Next
शिवराज्याभिषेक
- विजय काळे (संस्कार भारती)
Friday, June 07 | 04:00 PM
15 0 0
Share this story

छत्रपती शिवाजीमहाराजांची एक गोष्ट आपण यापूर्वी बघितलीच आहे. शिवाजीमहाराजांच्या आणि महाराष्ट्राच्या इतिहासातील एक खूप महत्त्वाची घटना म्हणजे शिवराज्याभिषेक. शिवाजीमहाराजांनी स्वराज्यस्थापना करण्यापूर्वी ३०० वर्ष भारत पारतंत्र्यात होता. मोगलांच्या चार बादशहांचं जवळपास संपूर्ण भारतावर अधिपत्य होतं.
शिवाजीमहाराजांनी महाराष्ट्रात स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली. प्रजा सुखावली. महाराजांच्या पराक्रमाच्या कथा सर्वदूर पसरल्या. महाराज आग्र्याहून सहीसलामत निसटल्यामुळे उभा हिंदुस्थान थक्क झाला होता. काशीचे महापंडित गागाभट्ट महाराजांना रायगडावर येऊन भेटले. त्यांनी महाराजांना राज्याभिषेक करून घेण्याचा आग्रह केला. ‘राज्याभिषेक प्रयोग’ नावाने सर्व राज्याभिषेकविधी लिहून काढले.
जेष्ठ शुद्ध १३ (त्रयोदशी), शके १५९६ म्हणजे ६ जून १६७४ हा राज्याभिषेकाचा दिवस ठरला. राज्याभिषेक रायगडावर, स्वराज्याच्या राजधानीत ठरला. राज्याभिषेकापूर्वी अपेक्षित विविध विधी आधी आठवडाभर सुरू होते. ६ जून १६७४ रोजी पहाटे ५ वाजता शिवाजीराजे सिंहासनाधीश्वर झाले. मोगल सुलतानांसमोर मराठी राजा छत्रपती झाला. या निमित्ताने अनेक राज्यांचे आणि देशांचे राजदूत आले होते, या सर्व राज्यांची/देशांची स्वराज्याला मान्यताच मिळाली. त्या राजदूतांमध्ये इंग्रज वकील हेन्री ऑक्झिंडेनसुद्धा आपल्या लवाजम्यासह आला होता. राज्याभिषेक झाल्यावर ऑक्झिंडेनने शिवाजीमहाराज, युवराज संभाजीराजे आणि अन्य कारभारी यांना नजराणे दिले. दरबाराबाहेर सजवलेले दोन हत्ती आणि घोडे त्याने बघितले. हे हत्ती इतक्या उंच डोंगरावर, अरुंद वाटेने कसे आले असतील याचे त्याला खूपच आश्चर्य वाटले.
शिवराज्याभिषेक आणि महाराजांचे चरित्र पूर्ण समजून घेण्यासाठी पद्मविभूषण बाबासाहेब पुरंदरे यांनी लिहिलेले शिवचरित्र, ‘राजा शिवछत्रपती’ अवश्य वाचा.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link