग सिनेमासमोरचा रस्ता या ठिकाणी रस्ते करण्यात आले. दरम्यानच्या काळात इंडियन रोड काँग्रेसमध्येही हे तंत्रज्ञान मान्य करण्यात आले आणि आयआरसीच्या निकषांमध्येच त्यांचा समावेश करण्यात आला. हे तंत्रज्ञान खड्डेदुरुस्तीचे नाही. परंतु खड्डे शास्त्रीय पद्धतीने दुरुस्त केल्यानंतर त्या रस्त्यावर या तंत्रज्ञानाने थर टाकता येतो. अशा रस्त्याचे आयुष्य २० ते २५ वर्षे राहते, असे डॉ. विशाल ठोंबरे सांगतात. या तंत्राविषयी ते म्हणाले, की हे तंत्रज्ञान वापरायचे, तर रस्त्यावर ७५ मिलीमीटरचा तरी डांबराचा थर हवा. रस्त्याचा काही भाग खरवडून त्यावर एम६० काँक्रीटचा माल टाकला जातो. हा थर ६५ मिलीमीटरचा असतो. या तंत्रज्ञानाचा थर टाकल्यास पुढील अनेक वर्षे खड्डा पडत नाही. एरवी २८ दिवसांनंतरच रस्ता रहदारीसाठी खुला करावा लागतो. त्याऐवजी या तंत्रज्ञानाने सात दिवसांत रस्ता खुला करता येतो. याबरोबरच २४ तासांत रस्ता खुला करता येईल, असे तंत्रज्ञानही तयार आहे. डॉ. ठोंबरे यांनी विकसित केलेले तंत्रज्ञान आता मुंबई, ठाणे, पुणे ते गझियाबादपर्यंत उपयोगात आणले जाते. या तंत्रातील यश पाहून डॉ. ठोंबरे यांना इंडियन रोड काँग्रेसच्या निकषनिश्चिती समितीमध्येही घेण्यात आले. मुंबई महापालिकेतून इंडियन रोड काँग्रेसवर गेलेले ते आजवरचे पहिलेच सदस्य ठरले.

इतर यंत्रणांनीही कित्ता गिरवावा
मुंबई महापालिकेतच जर हे स्वदेशी तंत्रज्ञान विकसित झाले, तर ते टोलनाके तसेच इतर मार्गांवर का वापरण्यात आले नाही, या प्रश्नावर डॉ. ठोंबरे सांगतात, की टोलनाके मुंबई महानगर क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या हद्दीत येतात व मुंबईचे दोन्ही हायवेही मुंबई महापालिकेकडे येत नाहीत. राज्याचा सार्वजनिंग बांधकाम विभाग तसेच मुंबई महानगर क्षेत्रविकास प्राधिकरण या यंत्रणांनी हे तंत्रज्ञान वापरल्यास तेथील रस्ते खड्डेमुक्त होऊ शकतात, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

प्लास्टिकचाही वापर
प्लास्टिकचा वापर करूनही रस्ते तयार करण्यावर आपल्याला अधिक प्रयोग करायचे आहेत, असे डॉ. विशाल ठोंबरे यांनी सांगितले. मुंबई महापालिकेने  दादर येथे प्लास्टिक वापरून रस्ता केला आहे. मात्र हे प्रयोग पुढे फारसे झालेले नाहीत.n

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link