Next
राम: शस्त्रभृतामहम्।
स्वामी मकरंदनाथ
Friday, November 16 | 04:00 PM
15 0 0
Share this storyभगवद्गीतेच्या दहाव्या अध्यायात आपल्या विभूती सांगताना भगवंत म्हणतात, ‘राम: शस्त्रभृतामहम्।’ शस्त्रधाऱ्यांमध्ये राम ही माझी विभूती आहे. शस्त्र हातात असणे आणि शस्त्र हातात आहे याचा विवेक असणे या गोष्टी प्रभू रामचंद्रांच्या ठिकाणी पाहायला मिळतात. आपल्या यज्ञाचे रक्षण करण्यासाठी म्हणून विश्वामित्रांनी दशरथराजाकडून शस्त्रधारी रामचंद्रांना मागून घेतले. दशरथांनी अनुज्ञा दिल्यानंतर विश्वामित्रांनी राम आणि लक्ष्मण यांना बरोबर नेले. प्रत्यक्ष यज्ञकार्याचे रक्षण करण्याची वेळ आल्यावर राक्षसिणींवर म्हणजे स्त्रियांवर शस्त्र चालवण्यासाठी रामचंद्रांनी प्रथम विश्वामित्रांची अनुज्ञा घेतली आणि नंतर शस्त्र चालवले. हातात शस्त्र आहे म्हणजे ते चालवण्याचा अधिकारही आहे असे ते समजले नाहीत.

रामचंद्रांनी जेव्हा जेव्हा शस्त्र चालवले तेव्हा धर्म साकडलेला होता, अडचणीत आलेला होता. ते लढले तेव्हा ते जणू आपल्या धनुष्याशी एकरूप झाले. स्वत:ला त्यांनी धनुष्य बनवले आणि युद्ध केले. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात,

जेणे सांकडलिया धर्माचे कैवारे।
आपणपयां धनुष्य करूनि दुसरे।
विजयलक्ष्मिये एक मोहरें।
केले त्रेतीं।।


जेव्हा जणू स्वत:लाच प्रहार करण्याचे साधन बनवण्याच्या उत्साहाने युद्ध केले जाते तेव्हा विजय निश्चित असतो. घाबरत घाबरत कसेबसे उचलेले शस्त्र आणि आपण स्वत:च शस्त्र आहोत अशा भावनेने हिरिरीने युद्ध करण्यात मोठा फरक आहे. विजिगीषूवृत्तीने रावणाची दहाही शिरे रामचंद्रांनी लीलया छेदून टाकली. रामचंद्र आणि इतर देव जे पूर्वी रावणाशी लढायला आले होते त्यांच्यात हाच फरक होता. देवांची भूमिका लढण्याची होती, पण त्यात आत्मविश्वास नव्हता. ‘जमले तर लढू नाहीतर पळून जाऊ!’ याउलट रामचंद्रांनी मागे परतण्याचा विचारच केला नव्हता. वानरांचे, ज्यांचे साहाय्य मिळाले ते घेऊन जमतील ती साधने घेऊन ते रावणावर तुटून पडले. त्याआधी संपलो तरी बेहत्तर अशा त्वेषाने रावणाशी कोणीच लढला नव्हता.

ज्ञानेश्वर महाराजांनी रामचंद्रांचे केलेले वर्णन मोठे विलक्षण आहे.

पाठी उभे ठाकूनि सुवेळी।
प्रतापलंकेश्वराची सिसाळीं।
गगनी उदों म्हणतया हस्तबळीं।
दिधली भूतां।।

सुवेळी म्हणजे विजयादशमीच्या दिवशी! विजयादशमीच्या दिवशी रामचंद्रांनी रावणाचा वध केला. सुवेलाचल नावाच्या पर्वतावर उभे राहून रामचंद्रांनी रावणाला मारले. त्याची आठवण प्राचीन काळापासून आपल्या देशात विजयादशमी साजरी करून केली जाते.

जेणे देवांचा मानु गिंवसिला।
धर्मासि जीर्णोद्धारू केला।
सूर्यवंशीं उदेला।
सूर्य जो कां।।


रामचंद्रांनी देवांचा अस्तंगत झालेला मान त्यांना परत मिळवून दिला. अधर्म गाडून टाकला आणि धर्माचा जीर्णोद्धार केला. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात,

तो हातियेरूपरजितयांआंतु।
रामचंद्र मी जानकीकांतु।


याचा अर्थ केवळ हत्यार परजून होते म्हणून रामचंद्र आपली विभूती असे भगवंतांना म्हणायचे नाही. सतत हत्यार परजणाऱ्यांमध्ये वाल्या कोळीदेखील होता आणि असे पुष्कळ असतात, पण विवेकासह हत्यार परजून असणारे प्रभू रामचंद्र हे एकमेव होते. त्यामुळे रामचंद्रांना विजयदेखील शोभायमान झाला! रामचंद्रांनी मिळवलेला विजय विलक्षण आहे. त्यांनी रावणाची जिंकलेली भूमी सोडून दिली व बिभीषणाचा राज्याभिषेक केला. ज्यासाठी युद्ध केले त्याच्यापेक्षा अधिक काही युद्धात मिळाले तरी ते सोडून देणे ही गोष्ट रामचंद्रांच्या जीवनात दिसून आली. ते कधीही निष्कारण आक्रमक झाले नाहीत. तसेच एखादा आक्रमक युद्धात विजय मिळवल्यानंतर जसा अन्याय करतो तसा अन्याय त्यांनी कधीही केला नाही. रामचंद्रांचे नाव, त्यांचा पराक्रम, त्यांनी मिळवलेला विजय विजयादशमीच्या रूपाने आजही सर्वांच्या स्मरणात राहिला आहे.

(पावसच्या स्वामी स्वरूपानंदांचे शिष्य स्वामी माधवनाथ यांचा वारसा पुढे चालवणारे स्वामी मकरंदनाथ यांचे खास तरुणांसाठी सदर)

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link