Next
आवाज़
प्रदीप निफाडकर
Friday, August 09 | 03:30 PM
15 0 0
Share this story

मिलन झाले, पाहणे झाले, आता प्रतीक्षा होती ती तिच्या मधुर आवाजाची. कधी एकदा ती बोलते असे झाले होते. ती बोलली आणि कुणाला तो शब्दांचा वाहता सागर वाटला, तर कुणाला त्यात फुलाचा सुगंध येऊ लागला, तर कुणाला हवेची प्रसन्न झुळूक वाटली. प्रत्येकाचे आपापले अंदाज होते. हामिद महबूब यांचे तिच्याशी बोलणे झाले तेव्हा त्यांना वाटले- 

चराग़ जलते हैं बाद-ए-सबा महकती है
तुम्हारे हुस्न-ए-तकल्लुम से क्या नहीं होता

दिवे पेटतात, पहाटेची हवा सुगंधित होते. तुझ्या बोलण्याच्या सौंदर्यामुळे काय होत नाही सांग? तर अन्य एक शायर म्हणाले-

फूल की ख़ुशबू, हवा की चाप, शीशे की खनक
कौन सी शय है जो तेरी ख़ुश-बयानी में नहीं

फुलांचा सुगंध, हवेची चाहूल, मद्यप्यालांचा किणकिणाट. तुझ्या आनंदी बोलण्यात कोणती गोष्ट नाही ते सांग? सारे काही आहे. म्हणून एका शायराला वाटले की तिच्या ओठांचे, गालांचे, गळ्याचे चुंबन घेणे वासनामय आहे. त्यापेक्षा-

लहजा कि जैसे सुबह की ख़ुशबू अज़ान दे
जी चाहता है मैं तेरी आवाज़ चूम लूँ

तुझ्या बोलण्याचा डौल असा काही आहे, की जणू पहाटेच्या सुगंधाने अजान द्यावी. मला तर वाटते तुझ्या त्या आवाजाचेच चुंबन घ्यावे. आवाजाचे चुंबन काय कल्पना आहे, वाहवा! म्हणून अहमद मुश्ताक़ म्हणाले होते-

मौत ख़ामोशी है चुप रहने से चुप लग जाएगी
ज़िंदगी आवाज़ है बातें करो बातें करो

मृत्यू म्हणजे भयाण शांतता आहे. आपण गप्प बसलो तर गप्पच बसून मृत्यू येईल. जीवन म्हणजे आवाज आहे. बोलत राहा. गप्पा मारत राहा. मग त्या मित्राशी असो की प्रेयसीशी, घरातल्यांशी असो की शेजारच्यांशी, प्रवासातल्या लोकांशी असो की पानपट्टीवाल्याशी. पण बोला. जिथे आवश्यक आहे तिथे तर अजिबात गप्प बसू नका. असा आवाज दिल्याने काय होईल, ते मात्र मुनीर नियाज़ी यांच्याकडून ऐका-

आवाज़ दे के देख लो शायद वो मिल ही जाए
वर्ना ये उम्रभर का सफ़र राएगाँ तो है

आवाज दिला तर कदाचित ती भेटेल तुम्हाला. नाहीतर हा आयुष्याचा प्रवास फुकट केला असेच वाटेल. बोलत राहा. आवाज देत राहा. का बोलायचे त्यावर आणखी एका शायराने प्रेयसीला समजावले आहे-

बोलते रहना क्यूँकि तुम्हारी बातों से
लफ़्ज़ों का ये बहता दरिया अच्छा लगता है

बोलत राहा. कारण तुझ्या गप्पांमधून हा शब्दांचा वाहता दर्या फार छान वाटतो. जोश मलीहाबादी यांना तर कुणाशीही बोलले तरी तिचाच आवाज ऐकू येत होता-

कोई आया तेरी झलक देखी
कोई बोला सुनी तेरी आवाज़

कोणी आले तर तुझ्याच दर्शनाची झलक पाहायला मिळाली. कोणी बोलले तरी तुझाच आवाज ऐकल्यासारखे वाटले. भास झाला. किती मी तुझ्यामय झालो आहे. किती तू माझ्यात भिनली आहेस. हा अनुभव ग़ुलाम मोहम्मद क़ासिर यांनाही आला. ते म्हणाले-

तेरी आवाज़ को इस शहर की लहरें तरसती हैं
ग़लत नंबर मिलाता हूँ तो पहरों बात होती है

तुझा आवाज ऐकण्यासाठी शहरातील प्रत्येक लाट तडफडते आहे. मी मुद्दामून चुकीचा क्रमांक फिरवतो तेव्हाही तुझ्या आवाजाबद्दल तासन् तास गप्पा होतात. कोणी ओळखीचे नसते. पण तोही तुझ्या आवाजाबद्दल बोलत असतो. मलाही तुझाच आवाज ऐकल्यासारखा जोशसाहेबांसारखा अनुभव येतो. ग़मगीन देहलवी यांनी तर अंतिम इच्छासुद्धा काय सांगितली बघा-

