Next
अंदाज बदलत्या हवामानाचा
अमृता दुर्वे
Friday, May 10 | 04:00 PM
15 0 0
Share this story

ओरिसामध्ये आलेल्या महाभयंकर फनी वादळामुळे नुकसान प्रचंड झालं. योग्य हवामानाचा अंदाज आणि त्यामुळे मिळालेली धोक्याची पूर्वसूचना यामुळे अनेक जीव वाचले. कुठे बाहेर सहलीला जायचं असेल तर तिथलं हवामान कसं असणार आहे, याचा अंदाज आपण घेतो. रोजच्या आयुष्यात मात्र फार वेळा आपण हवामान तपासत नाही. घराबाहेर पडण्याआधी ‘वेदर’ तपासण्याची पद्धत आपल्याकडे अजून आलेली नाही. किंबहुना युरोपीय देशांसारखे अचानक हवाबदल आपल्याकडे होत नसल्याने रोजच्या रोज हवामान अंदाज पाहण्याची फारशी गरज आपल्याला वाटत नाही. परंतु सध्याच्या कडाक्याच्या उन्हाळ्यात वा येऊ घातलेल्या पावसाळ्यात असा हवामानाचा अंदाज पाहणं फायद्याचं ठरू शकतं. शिवाय अशीही काही अॅप्स आहेत जी आपल्याला आपल्या शहरातील हवेचा दर्जा कसा आहे, हे सांगायलाही मदत करतील.

AccuWeather आणि The Weather Channel
हवामानाचे अपडेट्स मिळवण्यासाठी जगभरामध्ये काही अॅप्स खूप लोकप्रिय आहेत. त्यापैकी ही दोन अॅप्स. जगभरातल्या हवामानाचा अंदाज या अॅप्सवर तुम्ही पाहू शकताच पण तुम्ही ज्या जागी राहताय, खास तिथले अपडेट्सही तुम्हाला मिळतील. दिवसभरामध्ये सरासरी तापमान किती असेल हे तर समजेलच, दिवसभरात तापमानाचे काय बदल अपेक्षित आहेत, हेदेखील समजू शकेल. शिवाय या अॅप्सवर तुम्हाला पुढच्या १५  दिवसांचा अंदाज पाहता येईल. वादळाचा इशारा, तापमानवाढीचा इशारा, ते वातावरणातल्या आर्द्रतेची माहिती अशा सगळ्या गोष्टी या अॅप्समध्ये आहेत.

Windy.com
दूरदर्शनच्या बातम्या पाहताना शेवटी येणारा हवामानाचा अंदाज बहुतेकांना आठवत असेल. अशा सॅटलाईट इमेजेसच्या मदतीने हवामानाचा आढावा घ्यायला ज्यांना आवडत असेल, त्यांच्यासाठी हे अॅप बेस्ट आहे. तुमच्या लोकेशननुसार फोनवर देशाचा नकाशा येईल. यामध्ये वारे कसे वाहत आहेत, हे दिसेल. वारे किती वेगाने वाहत आहेत, कोणत्या दिशेने वाहत आहेत, तापमान किती आहे हे सगळं यात समजेल. आतापर्यंत फक्त ऐकून माहीत असलेले ‘नैऋत्य मोसमी वारे’ किंवा ‘कमी दाबाचा पट्टा’ या गोष्टी तुम्हाला या मोसमात आता प्रत्यक्ष ट्रॅक करता येतील. यासोबतच समुद्र किती खवळलेला असेल आणि किती मोठ्या लाटा उसळू शकतात याचीही माहिती या अॅपमध्ये मिळेल.   

Sameer - Central Pollution Control Board

केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने विकसित केलेलं अॅप - समीर. यामध्ये तुम्हाला देशभरातल्या विविध शहरांमध्ये हवेचा दर्जा कसा आहे, प्रदूषणपातळी किती आहे हे समजेल. या मंडळाकडून प्रसिद्ध केला जाणारा ‘नॅशनल एअर क्वालिटी इंडेक्स’ या अॅपवर देण्यात येतो आणि दर तासाला यावरची माहिती अपडेट केली जाते. अॅप सुरू केल्यावर तुमच्यासमोर येईल भारताचा नकाशा आणि त्यावर विविध शहरं. यामध्ये विविध रंगांमध्ये आकडेवारी आहे. या प्रत्येक रंगाला काही अर्थ आहे. गडद हिरवा रंग म्हणजे हवेचा चांगला दर्जा. फिकट हिरवा म्हणजे समाधानकारक, पिवळा म्हणजे सुमार, नारिंगी म्हणजे खराब, लाल म्हणजे अतिशय वाईट आणि तपकिरी म्हणजे गंभीर. अशा प्रकारच्या हवेचे तब्येतीवर काय परिणाम होऊ शकतात हेदेखील इथे दिलेलं आहे. पण या अॅपची सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे तुम्ही तुमच्या वायूप्रदूषण संबंधित तक्रारी या अॅपवर नोंदवू शकता, त्याविषयीचे फोटो पाठवू शकता आणि या तक्रारींचा मागोवाही घेऊ शकता.  तुमच्या जवळपासच्या भागातून कोणी काही तक्रार दाखल केली आहे का, हेदेखील पाहता येईल.

