Next
‘बॉक्सिंग डे’ कसोटीत विजयी पंच कोणाचा?
नितीन मुजुमदार
Friday, December 21 | 04:00 PM
15 0 0
Share this story

भारत-ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेत आता मध्यांतर झाले आहे आणि आतापर्यत झालेल्या लढतींत मालिकेच्या आगामी जय-पराजयाबद्दल उत्सुकता कायम राखण्यात दोन्ही संघ यशस्वी झाले आहेत. खूप दिवसांनी उत्तम दर्जाचे कसोटी क्रिकेट सलग बघायला मिळत आहे. बॅट आणि बॉलच्या या पारंपरिक मेजवानीमध्ये शाब्दिक चकमकींचा ‘तडका’ या मालिकेचा माहोल अजूनच संस्मरणीय करत आहे. भारतीय क्रिकेटला अलिकडे मिळालेले तीन कर्णधार सौरव गांगुली, एम.एस.धोनी आणि विराट कोहली या तिघांनीही स्वतःची ‘ओळख’ निर्माण केली आहे.
कर्णधार म्हणून कोहली चुका करत आहे. संघ निवडताना त्याने प्रामुख्याने चुका केल्या आहेत, पण त्याचा प्रत्येक गोष्टीकडे बघायचा दृष्टिकोन सकारात्मक आणि प्रामाणिक आहे. मालिकेच्या उत्तरार्धात या चूक दुरुस्त करण्याचा प्रयत्न संघाच्या थिंक टँककडून होणे अपेक्षित आहे. पर्थ कसोटीत भारताने कुलदीप यादव किंवा रवींद्र जाडेजाला निवडायला हवे होते, हे खरेच, मात्र सध्या भारतीय तेज गोलंदाज खरोखर एवढे भरात आहेत, की कोहलीलाही चार जलदगती गोलंदाजांना खेळवायचा मोह आवरला नाही व तो प्रयत्न फसला! पर्थ येथील नव्या स्टेडियमवर केवळ एक शेफिल्ड शिल्ड सामना व एक एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामना खेळला गेला होता व त्या सामन्यांत जलदगती गोलंदाजांनी पूर्ण वर्चस्व गाजवले होते. तेवढ्यावर कोहली विसंबला आणि संघात चार जलदगती गोलंदाज खेळवण्याचा निर्णय पक्का केला. जेकब पॉलिक्रोनिसने त्यांच्या ‘फॉक्स क्रिकेट’वरील सदरात ‘क्रॅक्स, कॅप्टन्स अँड दॅट कॅच’ अशा शीर्षकात पर्थ कसोटीचे अगदी समर्पक वर्णन केले आहे. कोहली सध्या फलंदाजीमध्ये त्याच्या लाइफटाइम फॉर्ममध्ये आहे. पहिल्या डावात तो नक्कीच वादग्रस्त पद्धतीने बाद दिला गेला. मात्र असे निर्णय खेळाचा भाग आहेत ते स्वीकारून पुढे जावेच लागते! एकाग्रता आणि संयम या बाबतीत कोहलीच्या जवळपास येणारा क्रिकेटर मला सध्या जागतिक पातळीवर दिसत नाही. त्याच्याकडे भारतीय संघातील बहुसंख्य फलंदाजांनी खास ‘क्लास’ लावावा, अशी परिस्थिती आपल्या संघात नक्कीच आहे!