मेरी ये आरज़ू है वक़्त-ए-मर्ग
उसकी आवाज़ कान में आवे

मला तर मरतानाही एकच इच्छा असेल, की तिचा आवाज कानात यावा. म्हणजेच ती जवळ असावी आणि तिने बोलावे. काय करणार? कारण ती लाख म्हणाली, एवढी काय घाई? ऐकाल ना कधीतरी. त्यावर आसी उल्दनी यांनी स्पष्टीकरण दिले-

सब्र पर दिल को तो आमादा किया है लेकिन
होश उड़ जाते हैं अब भी तेरी आवाज़ के साथ

अग बाये, धीर धरण्याबद्दल मी तयार आहे. तत्पर आहे. परंतु तुझा आवाज ऐकला की त्याच्यासोबत सगळी शुद्धच हरपते. त्यामुळे तो ऐकायला हवाच, असे सतत वाटते. मोमिन ख़ाँ मोमिन त्यांच्यात सामील झाले. त्यांनी त्या आवाजाची जादू सांगितली-

उस ग़ैरत-ए-नाहीद की हर तान है दीपक
शोला सा लपक जाए है आवाज़ तो देखो

शुक्र ग्रहाला लाजवेल अशी ती आहे. तिची प्रत्येक तान दिव्यासारखी आहे. तिचा आवाज तुम्ही बघा, एखाद्या दिव्याची ज्योत कशी लचकते तसे वाटते. अहमद ख़याल म्हणाले, हे तर काहीच नाही. तिचा आवाज ज्योतीसारखा आहे, पण त्या आवाजाची आणखी एक जादू सांगतो-

ये भी एजाज़ मुझे इश्क़ ने बख़्शा था कभी
उसकी आवाज़ से मैं दीप जला सकता था

ही जादू मला प्रेमाने कधीतरी शिकवली होती. हा मान मला प्रेमाने दिला होता की मी तिच्या आवाजाने दिवेही लावू शकत होतो. बोला आता? ती हसते तेव्हा काय काय होते हे वज़ीर आग़ा साहेबांनी कथन केले-

उसकी आवाज़ में थे सारे ख़द-ओ-ख़ाल उसके
वो चहकता था तो हँसते थे पर-ओ-बाल उसके

तिच्या आवाजात तिची भवितव्ये, भविष्ये आहेत. ती हसते तेव्हा तिचा देह, तिचे केससुद्धा हसताना दिसत होते. सगळे शरीरच हसत होते म्हणा ना. असे बोलणे ऐकले नाही तर काय ऐकले? मग त्यांची प्रेयसी म्हणाली होती, पाहिले ना हसताना आता निघा. तर लगेच ते म्हणाले-

वो ख़ुश-कलाम है ऐसा कि उसके पास हमें
तवील रहना भी लगता है मुख़्तसर रहना

तू इतकी आनंदाने बोलतेस, आम्ही तुझ्याजवळ दीर्घकाळ बसलो तरी थोडाचवेळ बसल्यासारखे वाटते. अर्श मलसियानी म्हणाले, तिचा आवाजाचे काय घेऊन बसला? अहो, हे प्रेम म्हणजेच आवाजाची नगरी आहे-

मोहब्बत सोज़ भी है साज़ भी है
ख़मोशी भी है ये आवाज़ भी है

प्रेम ही एक आग आहे, नशा आहे, उष्णता आणि उबदारपणाही आहे. प्रेम हे वाद्यही आहे. ते वाजतेही अन् शांतही राहते. प्रेम म्हणजे मौन आणि प्रेम म्हणजे आवाज. असरार-उल-हक़ मजाज़ नशेतच होते. त्यांनी त्यांची व्यथा गायली-

सारा आलम गोशबर आवा़ज है
आज किन हाथों में दिल का सा़ज है
छुप गए वो साज़-ए-हस्ती छेड़ कर
अब तो बस आवाज़ ही आवाज़ है

सगळे जग कान लावून बसले आहे. हे प्रेमरूपी वाद्य, हे शरीररूपी वाद्य कुणाच्या ताब्यात गेले आहे. कुणाच्या ताब्यात आहे? ती तर जीवनाच्या वाद्याच्या तारा छेडून लपलीसुद्धा. आता फक्त आवाज आणि आवाज आहे. हे झंकारणे कोणाच्या वाट्याला येऊ नये. म्हणून बोलत राहा, ऐकत राहा. तेच जिवंतपणाचे लक्षण आहे.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link