Next
सुरुंगाच्या स्फोटात आले वीरमरण
शब्दांकन : पराग पोतदार
Friday, June 28 | 06:00 PM
15 0 0
Share this story


आमच्या घरात तशी सैन्याची परंपरा नव्हती, पण सुशांतला मात्र लहानपणापासून सैन्याची आवड. सुशांतने आपल्या सैनिकी ध्येयाचा पाठपुरावा केला आणि या वर्दीसाठीच तो त्याचे आयुष्य जगला आणि देशासाठी त्याने प्राणही ओवाळून टाकले. 

 लहानपणापासूनच आपण सैन्यात भरती व्हावे असे सुशांतला वाटायचे. त्याने तेव्हापासून मनाशी जपलेले ते स्वप्न होते. बारावीनंतर त्याने राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी धडपड केली, परंतु ते शक्य झाले नाही. त्यानंतर त्याला वाटत होते की आता आपल्याला सैन्यात भरती व्हायला मिळेल की नाही. मग त्याने विज्ञानशाखेची पदवी मिळवून नौदलामध्ये प्रवेश मिळतो का, यासाठी प्रयत्न केला. मात्र त्यातही त्याला अपयश आले. परंतु अपयश आले म्हणून हरून जाणे, हा त्याचा स्वभाव नव्हता. त्याने अथक परिश्रम सुरू ठेवले. लहानपणी तो मलखांबावर सराव करायचा. भरपूर व्यायाम करायचा त्यामुळे त्याचे शरीर सुदृढ आणि पीळदार होते. हाती घेतलेले काम निष्ठेने आणि कष्टाने करायचे, त्या कामात स्वत:ला झोकून द्यायचे हे बाळकडू त्याला आमच्या घरातूनच मिळाले होते. राष्ट्रीय छात्रसेनेतील प्रमाणपत्र आणि थेट मुलाखत या माध्यमातून त्याला अखेर सैन्यात प्रवेश मिळाला आणि त्याचे एक मोठे स्वप्न साकार झाले. 

तो सीमेवर असताना आम्हाला मात्र कायम इकडे त्याची चिंता असायची, त्याचवेळी तो देशासाठी सीमेवर उभा आहे, याचा विलक्षण अभिमानसुद्धा वाटायचा. बंगाल सॅपर्सच्या ६३ व्या पलटणीमध्ये तो कॅप्टन म्हणून दाखल झाला. लहानपणापासूनच त्याचे ध्येय निश्चित होते, त्या दिशेने तो प्रवास करत होता. माझ्यासह त्याची आई गीतादेखील त्याच्या कायम पाठीशी होती. मुळात सुस्वभावी असलेल्या सुशांतने सैन्यातही अल्पावधीत स्वत:ची ओळख निर्माण केली. सैन्याच्या तुकडीत तो सर्वांचा लाडका होता. सहकाऱ्यांमध्ये लोकप्रिय होता. 

कायम कुठल्याही बाबतीत आघाडीवर राहण्याचा त्याचा स्वभाव सैन्यात संपणे शक्यच नव्हते. तिथेही तो कायम सगळ्यांच्या पुढे असायचा. मग ती जबाबदारी कोणतीही असो. जम्मूजवळ रणबीरसिंगपुरा या भागामध्ये आपल्याच सैन्याने पूर्वी सीमेजवळ पेरलेले सुरुंग निकामी करण्याचे काम सुरू होते. जिवंत सुरुंग निकामी करणे हे तसे जिवावरचेच काम. कॅप्टन सुशांत या कामातही आघाडीवर होता. पावलापावलावर मृत्यू होता. परंतु त्याला कशाचीही भीती वाटत नव्हती. परंतु काळाच्या मनात मात्र वेगळेच काहीतरी होते. एक सुरुंग निकामी करत असताना, २९ जानेवारीला दुपारी दीड वाजता, अचानक एका सुरुंगाचा स्फोट झाला आणि त्यात सुशांतला वीरमरण प्राप्त झाले. विशेष म्हणजे त्याच्यावर त्या दिवशी जबाबदारी सोपवलेली नसतानाही तो केवळ काम मागे राहू नये या भावनेतून तिथे जाऊन स्वत:हून काम करत होता. त्यासाठी त्याने केवळ दहा मिनिटांची परवानगी मागितली आणि तो सुरुंग निकामी करण्यासाठी गेला. मात्र काळ तिथे दबा धरून बसलेला होता आणि त्यात सुशांतला वीरमरण आले. 

अवघ्या घरावर शोककळा पसरली. त्याचा मित्रपरिवार दु:खी झाला. त्याने खूप मित्र जोडलेले होते. गणपतीत ढोल वाजवण्यात तो रंगून जायचा. त्याच्या मित्रांनाही त्याचा अभिमान होता. अगदी सैन्यात असतानासुद्धा आम्हाला त्याच्या एकट्यापुरते खाणे पाठवून भागायचे नाही. 
२८ जणांसाठी पाठवावे लागायचे. सुशांत आमच्यातून गेला हे दु:ख कधीही भरून न येणारे आहे. तो गेल्यानंतर अनेक सैन्यअधिकाऱ्यांची पत्रे आली. त्यांनी त्याच्या कष्ट, मेहनत आणि जिद्दीचे कौतुक केले होते. ज्या ठिकाणी सुशांत स्फोटात गेला त्या ठिकाणी नंतर मी प्रत्यक्षात जाऊन आलो. त्या जागेवर माझे अश्रू देऊन आलो. 

सुशांतच्या अंत्ययात्रेला पुणेकर मोठ्या संख्येने जमले. साश्रू नयनांनी त्याला निरोप देण्यात आला. पुढे महाराणा प्रताप बाग येथे सुशांतचे एक स्मारक उभारण्यात आले. दरवर्षी २९ जानेवारीच्या पुढच्या रविवारी आम्ही त्याच्या स्मरणार्थ एक कार्यक्रम करतो. सैन्याचे शिक्षण घेणाऱ्या मुलांची परेड तिथे होते. सुशांतच्या बरोबरीने वीरगती प्राप्त झालेल्या जवानाचा फोटो ठेवून आम्ही त्याला सलाम करतो. त्याच्या कुटुंबीयांना आधार देतो. सीमेवर असतानाही कर्तव्यनिष्ठ राहणारा आणि कायम स्फूर्ती देणारा मुलगा आम्हाला लाभला याचा आम्हाला कायम अभिमान आहे. 

(शब्दांकन : पराग पोतदार)
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link