सध्या आपल्या संघाची मधली फळी वेगळ्याच कात्रीत सापडली आहे. आपले सलामीचे फलंदाज म्हटले, की त्यांच्या हातात बॅटऐवजी  त्यांच्या मागे उडालेले स्टंप दिसतात! पर्थ कसोटीत दोन्ही सलामीचे फलंदाज दोन्ही डावात बोल्ड झाले. शिवाय वरून सलामीचे दडपण तर खाली आठव्या खेळाडूलाच सुरू होणारी क्रमाक ११ची शेपूट अशा विचित्र परिस्थितीत आपली मधली फळी आहे. यात भर म्हणून पहिल्या सात फलंदाजांना काबूत ठेवणारे आपले गोलंदाज आठ ते अकराव्या फलंदाजांपुढे हतबल ठरताना दिसतात! प्रतिस्पर्धी संघाचे शेपूट आपल्याला त्रास देते, हा वारंवार होणारा प्रकार  आता सवयीसारखा संघाच्या अंगी रुळू लागलाय, ही बाब कोहली-शास्त्री यांच्यासाठी चिंतेची आहे. दुसरी एक बाब म्हणजे गेल्या सात कसोटी सामन्यांचे स्कोअर कार्ड तपासले असता आपले तळाचे फलंदाज सहजपणे गुंडाळले जात असल्याचे स्पष्ट होते. यात भारतात खेळली गेलेली भारतविरुद्ध वेस्ट इंडिज मालिका धरलेली नाही. इंग्लंडविरुद्ध त्यांच्याच देशात खेळलेल्या पाच कसोटी व चालू मालिकेतील दोन कसोटी असे एकूण सात कसोटी सामन्यांची स्कोअर कार्डचा अभ्यास केल्यावर पुढील निष्कर्ष मिळाले-
या सात कसोटींत सहा विकेट गेल्यावर भारताने एकूण १३ डावांत ७७७ धावा काढल्या, त्यांची प्रति डाव सरासरी आहे ५९.७६ धावांची, तर प्रतिस्पर्धी संघांनी (पाच कसोटींत इंग्लंड तर दोन कसोटींत ऑस्ट्रेलिया) सहा विकेट गेल्यावर १०७१ धावा काढल्या, त्याही ११ डावांत. त्यांची धावांची सरासरी आहे ९७.३६ची म्हणजेच जवळजवळ १०० धावांची. हे निष्कर्ष काढताना केवळ पूर्ण डाव लक्षात घेतले आहेत, घोषित केलेले डाव या आकडेवारीत समाविष्ट नाहीत. भारत आणि प्रतिस्पर्धी संघ यांच्यात या निष्कर्षानुसार सुमारे ४० धावांचा फरक आहे. अलिकडे होणारे कमी धावांचे सामने बघता हा फरक नक्कीच दुर्लक्ष करता येण्याजोगा नाही. कुठल्याही संघाचे शेवटचे तीन-चार फलंदाज कमकुवत मानले जातात.
भारताचे शेपूट मात्र अलिकडे जरा जास्तच कमकुवत वाटत आहे. एका ब्रँडेड क्रिकेट वेबसाइट वर India have four no 11’s from no 8 असा काहीसा उपरोधिक उल्लेख वाचण्यात आला! दुर्दैवाची गोष्ट म्हणजे आपले गोलंदाज एक ते सातच्या फलंदाजांना त्रास देत आहेत तर आठ ते अकराच्या फलंदाजांकडून त्यांना त्रास होत आहे! एक जमान्यात किरमाणी व मदनलालसारखे चांगले फलंदाज भारतीय कसोटी संघात नऊ आणि दहा क्रमांकावर फलंदाजीला येत असत. अर्थात आपले गोलंदाज त्यांचे मुख्य काम चोख करत आहेत. आपल्या सलामीच्या खेळाडूंचा सूर हरवलेला आहे, त्यामुळे तळाशीदेखील आपल्या अपेक्षा वाढवाव्या लागत आहेत. दोन्ही संघांच्या तळाच्या चौघांची फलंदाजी ही कोहली-शास्त्री यांच्यासाठी डोकेदुखी आहे.
२०१८ मध्ये भारताने आतापर्यंत सात कसोटी सामने परदेशी गमावले आहेत. हाही एक विक्रमच आहे. याआधी भारताने २०१४ साली परदेशी सहा कसोटी सामन्यांत पराभव अनुभवला होता.
