Next
चटपटीत वाटली डाळ
वसुधा गवांदे
Friday, July 05 | 03:00 PM
15 0 0
Share this story

पावसाळ्याला सुरुवात झाली आहे. अशावेळी गरम गरम काहीतरी खायची इच्छा होते. प्रत्येकवेळी भजी करायला जमतीलच असे नाही. म्हणून आज एक चटपटीत पदार्थ सुचवते आहे. हा पदार्थ म्हणजे वाटली डाळ. करायला सोपी आणि चवीला एकदम छान, अशी ही वाटली डाळ नक्की करा आणि गरम गरम खा. हा पदार्थ शुभकार्यातही केला जातो किंवा गौरी-गणपती,  मंगळागौरीला  प्रसाद म्हणूनही केला जातो. मात्र हा पदार्थ एरवी फारसा केला जात नसल्याने बच्चे कंपनीला तो माहीत नसेल. संध्याकाळी शाळेतून आल्यावर किंवा काही वेळेस डब्यात काहीतरी वेगळा खाऊ द्यायचा असेल तर त्यावेळीही तुम्ही वाटली डाळ देऊ शकता. यासाठी १ वाटी चणाडाळ घ्या. ती चार तास भिजवून ठेवा. चार तासांनंतर त्यात मिरची घालून ती बारीक वाटून घ्या. वाटताना खूप पाणी घालू नका. पाणी जास्त झालं तर गुठळया होतात व डाळ मोकळी होत नाही, म्हणून डाळ वाटली जाईल एवढेच पाणी घाला. डाळ प्रसादाला करणार नसल्यास दोन–तीन लसूण पाकळ्या आणि आल्याचा तुकडाही घालू शकता. डाळ एकसारखी बारीक वाटून घ्या.  कढईत तेल गरम करा. त्यात हिंग-मोहरीची फोडणी करा व त्यावर ही डाळ घालून वरून  मीठ, तिखट, हळद, धनेपावडर घाला. आता डाळ मोकळी होईपर्यंत ढवळत राहा.  सगळं तेल शोषलं जाऊन डाळ मोकळी व्हायला हवी. मंद आचेवर डाळ शिजू द्या. वरून  घट्ट झाकण ठेवा. अधूनमधून ढवळत राहा आणि ढवळताना पाण्याचा हपकारा मारत राहा. जर ताजं ताक असेल तर पाण्याऐवजी ताकाचा हपकारा मारा. ताकामुळे अजून छान आंबटसर चव येते. ताक आवडत नसेल तर पाणीच वापरा. चांगली दोन-चार वेळा वाफ काढा. डाळ शिजत आली की त्यात अर्धा चमचा लिंबाचा रस घालून ढवळा (आधी ताक शिंपडले असेल तर लिंबाचा रस नको) आणि मग ओलं खोबरं व बारीक चिरलेली कोथिंबीर पेरून सगळं मिश्रण एकजीव करा. आवडत असेल तर डाळ शिजल्यावर त्यात अर्धा चमचा साखर घालू शकता. गरम गरम खायला द्या. मुलांना ही चटपटीत वाटली डाळ नक्की आवडेल. पावसाळ्यात गरम गरम वाटली डाळ खायला खूप मजा येते. त्यासाठी गौरी-गणपती येईपर्यंत प्रसाद म्हणून हा पदार्थ कधी मिळतोय याची वाट पाहण्याची गरज नाही.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link