Next
छोट्या कविता
डॉ. नीलिमा गुंडी
Friday, September 06 | 04:00 AM
15 0 0
Share this story





काही कवींनी मोठ्यांसाठीही छोट्या कविता लिहिल्या आहेत. त्यातल्या काही तुम्हाला कळण्याजोग्या आहेत. छोटी कविता लिहिणं, ही गोष्ट सोपी नाही. तीन ते सहा ओळींमध्ये एखादी कल्पना पूर्णपणे शब्दांत उतरवणं, हे कौशल्याचं काम असतं.
छोट्या कवितांचा एक प्रसिद्ध प्रकार म्हणजे हायकू. हा काव्यप्रकार जपानमधून आपल्याकडे आला आहे. त्यात एखाद्या क्षणातली नाजूक घटना किंवा निसर्गचित्र रेखाटलेलं असतं. शिरीष पै यांचा हा हायकू पाहा :
इतक्या वेगानं गाडी पुढं गेली
रस्त्यावर उमललेली रानफुलं
डोळे भरून पाहाताही नाही आली
सुधीर मोघे, रॉय किणीकर अशा इतर कवींनीही छोट्या कविता लिहिल्या आहेत. चंद्रशेखर गोखले यांच्या चारोळ्या (चार ओळींच्या कविता) खूप प्रसिद्ध आहेत.
उदाहरणार्थ –
अळवाच्या पानावर कसं
पाणी स्वतःला सावरून बसतं
मोत्यासारखं दिसायच्या नादात
वाहणंच हरवून बसतं
केशवकुमारांनीही विनोदासाठी ‘चारोळी’ हा काव्यप्रकार वापरला आहे. ज.के. उपाध्ये यांची ही सहा ओळींची विनोदी कविता विरामचिन्हांनुसार मोठ्याने वाचून पाहा! खूप मजा वाटेल!
लाविला गुलाबी रंग, किती सुंदर अमुच्या बंग-,ल्या प्रती
शोभती कसे हे खांब, त्यांवरी वेलही लोंब-, ती किती
मोगरी चमेली कुंद, लाविली चहुकडे सुंद-, रा कृती
अंगणी छानसा कुंज, वृंदावनी तुळशी मंजी-, ऱ्या किती
गुंजतात गुंगुं भृंग, तो नाद तयांचा गुंग-, वी किती
कवितेत जरी यतिभंग, जमविले यमक परि चांग-ले किती’
या कवितेचं नाव आहे, ‘चहा- टळपणा’. कवीनं यात चुकीच्या ठिकाणी शब्द तोडल्यामुळे निर्माण होणारा दोष (यतिभंग) मिष्कीलपणे दाखवून दिला आहे. दिसायला कविता छोटी आहे, पण अर्थाने मोठी आहे किनई?


 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link