Next
महाराष्ट्रातील विठ्ठलमंदिरे
सायली जोशी-पटवर्धन
Friday, July 05 | 01:00 PM
15 0 0
Share this story

मे महिना सरत आला की शेतकऱ्यांना जशी पावसाची चाहूल लागते, तशीच वारकरी संप्रदायाला आपल्या लाडक्या विठुमाऊलीला भेटायची ओढ लागलेली असते. आषाढीवारीच्या निमित्ताने, पांडुरंगाच्या भेटीसाठी वारकरी विठूनामाचा गजर करत मैलोन् मैल अंतर पायी कापतात. आषाढी एकादशीच्या दिवशी पंढरपूरच्या विठ्ठलाचे दर्शन घेतल्यानंतर ही वारी पूर्ण झाली असे मानले जाते. अर्थात पंढरपूर आणि विठुराया महाराष्ट्रभर सर्वांच्या ठायी ठायी विराजमान असते आणि त्यामुळेच राज्यभर पसरलेली विठुरायाच्या मंदिरांमध्येही भक्तीचा पूर असतो.  
मंदिर हा भारतीय संस्कृतीचा अविभाज्य घटक असून महाराष्ट्रात असे एकही गाव सापडणार नाही जिथे मंदिर नाही. सांस्कृतिक वारसा जपणारी ही मंदिरे सामाजिक, धार्मिक केंद्र म्हणून ओळखली जातात. पूर्वीपासून मंदिरे ही यात्रा-जत्रांमुळे, खेळांच्या आखाड्यापासून  कौटुंबिक न्यायनिवाड्यापर्यंत अनेक गोष्टींसाठी प्रसिद्ध होती. मंदिरांची परंपरा आपल्याला त्या भौगोलिक प्रदेशाची संस्कृती सांगून जाते. हेमाडपंती, यादवकालीन, शिवकालीन किंवा मध्ययुगीन अशी विविध काळाचा ठसा असलेली राज्यातील अनेक मंदिरे स्थापत्यशास्त्राचा उत्तम नमुना म्हणूनही प्रसिद्ध आहेत.

नागपुरातील सावनेर विठ्ठलमंदिर


संपूर्ण देशात हे मंदिर प्रसिद्ध आहे. होली चौकात असलेले हे मंदिर प्राचीन जागृत देवस्थान म्हणून ओळखले जाते. एका भक्ताने विठ्ठलावरील भक्तीपोटी आपल्या शेताची ६ ते ७ एकर जमीन मंदिरासाठी दान दिली होती. गावातील एक कुटुंब दरवर्षी मंदिराच्या आवारातील शेती करते. त्यावर्षी मंदिराची जबाबदारी त्या कुटुंबावर असते. हे अतिशय प्रसिद्ध मंदिर असले, तरीही त्याची योग्य पद्धतीने देखभाल केली जात नाही. मंदिराची योग्य पद्धतीने डागडुजी केली नसल्याने या ठिकाणी येणाऱ्या भाविकांची संख्या तशी कमी असते.

बार्शीतील भगवंतमंदिर


बार्शी शहर भगवंतमंदिरासाठी प्रसिद्ध आहे. या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे संपूर्ण भारतात विष्णूला भगवंत या नावाने ओळखले जाणारे हे एकमेव मंदिर आहे. इ. स. १२४५ मध्ये हेमाडपंती शैलीत या मंदिराचे बांधकाम करण्यात आले. मंदिराला चार दिशांनी चार प्रवेशद्वारे आहेत. परंतु मुख्य प्रवेशद्वार पूर्वाभिमुख आहे. येथील भगवंताची मूर्ती काळ्या पाषाणाची असून भगवंताच्या हातात शंख, चक्र आणि गदा आहेत. राजा अंबरीशची मूर्ती भगवंताच्या उजव्या हाताला असून भगवंताच्या पाठीमागे लक्ष्मी आहे. भगवंताच्या कपाळावर शिवलिंग असून छातीवर भृगूऋषीच्या पायाचे ठसे आहेत.