SAFAR - Air
समीर अॅप सारखंच हवेचा दर्जा सांगणारं आणखी एक अॅप - सफर एअर. भारतीय उष्णदेशीय हवामानशास्त्र संस्था, पुणे (Indian Institute of Tropical Meteorology, Pune) यांनी हे अॅप विकसित केलेलं आहे. महाराष्ट्रातल्या मुंबई, पुणे आणि अहमदनगर या शहरांसाठी हे अॅप चांगलं आहे. कारण या अॅपवर तुम्हाला या तीन शहरांतल्या विविध भागामधल्या वा उपनगरामधल्या प्रदूषण आणि हवेच्या दर्जाविषयी माहिती मिळेल. याशिवाय या अॅपची खासियत म्हणजे हे अॅप इंग्रजी, हिंदी, मराठी आणि गुजराती अशा चार भाषांमध्ये उपलब्ध आहे. या तीन शहरांशिवाय दिल्लीच्या एअर क्वालिटीविषयीची माहिती तुम्हाला या अॅपवर मिळेल. तुमच्या शहरातलं वातावरण आज कसं आहे, आणि काय करायला हवं हे या अॅपवर तुम्हाला समजेल.

Weather Underground
भारतामध्ये आणि एकूणच जगभरामध्ये हवामानाचा अभ्यास करणाऱ्या आणि त्याविषयीचे अंदाज आणि इशारे जाहीर करणाऱ्या अधिकृत संस्था आहेत. परंतु जगभरात असे अनेक हौशी हवामानअभ्यासक आहेत जे आपापल्या भागांमध्ये आपली स्वतःची उपकरणं उभारून लहानशी वेधशाळा चालवत असतात. मोठ्या वेधशाळा जर पूर्ण शहर, राज्य वा देशाविषयीची माहिती देत असतील तर हे हौशी हवामानअभ्यासक जास्तीत जास्त स्थानिक माहिती पुरवत असतात. या सगळ्यांनी एकत्र येऊन उभारलेला प्लॅटफॉर्म म्हणजे - वेदर अंडरग्राऊंड. इथे तुम्हाला जगभरातल्या हौशी हवामानअभ्यासकांनी पोस्ट केलेली माहिती मिळेल. त्यामुळेच तुमच्या घराजवळच्याच कोणीतरी पोस्ट केलेली आकडेवारी या अॅपवर पाहायला मिळायची शक्यता जास्त आहे.   
याशिवाय हवामानाखात्याच्या  http://www.imd.gov.in या अधिकृत वेबसाइटवरही भरपूर माहिती उपलब्ध आहे. यामध्ये हवमानखात्याकडून देण्यात येणारे विविध इशारे तर आहेतच, सोबतच तापमान, हीट-वेव्ह या विषयीची माहिती, समुद्रात जाणाऱ्यांसाठीची विशेष माहिती या वेबसाइटवर आहे. पावसाविषयीची माहिती, विविध नकाशे आणि सॅटलाईट इमेजेस या वेबसाईटवर आहेत. पर्यटकांसाठीही खास माहिती देणारी लिंक इथे आहे. तुम्ही पूर्ण आठवड्याचा अंदाज पाहू शकता. डोंगराळ भागांमध्ये जाणाऱ्यांसाठी ‘माऊंटन फोरकास्ट’ आहे. आणि वैष्णोदेवीला जाणाऱ्यांना माहिती देण्यासाठीही एक स्वतंत्र पर्याय आहे. फक्त एकच गोष्ट - ही वेबसाइट पहिल्यांदा पाहताना काहीशी क्लिष्ट वाटू शकते, परंतु काही वेळ वेबसाइटवर घालवल्यानंतर इथून माहिती मिळवणं फारसं कठीण जाणार नाही. 
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link