Next
नाटकानं गाणं अधिक समृद्ध केलं
राहुल देशपांडे
Friday, December 21 | 03:20 PM
15 0 0
Share this storyमागच्या भागात मुकुल शिवपुत्र यांच्याकडे मी गायनाचे जे धडे गिरवले त्याबद्दल बोललो होतो. त्यांच्याकडे अनेक वर्षं तालीम घेतल्यानंतर मी हळूहळू कार्यक्रमांमधून एकल गायन करू लागलो. ते करत असताना एकीकडे गाण्याचं शिक्षण चालू होतंच. त्यावेळी आजोबांच्या स्मरणार्थ माझे वडील पुण्यात दोन दिवसांचा ‘वसंतोत्सव’ कार्यक्रम करायचे. त्यात भीमसेन जोशी, कुमारगंधर्व, पं. जसराजजी अशी मातब्बर मंडळी येऊन गेली होती. मी साधारण पंचवीस-सव्वीस वर्षांचा झाल्यावर बाबा म्हणाले की आता हा कार्यक्रम तू आयोजित करत जा. त्यावेळी माझ्याही डोक्यात एक कल्पना आकार घेत होती, की जिथे संगीत केवळ गायलं जाणार नाही तर ते साजरं केलं जाईल असा एखादा कार्यक्रम असावा. ज्यात फक्त शास्त्रीय नाही तर अगदी लावणी, गजल, ठुमरी, नाट्यसंगीत हे सगळे प्रकार गायले जातील असा कार्यक्रम करावा, कारण माझे आजोबा सगळ्या प्रकारची गाणी गायचे. यातून मला ‘वसंतोत्सव’ची नवी कल्पना सुचली व त्याचा पहिला कार्यक्रम मुंबईत आणि मग पुण्यात केला. त्यावेळी नाना पाटेकरांनी मला कार्यक्रमाच्या आयोजनात खूप मदत केली. या कार्यक्रमाच्या आयोजनातून मला खूप काही शिकायला मिळालं. अनेक मोठ्या लोकांशी ओळखी, भेटी झाल्या. त्यादरम्यानच अनेक मित्रांनी मी संगीत नाटक करावं असं सुचवलं. खरं तर काही वर्षांपूर्वी प्रभाकरपंत पणशीकरांनीही मला, ‘संगीत नाटक करतोस का?’ म्हणून विचारलं होतं, पण तेव्हा मी त्यांना नाही म्हटलं होतं कारण माझं गाण्याचं शिक्षण चालू होतं आणि आपल्याला अभिनय वगैरे जमेल असं मला अजिबात वाटत नव्हतं. त्यामुळे तो विषय तिथेच सोडून दिला होता. परंतु ‘वसंतोत्सवा’दरम्यान जेव्हा मला अनेक जण नाटक करण्याविषयी सुचवू लागले तेव्हा गांभीर्यानं विचार करायला लागलो. खूप विचार केला आणि मग ‘करून तर बघू या’ या निर्णयावर येऊन पोहोचलो. आज हे वय आहे. या वयात नाटक फसलं तरी फार काही नुकसान होणार नाही.  परंतु पुढे कधीतरी, ‘अरे आपण प्रयत्न करून बघायला हवा होता,’ असं वाटायला नको हा विचार करून मी एकदाचा नाटकाच्या घोड्यावर बसलो.

‘कट्यार काळजात घुसली’ नाटक करायचं ठरवलं. कलाकारांची मांदियाळी जमवायला सुरुवात केली. पहिला फोन मी महेश काळेला केला आणि त्यानंही नाटकासाठी अमेरिकेहून मुंबई-पुण्याला यायची तयारी दर्शवली. त्यालाही हे नाटक करायचंच होतं. कविराजच्या भूमिकेसाठी सुबोध भावेला विचारलं, तोही तयार झाला आणि मग आमची तालीम सुरू झाली. नाटकात काम करण्याचा तो माझा पहिलाच प्रयत्न होता. मला आठवतंय, पहिल्या प्रयोगाला पणशीकर, पं. हृदयनाथ मंगेशकर असे बरेच मोठे लोक आले होते आणि मला खूप टेन्शन आलं होतं. मात्र प्रयोग खूप चांगला झाल्याची पावती प्रेक्षकांकडून, मान्यवरांकडून मिळाली त्यामुळे मग माझाही जरा हुरूप वाढला. आपण संगीत नाटक करू शकतो हा विश्वास त्यानंतर दृढ होत गेला. थोडं हलकं-फुलकं संगीत नाटक करावं म्हणून मी निपुण धर्माधिकारीला बरोबर घेऊन ‘संगीत संशयकल्लोळ’ नाटक केलं. त्या नाटकाचेही सगळे प्रयोग खूप छान व्हायचे. शाळा-कॉलेजमधील मुलं ते नाटक पाहायला यायची. गायक म्हणून कलेच्या क्षेत्रात वावरत असतानाच गायक नट ही नवीन जबाबदारी मी स्वीकारली आणि ती मला आवडू लागली. मी जेवढी संगीत नाटकं केली त्या सगळ्या नाटकांनी माझ्यातल्या गायकाला समृद्ध केलं. दोन वर्षांत चार संगीत नाटकांची निर्मिती केली. कारण संगीत नाटक म्हटलं की पटकन निर्माता मिळत नाही, म्हणून आम्हीच निर्माते बनलो. विशेष म्हणजे एकाही संगीत नाटकानं नुकसान केलं नाही. मी कधी अनुदान मागायलाही गेलो नाही. प्रेक्षकांनी ही सगळी नाटकं डोक्यावर घेतली. चारशेहून अधिक प्रयोग झाले. सात-आठ वर्षांच्या या प्रवासात गायक म्हणून आणि अभिनेता म्हणून मला खूप समाधान आणि आनंद या संगीत नाटकांनी दिला. माझ्यातल्या अभिनेत्याची मला जाणीव करून दिली. नाटकात जेव्हा नट म्हणून गाणं म्हणायला लागलो तेव्हा मला त्याचा अर्थ, त्याचे संदर्भ अधिक चांगले उमजायला लागले. मी जास्त चांगल्या पद्धतीनं व्यक्त होऊ लागलो. नाटकांनी मला खूप काही दिलं. प्रत्येक नाट्यपद अधिक समजून-उमजून, त्या भूमिकेत शिरून गायला लागलो. गाण्याचा भाव काय आहे, कोणत्या विचारातून ते लिहिलं असेल या सगळ्याचा बारकाईनं विचार करायला लागलो आणि त्यातून गाणं अधिक समृद्ध होत गेलं. नाटकातील गाणं हे समयोचित आणि प्रसंग पुढे नेण्यापुरतंच असतं. तिथे ते लांबून चालत नाही त्यामुळे तिथे मैफिलीसारखं गाऊन चालत नाही हेही शिकता आलं. नाटकाची गती आणि त्यातील नाट्यपदांची गती यात समतोल राखावा कसा हे मी रंगभूमीवर शिकलो. लवकरच मी अभिनेता म्हणूनही एका चित्रपटातून तुमच्या समोर येणार आहे. त्याविषयी सांगेनच पुढील भागात. 
क्रमश:
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link