Next
भोगीची भाजी, भाकरी, खिचडी आणि भरीत
वसुधा गवांदे
Friday, January 11 | 04:00 PM
15 0 0
Share this storyमैत्रिणींनो, मकरसंक्रांतीच्या आदल्या दिवशी आनंदाचा आणि उपभोगाचा सण म्हणून भोगीचा दिवस साजरा केला जातो. आजकल या दिवशी फक्त भाजी आणि भाकरी केली जाते, त्यामुळे हे दोनच पदार्थ या दिवशी केले जातात असा समज रूढ होत आहे आणि या दिवसाच्या भोजनाचा मूळ बेत विस्मृतीत चालला आहे. म्हणून आज मी खास या दिवसाचा बेत सांगणार आहे. या दिवसाचा खरा बेत म्हणजे भोगीची भाजी, भाकरी, खिचडी आणि वांग्याचं भरीत.

भोगीची भाजी यातला मुख्य पदार्थ. त्याची पद्धत सांगते. गाजर, हरभऱ्याचे दाणे, वाल-पापडीचे दाणे, तुरीचे दाणे, काटेरी वांगी, एक बटाटा, पापडी घेवडा आणि उसातला घेवडा (याची शेंग थोडी लांब आणि हिरवीगार असते) या सगळ्या भाज्या एकत्र आणा. भाज्या प्रत्येकी शंभर ग्रॅम या प्रमाणात घ्या. म्हणजे ही भाजी तीन-चार माणसांसाठी पुरेल. गाजर साल काढून बारीक चिरून घ्या. बटाट्याच्या बारीक फोडी करून घ्या. वांग्याच्या फोडी करून घ्या. शेपटाच्या दोन शेंगा घ्या आणि त्याचे बोटभर लांबीचे तुकडे करा. घेवडा हातानं तोडून घ्या. आता या सगळ्या भाज्या एकत्र करून धुऊन ठेवा. नंतर नेहमीची फोडणी (मोहरी, जिरं, हळद, हिंग) करून त्यात ही भाजी टाका व वर पाण्याचे झाकण ठेवा. दोन-तीन वेळा भाजी नुसती हलवा म्हणजे सगळीकडे त्याला वाफ लागेल. मग त्यात पाणी घाला. भाजी भिजून पाणी थोडं वर येईल एवढं पाणी घाला. भाजी शिजत आली की तीन चमचे तिळाचं कूट घाला. या भाजीसाठी साधे तीळ घ्या. पॉलिश्ड तीळ नको. त्यावर तीन चमचे दाण्याचं कूट, दीड चमचा तिखट, दोन-तीन चमचे गोडा मसाला, सुपारीएवढा गूळ घालून भाजी चांगली शिजू द्या. शिजली की त्यावर खोबरं आणि कोथिंबीर भुरभुरायची. या भाजीला खोबऱ्याचं वाटण घालायचं नाही. भाजीला थोडा रस राहिला पाहिजे. ती सुकी करायची नाही, तसंच या भाजीत आंबट काही घालायचं नाही. मिरची-कढीपत्ताही घालू नये. या मोसमात मिळणाऱ्या भाज्या आणि घरातले मसाले यांच्या एकत्रीकरणातूनच या भाजीला चव येते.

एकदम साधी सोपी भाजी आहे. या भाजीबरोबर बाजरीची भाकरी करायची. एरवी आपण दोन-तीन पीठं एकत्र करून भाकरी करतो, पण या दिवशी या भाजीबरोबर बाजरीचीच भाकरी लागते. भाकरीवर पाणी फिरवताना पांढरे तीळ घालायचे. हे तीळ भाजून घेतले किंवा तसेच घेतले तरी चालतील, फक्त ते साधे तीळ असावेत, पॉलिश तीळ नको. भाकरी आणि भोगीच्या भाजीबरोबर वांग्याचं भरीत आणि मिश्र भाज्या घालून केलेली मुगाच्या डाळीची खिचडी असा या दिवसाचा बेत असतो. आजकाल केवळ भाकरी आणि भाजी करून वेळ मारून नेली जाते, पण खरा बेत हा असा असायला हवा. कारण हे चार पदार्थ म्हणजे पूर्णान्न आहे. या दिवसांत पोटासाठी हे चांगले आहेत आणि शरीराला आवश्यक ती पोषकद्रव्य या चारही पदार्थांच्या रसातून मिळतात म्हणून चारही पदार्थ महत्त्वाचे आहेत. वांग्याचं भरीत तुम्ही तुमच्या आवडीनुसार दह्यातलं किंवा फोडणीवर परतूनही करू शकता तर मुगाच्या डाळीच्या खिचडीत गाजर, मटार, फरसबी अशा भाज्या घालाव्या. या दिवसांत ज्या भाज्या मिळतात त्या नवीन धान्य या प्रकारातील असतात. तुरीचे दाणे, वालाचे दाणे एरवी आपल्याला मिळत नाहीत. घेवडा जरी एरवी मिळत असला तरी त्याची चव वेगळी असते. या दिवसांत जो घेवडा मिळतो त्याची चव अधिक चांगली असते. यातील बहुतेक भाज्या ही हेमंतऋतूची खासियत आहे. त्या त्या ऋतूत पिकणाऱ्या भाज्या शरीराला आवश्यक असतात आणि म्हणून त्या खाल्ल्या पाहिजेत. या वर्षी संक्रांत १५ जानेवारीला आहे, म्हणजे १४ तारखेला तुम्ही हा बेत करा. तुम्हीही खा, घरच्यांनाही खायला घाला आणि कसा झाला बेत ते आम्हाला लिहून कळवा.

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link