या मंदिराला नानासाहेब पेशवे यांच्याकडून १७६० साली, ईस्ट इंडिया कंपनीकडून १८२३ साली व ब्रिटिश सरकारकडून १७८४ मध्ये इनाम मिळाल्याच्या नोंदी आहेत. मंदिराची देखभाल पंच कमिटीमार्फत केली जाते. मंदिराच्या नित्य सेवांमध्ये बडव्यांकडून सकाळी काकड आरती, नित्यपूजा, महापूजा, संध्याकाळी धुपारती व रात्री शेजारती संपन्न होते. आषाढी, कार्तिकी, चैत्री व माघी एकादशीच्या दरम्यान असणाऱ्या यात्रा व महोत्सवादरम्यान भक्तगण भगवंताचे दर्शन घेण्यासाठी मोठ्या संख्येने येतात. आषाढी व कार्तिकी एकादशीच्या वेळेस भगवंताची गरुडावर बसून नगरप्रदक्षिणा केली जाते.

माढ्यातील विठ्ठलमंदिर


माढा हे वीस-पंचवीस हजार वस्तीचे सोलापूर जिल्ह्यातील गाव. निंबाळकरांची जहागिरी असणाऱ्या माढ्यातील हे विठ्ठलमंदिर रा. चिं. ढेरे यांच्या संशोधनाने अचानक प्रकाशात आले. माढ्यातील विठ्ठलमंदिर फारसे गजबजलेले नाही, पण मंदिरातील विठ्ठलमूर्ती प्राचीन असून रेखीव आणि गूढ अशी थेट पंढरपूरच्या विठ्ठलाशी नाते सांगणारी आहे. या मंदिराच्या चारही बाजूंना मशिदीच्या मिनारांसारखे बांधकाम आहे. ढेरे यांनी अभ्यासपूर्ण स्पष्टीकरण देत म्हटले आहे, की पंढरपुरात असलेली विठ्ठलमूर्ती ही मूळ यादवकालीन मूर्ती नाही. पण मूळ मूर्तीची जी लक्षणे सांगितली जातात, तशी मूर्ती माढ्यात सापडते. त्यांचे हे संशोधन प्रसिद्ध झाल्यावर मोठे वादळ उठले होते. पंढरपूरच्या बडव्यांपासून  अनेक भक्तांनी या संशोधनाला विरोध केला. अनेक वर्षे सुरू असलेला तो वाद कालांतराने शांत झाला. अफझलखानाने १६५९ मध्ये केलेल्‍या आक्रमणाच्या वेळी पंढरपूरची मूर्ती माढा येथे हलवली होती, अशीही माहिती आहे.

टाकळीभान विठ्ठलमंदिर


अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यातील हे एक पुरातन मंदिर आहे. यादवकालीन मंदिर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या मंदिरातील विठ्ठलमूर्ती रुक्मिणीसहित असून, चतुर्भुज आहे. या मूर्तीची आणखी काही वैशिष्ट्ये आहेत. या मूर्तीमध्ये विठ्ठलाची ओळख असणारे दोन हात कंबरेवर आहेतच. तसेच तिला आणखी दोन हात असून त्यातील एका हातात शंख तर दुसऱ्या हातात चक्र आहे. या विठ्ठलाला मिशाही आहेत! येथील गाभाऱ्याचे दार अतिशय पुरातन असे आहे. त्यावरील कोरीव कामावरून हे मंदिर किती जुने असेल ते लक्षात येते. येथील श्रीविठ्ठलाच्या मूर्तीवर स्थानिक शिल्पवैशिष्ट्यांची छाप दिसून येते. ही मूर्ती विष्णूस्वरूपात असल्याची मोठी साक्ष आहे. आषाढीउत्सव हा येथील पर्वणीचा काळ असल्यामुळे भाविक, ग्रामस्थ कामानिमित्त बाहेरगावी स्थायिक झाले असले, तरी या आषाढी उत्सवसोहळ्याला ही मंडळी आवर्जून गावाकडे येतात. आषाढ शुद्ध प्रतिपदा ते पौर्णिमा यादरम्यान येथील उत्सव साजरा केला जातो. यादरम्यान दिंडी, आरती, महाप्रसाद, भजन-कीर्तन असे विविध कार्यक्रम होतात. पौर्णिमेच्या दिवशी दहिहंडीच्या कार्यक्रमाने उत्सवाची सांगता होते. या दिवशी यमुना नदीकिनारी श्रीकृष्णाने जे खेळ खेळले होते, ते खेळ दहिहंडीच्या वेळी खेळले जातात. हे खेळ पाहण्यासाठी व दहिहंडीच्या प्रसादासाठी भाविक, ग्रामस्थ मोठी गर्दी करतात. या विठ्ठलमूर्तीच्या गळ्यात वैजयंती माळ असून जानवेही कोरलेले आहे. कंबरेवर मेखला असून तिने दुटांगी धोतर नेसले आहे. विठ्ठलाच्या मुकुटावर शाळुंकेसह शिवलिंग कोरलेले असल्याने शिव-विष्णूच्या समन्वयाच्या प्रक्रियेत ही मूर्ती घडली असल्याचे स्पष्ट होते.

