Next
धक्का!
समाधान सिद्धगणेश
Friday, May 10 | 03:00 PM
15 0 0
Share this story

संध्याकाळचे सात वाजले होते, नेहमीपेक्षा आज जरा जास्तच उशीर झाला होता. आता घरी गेल्यावर आईबाबा ओरडतील याच भीतीनं अंग थरथरायला लागलं होतं. हातामधल्या घड्याळाचा काटा जसजसा पुढे सरकत होता तसतसा अंगावर आलेला भीतीचा काटा डोक्यापर्यंत भिरभिरत होता. इतक्यात पर्समध्ये असलेला मोबाइल वाजला आणि छातीत धडकी भरू लागली. लटलट कापणाऱ्या त्या हातानं पर्समधला मोबाइल काढून पाहिला आणि अंगाचं पाणी पाणी झालं. बाबांचा फोन आला होता.
“बस झालं आता. आजपासून तुझा डान्स बंद आणि दादाला पाठवलंय तुला घ्यायला, येईलच तो इतक्यात.” एवढं बोलून बाबांनी फोन कट केला. इतक्यात दादा त्याची बाइक घेऊन समोर आला आणि आम्ही घरी निघालो.
चाळीतल्या दुसऱ्या मजल्यावर आमचं घर. मोजून २० घरांची आमची चाळ, त्यामुळे इथे इकडची गोष्ट तिकडं व्हायला तसा फारसा वेळ लागत नाही. त्याच चाळीतली सर्वात खोडकर आणि हसमुख मुलगी म्हणजे मी, अन्विता!
नृत्याची लहानपणापासूनच आवड असल्यामुळे यातच करिअर घडवण्याचे अफाट प्रयत्न चालू होते. कलाशाखेची पदवी घेतल्यानंतर गेल्या पाच वर्षांपासून मी वेगवेगळ्या नृत्यस्पर्धांमध्ये सहभागी होऊन अनेक बक्षिसंही मिळवली होती, पण त्या बक्षिसांची दखल मात्र कोणीही घेतली नाही हेच खटकत होतं.
डोक्यात अनेक विचारांचं काहूर माजलं होतं. जशी जशी चाळ जवळ येत होती तसं बाबांनी नृत्य करण्यास का नकार दिला असावा, आईबाबांचा एकमेकांशी वाद झाला असेल का किंवा माझ्या लग्नाची त्यांना घाई झाली असेल का, असे अनेक प्रश्न डोळ्यांसमोर उभे राहत होते.
एव्हाना आम्ही चाळीत पोहोचलो. मनातली भीती, कमकुवत झालेला राग आणि डोक्यातल्या प्रश्नांचं ओझं घेऊन मी गाडीवरून उतरले. ‘मी बाइक पार्क करून आलो, तू घरी जा’ असं म्हणत दादा पार्किंगकडे निघून गेला. आता मात्र मी सुन्न झाले होते.
माझ्याशी फडाफडा बोलणाऱ्या तळमजल्यावरच्या कांचनकाकू माझ्याशी चक्क काहीही न बोलता समोरून निघून गेल्या. एरवी माझा उदास चेहरा पाहून शंभर प्रश्न विचारणारे चाळीतले सगळे, आज माझा पांढरा पडलेला चेहरा पाहूनसुद्धा नजर फिरवून पुढे निघून जात होते. आता नक्कीच काहीतरी घडलंय, असं माझं ठाम मत झालं आणि मी दारासमोर आले.
दारातला पडदा सरकावून आत पाहिलं आणि माझ्या पायाखालची जमीनच सरकली. एक वृद्ध जोडपं व एक तरुण मुलगा सोफ्यावर बसून बाबांशी बोलत होते आणि अर्धी चाळ सोफ्यामागे उभी होती. नक्कीच माझं लग्न जमवत आहेत, असं समजून पाणावलेल्या डोळ्यांनी घरात पाय ठेवताच एकाएकी टाळ्यांचा कडकडाट आणि माझ्यावर अभिनंदनाचा वर्षाव सुरू झाला. मला काहीच सुचत नव्हतं. माझ्या डोळ्यांतील अश्रूंचा बांध फुटणार, तेवढ्यात बाबांनी मला जवळ घेतलं आणि डोक्यावरून हात फिरवत म्हणाले,“अगं वेडे, हे लग्नासाठी आलेले पाहुणे नसून, लंडन डान्स अँन्ड इव्हेंट ॲकॅडमीचे प्रोड्युसर आणि डायरेक्टर आहेत. त्यांच्या ॲकॅडमीतर्फे जगभरात तुझे डान्स शोज करायचे आहेत आणि त्यासाठी ते तुला पैसेही देणार आहेत.”
एका क्षणात दुःखाच्या अश्रूंचे आनंदाश्रूंमध्ये रूपांतर झालं. कांचनकाकू आणि उरलेली अर्धी चाळ घराबाहेरच उभी होती आणि माझ्यावर हसत होती. एरवी सगळ्यांची खोड काढणाऱ्या अन्विताची आज अख्ख्या चाळीनं फिरकी घेतली होती.
हे सर्व कसं घडलं, हे डायरेक्टर हेन्रीच्या तोंडून ऐकलं आणि ऊर भरून आला.
गेली पाच वर्षं माझे बाबा मला न कळून देता, माझ्या प्रत्येक स्पर्धेच्या डान्सची व्हिडीओ सीडी बनवून वेगवेगळ्या देशातील ॲकॅडमीमध्ये पाठवत होते. हे ऐकून बाबांचं अबोल प्रेम माझ्या काळजात रुजलं आणि हुंदके देत मी बाबांना घट्ट मिठी मारली.
खरंच… यशाच्या शिखरावर नेणारा असा अनपेक्षित ‘धक्का’ प्रत्येकाला मिळावा!

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link