Next
मधल्या फळीचा प्रश्न सुटला
अमित मधुकर डोंगरे
Friday, August 23 | 03:30 PM
15 0 0
Share this story

भारतीय क्रिकेटसंघात चौथ्या स्थानावर कोणाला खेळवावे, ही दीर्घकालीन समस्या कर्णधार आणि व्यवस्थापन समितीला कायम सतावत होती. या समस्येवर श्रेयस अय्यरच्या रूपाने उतारा समितीला सापडला आहे. मुंबईकडून स्थानिक क्रिकेट खेळणारा श्रेयस आंतरराष्ट्रीय स्तरावर संधी मिळाल्यानंतर जास्त आश्वासक बनला आहे. त्याला वेस्ट इंडिजविरुद्धचा एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय संघात स्थान मिळाल्यानंतर त्याने आपल्यावरील विश्वास सार्थ ठरवताना अत्यंत सातत्यपूर्ण खेळाचे दाखले दिले आहेत.
रणजी तसेच अन्य स्थानिक स्पर्धेत त्याने आजवर साडेचार हजार धावा फटकावल्या आहेत. त्याला भारतीय संघाची दारे खुली झाल्यावर आतापर्यंत त्याने खेळलेल्या नऊ एकदिवसीय सामन्यांत चार अर्धशतकांची नोंद केली आहे. श्रीलंकेविरुद्ध २०१७ साली जेव्हा त्याला पदार्पणाची संधी दिली गेली तेव्हाच त्याच्यातील गुणवत्ता कळून येत होती, मात्र आता वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेत त्याने खऱ्या अर्थाने स्वत:ला सिद्ध केले आहे. प्रशिक्षक रवी शास्त्री व कर्णधार विराट कोहली यांनी दाखवलेला विश्वास त्याने सार्थ ठरवला. गेल्या मोसमापासून भारतीय संघाला चौथ्या स्थानावर अशाच भक्कम फलंदाजाची उणीव भासत होती, ती श्रेयसने आपल्या खेळाने दूर केली.
भारताचे माजी कसोटीपटू प्रवीण आमरे शिवाजी पार्कवर त्याचा खेळ बघून प्रभावित झाले होते. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली श्रेयसने सातत्याने सरस कामगिरी केली व अखेर निवडसमितीला त्याच्या नावाचा विचार करायला भाग पाडले. इंडियन प्रीमिअर लीगमध्ये (आयपीएल) श्रेयस दिल्ली कॅपिटल संघाचे नेतृत्व करतो. याही स्पर्धेत त्याने कमालीचे सातत्य दाखवले आहे. २०१४ साली रणजी आणि विजय हजारे करंडकस्पर्धेत त्याने क्रिकेटच्या समीक्षकांनादेखील स्तब्ध केले होते. हजारे करंडकात त्याने तीन सामन्यांत २९७, तर रणजी करंडकमध्ये याच वर्षी त्याने एकूण ८०९ धावांचा पाऊस पाडून निवडसमितीचे लक्ष वेधून घेतले होते. २०१५-१६ साली त्याने रणजीस्पर्धेत तेराशेपेक्षा जास्त धावा केल्या. त्याच्या पुढच्या वर्षी ७२५ धावा तडकावल्या व सातत्य सिद्ध केले.
रणजीस्पर्धेतच गेल्या वर्षी त्याने पुन्हा एकदा धावांचा डोंगर रचून भारतीय संघाच्या चौथ्या क्रमांकावर आपला विचार निवडसमितीला करायला लावला. त्याचे सहकारी खेळाडू स्थानिक स्पर्धेत त्याला प्रती वीरेंद्र सेहवाग म्हणून संबोधायला लागले. त्याच वर्षी त्याची मुंबईसंघाच्या कर्णधारपदी नियुक्ती झाली व त्याचा खेळ आणखी बहरला. गेल्या तीन मोसमांतील त्याचा खेळ व आयपीएलमधील त्याची कामगिरी पाहून अखेर त्याची भारतीय संघात निवड झाली. पोद्दार महाविद्यालयातून पदवी घेतलेल्या श्रेयसला शैक्षणिक कामगिरीपेक्षा क्रिकेटमध्येच कारकीर्द करण्याची जिद्द होती. आता त्याचा त्याच यशाच्या वाटेवर प्रवास सुरू झाला आहे. आयुश पुथ्रन या क्रिकेट लेखकाने त्याच्यावर ‘अ फादर्स ड्रीम’ नावाची एक डॉक्युमेंटरी तयार केली होती, तिचेदेखील खूप कौतुक झाले होते.
सध्या भारतीय संघ वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेत व्यग्र आहे. या मालिकेतील मर्यादित षटकांच्या सामन्यात टी-२० व एकदिवसीय सामन्यांत भारतीय संघाने दणदणीत विजय मिळवला. या विजयात श्रेयसचादेखील खूप मोठा वाटा आहे. गेल्या काही मोसमांपासून मधल्या फळीत एक उपयुक्त फलंदाज मिळत नव्हता. या स्थानावर अनेक खेळाडूंना संधी मिळाली, मात्र त्यांच्यातील सातत्याचा अभाव स्पष्ट होत होता. इंग्लंडमधील विश्वकरंडक क्रिकेटस्पर्धेत तर संघाला चौथ्या स्थानावरील फलंदाजाची उणीव सातत्याने जाणवत होती. त्याचवेळी खरे तर श्रेयसचा विचार व्हायला हवा होता. असो, देर आये, दुरुस्त आये, या उक्तीप्रमाणे अखेर निवडसमितीने त्याच्यावर विश्वास दाखवत त्याला भारतीय संघात स्थान दिले. या संधीचा पुरेपूर लाभ घेत त्याने या स्थानावर आता स्वत:ची मोहोर उमटवली आहे. शिखर धवन, रोहित शर्मा, कर्णधार विराट कोहली यांच्यानंतर चौथ्या स्थानासाठी अनेक पर्याय वापरून पाहिले गेले, मात्र जी गुणवत्ता श्रेयसने दाखवली त्याच्या जवळपासदेखील कामगिरी करणारे अन्य कोणी नव्हते.
श्रेयसकडे गुणवत्ता आहेच आता अधिकाधिक अनुभव मिळणे गरजेचे आहे. त्याचे संघातील स्थान आता जवळपास पक्के झाले असून त्याने सातत्य दाखवल्यास भारतीय फलंदाजी जास्त बलाढ्य बनणार आहे. सचिन तेंडुलकर आणि वीरेंद्र सेहवाग यांना आपला आदर्श मानणारा श्रेयस भविष्यात याच महान खेळाडूंप्रमाणे यशस्वी ठरेल यात शंका नाही.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link