पट्टणकोडोली येथील विठ्ठलमंदिर


कोल्हापूरपासून अठरा किलोमीटर अंतरावर हातकणंगले तालुक्यात पट्टणकोडोली हे गाव आहे. गावाला लागून असलेल्या उंच माळावर विठ्ठल बीरप्पाचे मंदिर आहे. पट्टणकोडोली गावात धनगरांची संख्या मोठी आहे. नारायण गावडा हा विठ्ठल बीरप्पाचा आद्य पुजारी असल्याची नोंद आहे. त्याच्या वंशजांची पाचशे घरे आता गावात असून दर आठवड्याला एका कुटुंबाकडे पूजाधिकार असतात. या मंदिरात विठ्ठल आणि बीरदेव यांच्या स्वयंभू पिंडी आहेत. लिंगायतांच्या गळ्यात ज्याप्रमाणे लिंग घातलेले असते त्याचप्रमाणे विठ्ठल-बीरदेवाच्या पिंडीवर उत्सवादरम्यान लिंग घालण्याची प्रथा आहे. मंदिरात विठ्ठलाचा एक तांदळा आहे, त्याचप्रमाणे एका कोनाड्यात रखमाईसह विठ्ठलाची एक मूर्ती आहे.

सिद्धेश्वर कुरोलीचा विठ्ठल-बिरोबा

सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यात सिद्धेश्वर कुरोली हे विठ्ठलाचे ठाणे आहे. येथे विठ्ठल-बिरोबा हा जोडदेव आहे. विठ्ठलभक्तांनी येथे विठ्ठल-रुक्मिणीचे मंदिर उभारले आहे. हे मंदिर अतिशय जुन्या पद्धतीचे असल्याने त्याच्या भिंती दगडी आहेत. मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये ११ फूट उंचीच्या तीस दीपमाळा आहेत. बिरोबासह विठ्ठल-रुक्मिणीच्या अडीच फूटांच्या मूर्ती या ठिकाणी आहेत. याबरोबरच येथे एक शिवलिंगही आहे.

पोखरापूरचा धनाजी विठोबा
सोलापूरमधील मोहोळ तालुक्यातील धनाजी विठोबा हे एक अतिशय जुने असे विठ्ठल-बीरदेवाचे ठाणे आहे. या ठिकाणी विठ्ठलाची दोन मंदिरे आहेत. यातील एक मंदिर माळावर आहे, हा माळ दंडीचा माळ म्हणून ओळखला जातो. आजूबाजूच्या चार गावकऱ्यांमध्ये झालेल्या हद्दीच्या भांडणानंतर पोखरापूरच्या गावकऱ्यांनी विठ्ठल-बिरदेवाचे मंदिर बांधले. माळावरचे जुने मंदिर दोनशे ते अडीचशे वर्षे जुने असावे, असे येथील गावकऱ्यांचे म्हणणे आहे.

