Next
कर्तव्य करणं हाच धर्म!
सतीश स. कुलकर्णी
Friday, October 19 | 03:30 PM
15 0 0
Share this story

पाथर्डी तालुक्यातील जाटदेवळे इथं श्री. मुकुंदकाकांचा जन्म झाला. श्री. महिपतीमहाराज यांचे ते पणतू. बालपणीच गमावलेली दृष्टी संकट न मानता मुकुंदकाकांनी संसार आणि परमार्थ एकाच ताकदीनं पुढे नेला. ज्ञानेश्वरी त्यांनी मुखोद्गत केली. वारकरी संप्रदायाची ध्वजा खांद्यावर घेऊन आळंदी व पंढरीची वारी करणाऱ्या श्री. मुकुंदकाकांनी तीन तपांमध्ये दहा हजारांच्या आसपास कीर्तन-प्रवचनांतून नामभक्तीचा महिमा पोहोचवला. अमृतमहोत्सवानिमित्त त्यांच्याशी झालेला हा संवाद

 आयुष्याचा महत्त्वाचा टप्पा तुम्ही गाठला – वयाचा अमृतमहोत्सव. तुमच्या भावना काय आहेत?

कृतार्थ आहे मी. सांसारिक आयुष्याचे विविध टप्पे होऊन गेले. त्यातील एखादा विपन्नावस्थेचा, एखादा मनस्तापाचा आणि काही सुखा-समाधानाचे होते. हे झाल्यावर त्या त्या वेळी विसरून गेलो. आयुष्यातली सकारात्मक बाजू सांगतो. माझी साधना, भेटलेले (चांगले) लोक, त्यांचं मोठेपण, त्यांनी केलेले उपकार, त्यांच्या संगतीमुळे लाभलेला आनंद या सगळ्या चांगल्या बाबी. याहून मोठा आहे तो आध्यात्मिक आनंद. माणसाचं जीवनच त्यासाठी आहे. तो असेल तर दुःख सहन करण्याची, त्यातून बाहेर पडण्याची ताकद मिळते. परमार्थाचा अभ्यास असल्यावर दुःखातून शिकता येतं, सावध होता आणि करताही येतं.

दीर्घ व्यावहारिक आणि आध्यात्मिक प्रवासातील काही अनुभव, आठवणी?

खूप अनुभव आले या प्रवासात. नकारात्मक सांगायचं झालं, तर मला दृष्टी नाही. मला असं पाहून लोक तळमळायचे. मला मात्र डोळे नसल्याचा फायदाच झाला. आध्यात्मिक वाटचाल चांगली झाली. डोळे आणि कान, हे अवयव दोषाचरण करतात. त्यातून माझी सुटका झाली. व्यवहारात अडचणी आल्या खरं; पण गोड बोलण्यानं, विनम्र असण्यानं लोक मदत करतात. समाजाच्या आणि सज्जनांच्या साहाय्यानं संसार आणि परमार्थ दोन्हीकडे सुखाची वाटचाल झाली.

आध्यात्मिक क्षेत्रात तुमचं काम आणि नावही मोठं, पण व्यावहारिक जीवनात तुम्हाला बरंच सोसावं लागलं. पत्नीसह रोजगार हमी योजनेवर काम केलंत तुम्ही. या सगळ्याबद्दल आता काय वाटतं?

मी मघाशी म्हणालो ना, झालं ते त्या त्या वेळी सोडून दिलं. आमचं कुटुंब गरीबच होतं. कष्ट तर करावेच लागणार. म्हणून मी १८ वर्षं पिठाची गिरणी चालवली. रोजगार हमी योजनेवर काम केलं असं म्हणायचं, पण तिथं लोकांनी मला काम करूच दिलं नाही. त्यांनी खूप सौजन्याची वागणूक दिली तेव्हा. माझ्या पत्नीनं मात्र खरोखर काम केलं. सांसारिक व्यवहाराचा सगळा बोजा काही माझ्यावर कधीच पडला नाही. आधी वडील, मग भाऊ यांनी सगळं पाहिलं. लग्नानंतर पत्नी मदतीला आली, आता चिरंजीव. या सगळ्यांच्या रूपानं देवानंच माझा संसार मार्गी लावला.