मेलबर्नच्या बॉक्सिंग डे कसोटीत पहिल्या दोन क्रमांकांसाठी काही प्रयोग करणे कोहलीला भाग आहे. नवोदित मयांक अगरवालबरोबर कोण येतो ते बघणे महत्त्वाचे ठरेल. दोन्ही सलामीचे फलंदाज सपशेल अपयशी ठरत असताना दोघांपैकी एकाला पुन्हा एकदा संधी मिळते की रोहित शर्माला सलामीला पाठवण्याचा प्रयोग केला जातो, हेही पाहावे लागले. पृथ्वी शॉची उणीव संपूर्ण मालिकेत जाणवणार आहे. तीन स्पिनरपैकी एकाला संधी मिळेलच आणि विकेटचे स्वरूप बघून कदाचित दोघांनादेखील संधी मिळू शकते. हार्दिक पंड्याच्या समावेशामुळे कोहलीकडील पर्याय आता वाढले आहेत. अजिंक्य रहाणेने या मालिकेत प्रत्येक डावात चांगली सुरुवात केली, मात्र एकही डाव तो मोठ्या धावांमध्ये परिवर्तित करू शकला नाही. पर्थ येथे दुसऱ्या डावात तो ज्या तऱ्हेने बाद झाला ते पाहता संयमाच्या बाबतीत त्याला अजूनही मेहनतीची गरज आहे हे स्पष्ट होते. पंतने मागील कसोटीच्या तुलनेत नक्कीच अधिक संयम दाखवला. त्यालाही डाव बांधण्याच्या बाबतीत बरीच मोठी मजल गाठायची आहे. तेज चौकडीने या सामन्यात उत्तम कामगिरी केली. शमी, बुमराह, शर्मा व यादव ऑस्ट्रेलियन फलंदाजांची उसळत्या खेळपट्टीवर सातत्याने भंबेरी उडवताना बघून अचंबा वाटत होता तो केवळ अशा दृश्यांची सवय नसल्यामुळेच!
या कसोटीत शाब्दिक चकमकी तर अपेक्षेपेक्षा जास्त झाल्या आणि रंगल्यादेखील! आयसीसीने दोन चेंडूंदरम्यान ‘माईक ऑन’ ठेवण्यास आता परवानगी दिली आहे. लाइव्ह चकमकी आता मालिका पुढे जाईल तशा अधिक तिखट होण्याची शक्यता आहे! याबाबतीत ऑस्ट्रेलियाचा ऑफ स्पिनर नाथन लायनने केलेला विरोध पटत नाही. खेळाडूंमधील स्पर्धात्मक आक्रमकता जर त्यांच्या संभाषणामधून प्रेक्षकांसमोर येत असेल, तर त्याने कसोटी क्रिकेटची लोकप्रियता नक्कीच वाढेल ज्याची सध्या खूप गरजही आहे. खेळाडूंच्या बेबंद शब्दप्रयोगांनाही मर्यादा येतील. ‘ऑन द फिल्ड’ आता दोन वेगवेगळी ‘बॅटल्स’ रंगतील!
विराट कोहली नक्कीच चांगले नेतृत्व करत आहे, योग्य वेळी अरे ला कारे करायलादेखील मागेपुढे पाहत नाही. ‘लिडिंग फ्रॉम द फ्रंट’चा विचार केला, तर तो नक्कीच आजपर्यंतचा भारताचा सर्वोत्तम कर्णधार ठरावा. नेतृत्वाची धुरा सांभाळल्यावर तर त्याचे नेतृत्व अधिकाधिक निखरले आहे असे आपण म्हणू शकतो. आता बॉक्सिंग डे कसोटीत विजयी ‘पंच’ कोण मारतो, याची सर्वांना उत्सुकता आहे. सध्यातरी मालिकेच्या निकालाचा सस्पेन्स मध्यांतराला कायम आहे.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link