बेल्हेचा गुप्त विठोबा


गुप्त विठोबा असे अनोखे नाव असलेले हे मंदिर याच नावाने प्रसिद्ध आहे. पुणे-नाशिक महामार्गावरील आळेफाट्यापासून अहमदनगरच्या रस्त्यावर बेल्हे नावाचे गाव लागते. या गावातील डोंगराच्या कुशीत वसलेल्या बांगरवाडीत हे पांडुरंगाचे ऐतिहासिक मंदिर आहे. गर्द झाडीत असणारे हे मंदिर पाहताक्षणी भुरळ पाडेल, असेच आहे. हे मंदिर पूर्वाभिमुख असून गुहेच्या वर उभारले आहे. यातील गुहेत असलेल्या विठोबालाच गुप्त विठोबा म्हणतात. आताचे मंदिर जीर्णोद्धारित असून १९२१ मध्ये प्रसिद्ध मूर्तिकार कृष्णा भागवत यांनी भुयारातील मूर्ती नव्याने बसवली. गुहेच्या वरही मंदिर असावे, म्हणून ग्रामस्थांनी १९६४ मध्ये नवीन मंदिर बांधले. या मंदिराच्या नावाची एक कथा सांगितली जाते. गावातील एका गुराख्याला एक भुयार दिसले. ते खोदून आत गेले असता त्याला भुयारात विठ्ठल-रुक्मिणीच्या मूर्ती दिसल्या. ही भुयारी जागा गुप्त असल्याने या विठोबाला गुप्त विठोबा म्हटले जाते. येथील विठ्ठल-रुक्मिणीची मूर्ती अतिशय देखणी आहे. येथील ग्रामस्थ या मंदिराला प्रतिपंढरपूर म्हणतात.

पंढरपूरचे विठ्ठलमंदिर
पंढरपूर हे भारताची दक्षिण काशी व महाराष्ट्राचे कुलदैवत म्हणून प्रसिद्ध आहे. विठ्ठलाच्या प्राचीन मंदिराचा इसवी सन ११९५ मध्ये जीर्णोद्धार करण्यात आला. शहरात इतर हिंदू देवतांची मंदिरे व अनेक संतांचे मठ (धर्मशाळा) आहेत. पंढरपूर शहर चंद्रभागा (भीमा) नदीच्या काठावर वसले आहे. आषाढी व कार्तिकी एकादशी या व्यतिरिक्त पंढरपुरात भाविक वर्षभर विठुरायाच्या दर्शनासाठी गर्दी करतात. आषाढी व कार्तिकीवारीसाठी राज्यातील विविध ठिकाणाहून संतांच्या पालख्या निघून वाखरी येथे जमतात. विठ्ठलमंदिरात काकडआरती, महापूजा, महानैवेद्य, पोशाख, धूपारती, पाद्यपूजा, शेजारती इत्यादी विविध नित्योपचार केले जातात. विठ्ठल-रुक्मिणी मंदिराबरोबरच या मंदिराच्या आवारात इतरही अनेक देवांची मंदिरे आहेत. यामध्ये गणेशमंदिर, दत्तमंदिर, गरुडमंदिर, मारुतीमंदिर, चौरंगीदेवीमंदिर, गरुडखांब, नरसिंहमंदिर, एकमुख दत्तात्रयमंदिर, रामेश्वरलिंगमंदिर, कालभैरवमंदिर, लक्ष्मीनारायणमंदिर, काशीविश्वनाथमंदिर, सत्यभामामंदिर, राधिकामंदिर, सिद्धिविनायकमंदिर, महालक्ष्मीमंदिर, व्यंकटेश्वरमंदिर, कान्होपात्रामंदिर, अंबाबाईमंदिर, शनीदेवमंदिर, नागनाथमंदिर, गुप्तलिंगमंदिर, खंडोबामंदिर यांचा समावेश आहे.
महाराष्ट्राबरोबरच राज्याच्या बाहेरही देशभरात विठ्ठलाची मंदिरे आहेत आणि तेथील भक्त मनोभावे त्याची पूजा-अर्चा करतात. महाराष्ट्रात अनेक संप्रदायांचा पाया रचला गेला, कालानुरूप ते रुजले आणि नंतर काही कारणांनी कमकुवत होत गेले. विठ्ठलभक्ती आणि वारकरी संप्रदायाच्या बाबतीत मात्र तसे न होता विठ्ठलाकडे असणारा ओढा दिवसेंदिवस वाढतच आहे.
( या लेखासाठी व काही मंदिरांच्या तपशिलासाठी रा.चिं. ढेरे यांच्या ‘श्रीविठ्ठल : एक महासमन्वय’ या ग्रंथांतील संदर्भ घेण्यात आले आहेत.)

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link