सर्वसामान्य माणसाचा धर्म आणि अध्यात्म यात काही फरक आहे का? धार्मिक व आध्यात्मिक असणं या तत्त्वज्ञानाच्या पातळीवर वेगळ्या निष्ठा मानतात का?
या शब्दांमध्ये, त्यांच्यात दडलेल्या अर्थात फरक आहे आणि नाहीही. मनुष्यजन्मात कुटुंबाबद्दल, समाजाबद्दल काही बांधिलकी असते. मुलगा लहान असल्यावर आई-वडील त्याचं सगळं करतात आणि वृद्धपणी मुलानं त्यांचा संभाळ करायचा, त्यांची सेवा करायची, हा झाला धर्म. ज्याला सगळे कर्मकांड म्हणतात, ते वाईट नाहीच कधी. ते धर्माचंच अंग आहे. जीवन सुखी करण्यासाठी कर्मकांड म्हणजे उत्कृष्ट साधन आहे. त्यासाठी भावना शुद्ध हवी. मनात कामना ठेवून हे काही करू नये. निष्काम भावनेनं हे कर्मकांड केलं, की तो झाला धर्म! हे नित्य काम शास्त्राच्या पद्धतीनं केलं, की कर्मकांड कर्मयोग होतो! आध्यात्मिक जीवनाचा तोच पाया असतो. उत्तम स्वभाव ठेवून, बांधिलकीनं योग्य असेल ते प्रत्येकानं केलंच पाहिजे. म्हणजे मग सगळा समाज सुखानं नांदता राहील. कुटुंब, समाज, राष्ट्र यांच्यासाठीचं कर्तव्य करणं हा धर्म आहे. त्यातूनच अध्यात्माकडे जाता येतं. ऐहिक आणि पारलौकिक फळांबाबत उदास होणं, फक्त परमेश्वराची इच्छा करणं म्हणजे धर्म होय. पाप-पुण्यातीत असणं, कर्माचं फळ न भोगणं म्हणजे अध्यात्म आणि परमार्थ.

अलिकडच्या काळात संतांची जाती-समाजामध्ये वाटणी केले जाते. या प्रकाराबद्दल तुम्हाला काय वाटतं?
संतांची अशी जातिनिहाय वाटणी करणं हा निव्वळ मूर्खपणा आहे! काही मंडळी स्वार्थ, आकस ठेवून ही भेदभावना रुजवत आहेत. संतांना जात नसते. जात देहाला असते. समाजासाठी देहावर तुळशीपत्र ठेवणाऱ्या संतांना कसली आलीय जात? संत तुकाराममहाराजांनी सांगितलं आहेत –
शाळिग्राम विष्णुमूर्ती। संत हो का भलते याती।।
सगळेच संत तुलनेनं मोठेच होते. संत म्हटलं, की आपण आपलं नतमस्तक व्हावं. त्यांचा सल्ला आचरणात आणावा. जातीय भेद निर्माण करून स्वार्थ साधण्यासाठी तथाकथित शिक्षित, धूर्त माणसांकडून संतांना जात चिकटवली जात आहे.

देशी गायींचं पालन-संवर्धन यासाठी तुम्ही गोशाळा चालवता. अलिकडे गोरक्षण, गोरक्षक हे वादाचे मुद्दे बनले आहेत. त्याबद्दल काय वाटतं?
गोरक्षकांच्या बाबतीत विकृत गोष्टींना अधिक प्रसिद्धी दिली जाते, असं मला वाटतं. गोरक्षण करणाऱ्यांना तेवढं प्रकाशात का आणलं जात नाही? हा संघर्ष का होतो, याचं उत्तर आहे – कायद्याचं उल्लंघन होत असल्यानं. गाय देव आहे, हा भावनेचा प्रश्न आहे. गाय म्हणजे उपयुक्त पशू, असं काही जण म्हणतात. मग उपयुक्त प्राण्याचं संगोपन करणं, संवर्धन करणं माणसाचं कर्तव्य नाही का?

देशाच्या भवितव्याबद्दल तुम्ही कितपत आशावादी आहात?
देशात सद्यस्थितीत अस्वस्थता जाणवते, असं ज्यांना वाटतं, त्यांनी ती दूर करण्याचे उपायही सुचवावेत. देशात काय नि जगात काय, सज्जन आणि दुर्जन असतातच. सज्जनांची संख्या जास्त होते, तेव्हा त्यांचे विषय हाताळले जातात. वाईट तेवढंच आज दाखवलं जातं ना? चांगली कामंही मांडून चेतना देणं अधिक राष्ट्रकल्याणकारक होईल. परिस्थिती कशीही असो, आपण आपलं कर्तव्य करत राहावं. परमेश्वरावर भक्ती असणाऱ्या प्रत्येकानं राष्ट्राच्या भविष्याबद्दल आशावादीच राहिलं पाहिजे. राष्ट्र म्हणजे संस्कृती. समाजाच्या कल्याणाचाच विचार करणाऱ्या माणसांवर संस्कृती ठरत असते.

हा देश घडवणाऱ्या तरुण पिढीसाठी संदेश?
तरुण पिढीनं फक्त तीन गोष्टी कटाक्षानं कराव्यात आणि पाळाव्यात.
१) इंद्रियांवर पूर्ण संयम ठेवा. चारित्र्य शुद्ध राखा. शुद्ध चारित्र्य हाच भारतीय संस्कृतीचा पाया आहे. २) वृद्धांचा कधीच अपमान नि अव्हेर करू नका. अहंकार बाजूला ठेवून त्यांच्याशी नेहमीच नम्रतेनं वागा. ३) दररोज एक तास संतवाङ्मयाचा अभ्यास करा. त्याचं वाचन, चिंतन करा; त्यावर चर्चा करा. कोणत्याही क्षेत्रात गेलात तरी यामुळे कधीच निराशा येणार नाही. कारण तुमचा पाया भक्कम झालेला असेल.

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link