Next
चोकर्सना अमोल गुरुमंत्र
भूषण करंदीकर
Friday, September 20 | 03:00 PM
15 0 0
Share this story

मुंबई रणजी क्रिकेटसंघाचा १९९०च्या दशकात प्रचंड दबदबा होता. त्या संघात अमोल मुजुमदार हा एक हिरा होता. प्रथम श्रेणीच्या क्रिकेटमध्ये ते त्यावेळी  ‘रनमशीन’ होते, मात्र त्यांना भारतीय संघात स्थान मिळवता आले नाही. याबाबत नशिबाने त्यांना साथ दिली नाही. याच अमोल मुजुमदार यांच्यासाठी आता एक नवे कवाड खुले झाले आहे. भारतदौऱ्यावर असणाऱ्या दक्षिण आफ्रिका संघाच्या फलंदाजांच्या प्रशिक्षकपदाची धुरा त्यांच्याकडे सोपवण्यात आली आहे.
मुंबईच्या शिवाजी पार्कवर आचरेकरसरांच्या तालमीत तयार झालेला हा आणखी एक हिरा. सचिन तेंडुलकर, विनोद कांबळी यांच्यासारखे दिग्गज फलंदाज घडवणारे गुरू रमाकांत आचरेकर यांचा हा गुणी विद्यार्थी. वयाच्या १४व्या वर्षांपासून अमोल मुजुमदार मुंबईसाठी खेळू लागले. विजय मर्चंट ट्रॉफीच्या सौराष्ट्रविरुद्धच्या पहिल्या सामन्यात अमोल यांनी १२५ धावांची खेळी करत तुफानी शतक झळकावले. त्यानंतर ते सातत्याने धावा करतच राहिले. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये तब्बल २१ वर्षे ते सातत्याने खेळत होते. या कारकिर्दीत त्यांनी ३० शतके आणि साठ अर्धशतके झळकावली. रणजीमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा अमोल मुजुमदार यांचा  विक्रम पुढे वसीम जाफर यांनी मोडला.
उमेदीच्या काळात अमोल सातत्याने धावा करत होते. मात्र त्याच वेळी अनेक नवे खेळाडू क्रिकेटच्या क्षितिजावर झळकू लागले होते. त्यामुळे अमोल यांची भारतीय संघात निवड झाली नाही. १९९५ मध्ये त्यांची भारतीय ‘अ’ संघात निवड झाली, मात्र भारताची जर्सी घालून खेळणे हे त्यांच्याकरता एक स्वप्नच राहिले. सतत १५ वर्षे मुंबईसाठी खेळल्यानंतर अमोल आसाम, आंध्र प्रदेश या संघांसाठी खेळले. २०१३ मध्ये ते शेवटचा प्रथम श्रेणी क्रिकेटचा सामना खेळले आणि त्यानंतर २०१४मध्ये त्यांनी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. पुढे राष्ट्रीय क्रिकेट अॅकॅडमीच्या माध्यमातून भारताच्या उदयोन्मुख क्रिकेटपटूंना प्रशिक्षण द्यायला सुरुवात केली. काही काळ नेदरलँडच्या क्रिकेटसंघाचे ते फलंदाजांसाठी प्रशिक्षक होते. आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल संघालाही फलंदाजीचे प्रशिक्षक म्हणून जबाबदारी पार पाडली आहे.
सध्या दक्षिण आफ्रिकेचा संघ भारताच्या दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात ते तीन टी-२० आणि तीन कसोटी खेळणार आहेत. यापैकी कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी अमोल दक्षिण आफ्रिकेच्या संघाचे फलंदाजांचे प्रशिक्षक म्हणून काम पाहणार आहेत. ‘सध्या अमोल हेच आमच्यासाठी योग्य प्रशिक्षक आहेत. त्यांना भारतीय खेळपट्ट्यांची चांगली माहिती आहे. त्यामुळे ते आमच्या फलंदाजांना योग्य मार्गदर्शन करू शकतात. काही दिवसांपूर्वी भारतात झालेल्या एका कॅम्पमध्ये त्यांनी आमच्या फलंदाजांना फिरकी गोलंदाजीचा सामना कसा करावा याबाबत मार्गदर्शन केले होते. त्यामुळेच अमोल यांची हंगामी प्रशिक्षक म्हणून निवड केली’, असे दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेट बोर्डाने स्पष्ट केले आहे.
आचरेकरसरांच्या मुशीतून घडलेल्या अमोल यांच्याकडून दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांना आता कोणता गुरुमंत्र मिळतो याची उत्सुकता सगळ्यांनाच आहे. दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांना फिरकी गोलंदाजीचा सामना करताना खूपच अडचणी येत असल्याचे लक्षात आले होते. सध्या दक्षिण आफ्रिकेच्या संघाचे मुख्य प्रशिक्षक आहेत एनोच क्वे. दक्षिण आफ्रिका संघावर चोकर्स हा शिक्का कायम मारला जातो. कोणत्याही विश्वचषकस्पर्धेत दक्षिण आफ्रिका संघाला मोक्याच्या क्षणी कच खाताना आपण पाहिला आहे. त्यामुळे आता भारतीय दौऱ्यावर असणाऱ्या या संघात हा शिक्का पुसण्याची नवी उमेद जागी होईल, अशी आशा आहे. अमोल मुजुमदार यांच्या रूपाने दक्षिण आफ्रिकेच्या संघाला फलंदाजीचे बारकावे शिकण्याची उत्तम संधी आहे. संपूर्ण क्रिकेट कारकिर्दीमध्ये वाट पाहण्याची सवय असणाऱ्या अमोल यांना आता खऱ्या अर्थाने आंतरराष्ट्रीय स्तरावर फलंदाज म्हणून नाही फलंदाजांचे प्रशिक्षक म्हणून काम करण्याची संधी मिळाली आहे.
भारतीय संघातून रवी शास्त्री निवृत्त झाले त्यावेळी भारतीय संघात स्थान मिळावे यासाठी अमोल मुजुमदार निवड समितीचे दरवाजे सतत ठोठावत होते. आता परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे. भारतीय संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री आहेत आणि त्याच वेळी पाहुण्या संघाला फलंदाजीचे बारकावे अमोल मुजुमदार शिकवणार आहेत. त्यामुळे या दोघांमधील रणनीतीच्या दृष्टीने असणारे द्वंद्व पाहण्याची उत्सुकता सर्वांनाच आहे.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link