Next
कोरा, खुखरी कॉरव्हेट्स
समीर कर्वे
Friday, April 05 | 03:00 PM
15 0 0
Share this story

युद्ध खेळताना लढवय्याच्या भात्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची शस्त्रे असावी लागतात. त्याचप्रमाणे आरमारी युद्धखेळीमध्येही यद्धनौकांचे विविध प्रकार आपल्या हाताशी हवेत. कॉरव्हेट प्रकारातील यद्धनौका या त्याच प्रकारातल्या. कॉरव्हेट या सर्वात लहान प्रकारच्या साधारण दीड-दोन हजार टनांच्या युद्धनौका असतात. यापूर्वी आपण फ्रिगेट, विनाशिका (डिस्ट्रॉयर) या तीन ते सात-साडेसात हजार टनांच्या यद्धनौकांची माहिती घेतली आहे. त्याचप्रमाणे किलर स्क्वाड्रन या श्रेणीतील वेगवान क्षेपणास्त्रनौका (मिसाइल बोट) या आकाराने लहान यद्धनौकांचीही माहिती घेतली. कॉरव्हेट या क्षेपणास्त्र नौकांच्या साधारण बरोबरीच्या असतात. त्यांचा वेग मात्र कमी असतो आणि समुद्रात तग धरून राहण्याची क्षमता अधिक असते.
भारतीय नौदलामध्ये आयएनएस कोरा श्रेणीमध्ये आयएनएस कोरा, कीर्च, कुलिश व कार्मुक या चार व त्यापूर्वीच्या आयएनएस खुखरी श्रेणीमध्ये खुखरी, कृपाण, कुठार व खंजर या चार कॉरव्हेट प्रकारातील  १३०० ते १४०० टनांच्या यद्धनौका आहेत. आयएनएस खुखरी या श्रेणीतील यापूर्वीची आयएनएस खुखरी ही फ्रिगेट प्रकारातील यद्धनौका होती व भारत-पाकिस्तान यांच्यातील १९७१ च्या यद्धात पाणतीराच्या प्रहारात जायबंदी झाल्याने तिला जलसमाधी मिळाली होती. तत्कालीन आयएनएस खुखरीचे सारथी व मरणोत्तर महावीरचक्रप्राप्त कॅप्टन महेंदरनाथ मल्ला यांनी अखेरपर्यंत यद्धनौकेची साथ सोडली नाही व कप्तानाचे खरे कर्तव्य बजावले, याचे स्मरण तिचे नाव घेताना करणे आवश्यक आहे. आयएनएस खुखरी पुढच्या जन्मात मात्र फ्रिगेटऐवजी कॉरव्हेट प्रकारात जन्मली.
 भारतीय नौदलातील खुखरी व कोरा श्रेणीतील कॉरव्हेट्स १९८९ ते २००४ या काळात दाखल झाल्या. आयएनएस खुखरी (२३ ऑगस्ट १९८९), कुठार (७ जून १९९०), कृपाण (१२ जानेवारी १९९१), खंजर (२२ ऑक्टोबर १९९१) या काळात भारतीय नौदलात समाविष्ट झाल्या. तर आयएनएस कोरा (१० ऑगस्ट १९९८), कीर्च (२२ जानेवारी २००१), कुलीश (२० ऑगस्ट २००१) व कार्मुक (४ फेब्रुवारी २००४) या कोरा श्रेणीतील कॉरव्हेट्सचे कमिशनिंग एकविसाव्या शतकाच्या प्रारंभी झाले.
चिन्हांवरची शस्त्रे
प्रत्येक यद्धनौकेचे एक व्यक्तिमत्त्व तयार करण्यात आलेले असते व त्यानुसार तिला चिन्ह (क्रेस्ट) बहाल करण्यात आलेले असते. त्यात नौकेचे ब्रीद किंवा यद्धघोष सामावलेला असतो. लष्करातील पायदळाच्या युनिट्सच्याच धर्तीवर हे सारे असते. खुखरी व कोरा या प्रकारातील सर्व कॉरव्हेट्स या पारंपरिक सेनानींच्या भात्यातील खासकरून छोटेखानी किंवा हाताने लढावयाच्या शस्त्रांशी निगडित आहेत. त्यामुळे त्यांच्या चिन्हांवर नावाप्रमाणे त्या शस्त्रांचे दर्शन घडते. कोरा ही नेपाळमध्ये वापरली जाणारी तलवार, गुरखा किंवा नेपाळी वापरतात ती खुखरी (कुकरी), दोन्ही बाजूंना चंद्रकोरीसारखे पाते असलेले इंद्राचे वज्र हे शस्त्र म्हणजे कुलीश, दुहेरी धार असलेली खड्गासारखी कीर्च, कुऱ्हाडीसारखे कुठार, खंजीर किंवा खंजर आणि धनुष्य म्हणजे कार्मुक अशा हातात धरावयाच्या शस्त्रांच्या चिन्हांनी आणि नावांनी या यद्धनौका अंकित आहेत.
या नौका आकाराने तशा लहान असल्याने लेफ्टनंट-कमांडर हुद्द्यांचे अधिकारी त्यांच्या कप्तानपदी नेमले जात व त्यावरूनच काही नौदलांमध्ये कॉरव्हेट कमांडर हा हुद्दाही तयार झाला. कॉरव्हेट या शब्दाचे मूळ फ्रेंचमधून आले असावे, अशी माहिती सापडते. त्यात छोटी नौका किंवा बास्केट असे अर्थ अभिप्रेत होते. फ्रेंच नौदलामध्ये सतराव्या शतकाच्या उत्तरार्धात कॉरव्हेट हा शब्द प्रचलित झाला. तोफा असलेल्या छोट्या प्रकारातील नौकांना हा शब्द होता. शिडनौकांच्या काळातही तोफांचे एक डेक असलेल्या नौकांसाठी हा शब्द वापरात आला. आता ५० ते २ हजार टनांपर्यंतच्या प्रकारांत कॉरव्हेट्स असल्या, तरी काही कॉरव्हेट्स ३ हजार टनांपर्यंतही गेल्या आहेत. 

आता कॉरव्हेट प्रकारातील नौकांची भूमिका ही मोठ्या यद्धनौकांच्या शे-दीडशे मैल पुढे राहून शत्रूचा वेध घेण्याची असते. पिकेटिंग किंवा पाळत ठेवून मार्ग निर्वेध करण्याची त्यांच्यावर जबाबदारी असते. त्या बराच काळपर्यंत इंधन पुनर्भरण न करता समुद्रात राहू शकतात व त्या इंधनाच्या दृष्टीने किफायतशीरही असतात. या नौका डिझेल इंजिनावर चालतात, त्यामुळेच गॅस टर्बाइनवरील यद्धनौकांपेक्षा त्यांचा वेग कमी (ताशी २५ ते २८ सागरी मैल इतका) असला, तरी त्यांचा इंधनवापर कमी असतो.

जहाज किंवा यद्धनौकेचा प्रतिकार करण्याची मुख्य जबाबदारी या कॉरव्हेट्सवर असते. जहाजविरोधी क्षेपणास्त्रे ही या कॉरव्हेट्सची मुख्य शक्ती. कॉरव्हेट्सच्या दोन्ही बाजूस क्षेपणास्त्रे आहेत. शिवाय पुढच्या बाजूस ७६ मि.मी. व्यासाच्या तोफा आहेत. त्याचप्रमाणे एके ६३० मशीनगन त्यांच्यावर आहेत. त्यातून मिनिटाला तीन-साडेतीन हजार फैरी झडू शकतात. मात्र ही शस्त्रे कमी पल्ल्याची सावज टिपण्यासाठी किंवा शस्त्रांचा मारा करून त्यांचा पडदा तयार करण्यासाठी वापरली जातात. ज्यायोगे शत्रूला हालचालच करता येणार नाही. त्यांना क्लोज-इन वेपन सिस्टिम म्हटले जाते. या नौकेवरील तोफा किंवा बंदुका आकाशातील हल्ला परतावून लावू शकतात, मात्र अगदी जवळ आल्यानंतर. कारण त्यावर लांब पल्ल्याची विमानविरोधी शस्त्रे नसतात. या नौकेवर चेतक हेलिकॉप्टर ठेवण्याची सोय आहे, मात्र त्यासाठी स्वतंत्र हँगर नसतो. या नौकेवर त्रिशूळ क्षेपणास्त्र बसवण्यात येणार होते, मात्र तो प्रकल्पच रद्द झाला.
कोलकात्याच्या गार्डनरीच शिपयार्डमध्ये (जीआरएसई) कोरा व खुकरी श्रेणीतील दोन कॉरव्हेट्स बांधण्यात आल्या आहेत. आता या सर्व कॉरव्हेट्स भारताच्या पूर्व किनारपट्टीवर विशाखापट्टणम् किंवा अंदमान-निकोबारमध्ये तैनात आहेत.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link