Next
विश्वचषकामुळे कसोटीला पुन्हा सुगीचे दिवस?
भूषण करंदीकर
Friday, September 06 | 04:00 AM
15 0 0
Share this story


क्रिकेटच्या सर्व प्रकारांत सर्वश्रेष्ठ प्रकार अर्थातच कसोटी क्रिकेट. मात्र पाच दिवसांचा कसोटी सामना कंटाळवाणा होत असल्याचे लक्षात आल्याने कालांतराने क्रिकेटच्या या प्रकाराकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवल्याचे दिसू लागले. आणि क्रिकेटजगतात उदय झाला तो टी-२०चा. त्यानंतर कसोटी क्रिकेट हळूहळू लयाला जातोय की काय, अशी भीती निर्माण होऊ लागली. या सगळ्यातून कसोटीला वाचवण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न सुरू झाले. मग त्याचाच एक भाग म्हणून कसोटी क्रिकेटचे सामने डे-नाइट खेळाचा विचार पुढे आला. त्यासाठी गुलाबी चेंडूचा वापर करण्यात आला. परंतु त्याला फारसा प्रतिसाद न मिळाल्यामुळे यावर पुन्हा एकदा खलबते सुरू झाली. टी-२०च्या अफाट लोकप्रियतेपुढे सारेच प्रयत्न तोकडे
वाटू लागले.
एकदिवसीय सामन्यांना मिळणारा प्रतिसाद चांगला होता, कसोटीकडे क्रिकेटप्रेमींनी पाठ फिरवली होती. याला काही अपवाद होते. उदाहरणार्थ, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होणारी अॅशेस सीरिज. थोडक्यात काय, तर क्रिकेटमध्येही क्रिकेटप्रेमींना मनोरंजन हवे होते. कसोटीमधील रटाळ डाव, फलंदाजांनी नांगर टाकून विकेटवर उभे राहणे, गोलंदाजांना झटपट विकेट न मिळण्याचा परिणाम म्हणून सामना ड्रॉ  होणे हे प्रेक्षकांना नको होते. कदाचित टी-२० फॉरमॅटमुळे क्रिकेटप्रेमींना या सगळ्याचा कंटाळा आला होता. यातूनच मग विविध प्रकारे कसोटी क्रिकेट अधिक लोकप्रिय कसे होईल यासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने काही उपाययोजना सुरू केल्या आणि यातूनच जन्म झाला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा म्हणजेच कसोटी किक्रेट विश्वचषकाचा!
ठरल्याप्रमाणे यंदा १ ऑगस्टपासून २०१९ पासून कसोटी किक्रेट विश्वचषकाला सुरुवात झाली आणि ३१ मार्च २०२१ पर्यंत ही स्पर्धा सुरू राहील. यामध्ये १२ देशांच्या संघांपैकी नऊ कसोटी क्रिकेट खेळणारे संघ सहभागी झाले आहेत. यात ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, इंग्लंड, भारत, पाकिस्तान, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका आणि वेस्ट इंडिज यांचा समावेश आहे. प्रत्येक देश त्याच्या वर्षभराच्या क्रिकेट कॅलेंडरमध्ये काही कसोटी मालिका खेळतो आणि त्यानुसार कसोटी रँकिंग जाहीर केले जातात. दरवर्षी १ एप्रिलला कसोटी क्रिकेटमधील सर्वोत्तम संघ जाहीर केला जातो. आता कसोटी किक्रेट विश्वचषकामध्ये दर दोन वर्षांनी कसोटी क्रिकेटचा नवा विजेता ठरणार आहे, अगदी तसाच जसा चार वर्षांनी एकदिवसीय क्रिकेटचा, दोन वर्षांनी टी-२०चा. १ ऑगस्टपासून सुरू झालेल्या इंग्लंडविरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या कसोटीपासून विश्वचषकस्पर्धेला सुरुवात झाली आहे. दोन्ही संघांनी प्रत्येकी एक सामना जिंकला आहे आणि त्यांच्यात तिसरी कसोटी सुरू आहे. तर वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर गेलेल्या भारतीय संघाने दोन्ही कसोटी सामने जिंकून विजयी सलामी दिली आहे. यामुळे कदाचित कसोटी क्रिकेटकडे क्रिकेटप्रेमी पुन्हा वळतील, त्यातली रंजकता वाढेल, असा आयसीसीचा कयास आहे.
कसोटी क्रिकेट विश्वचषकस्पर्धेत प्रत्येक संघ तीन कसोटी मालिका मायदेशात तर तीन कसोटी मालिका परदेशात खेळेल. यात काही मालिका अशाही असतील, की ज्यांचा विचार विश्वचषकासाठी केला जाणार नाही. त्यातलीच एक मालिका न्यूझीलंडविरुद्ध इंग्लंड अशी होणार आहे, नोव्हेंबरमध्ये. कसोटी क्रिकेट विश्वचषकासाठी १२० गुण असतील, जे समप्रमाणात मालिकेतल्या कसोटी सामन्यांवर ठरवले जातील. तसेच, संथ गतीने गोलंदाजी करणाऱ्या संघाला काही गुण गमवावे लागतील. या सगळ्यात दोन टॉप टीम अंतिम लढतीसाठी पात्र ठरतील. आता या सगळ्या दोन वर्षांच्या कालावधीत, मालिका जिंकली, तर प्रत्येक संघाला त्याचा जास्तीत जास्त फायदा होणार आहे.
असे असले तरी नेहमीप्रमाणे आयसीसीची गुणांकन पद्धत थोडी किचकट आहे. त्यात थोडी सुलभता असती तर जास्त बरे झाले असते. असो. त्यानिमित्ताने क्रिकेटच्या या सर्वात जुन्या फॉरमॅटमध्ये थोडी जास्त आक्रमकता पाहायला मिळू शकते, कारण प्रश्न मालिका जिंकण्याचा आहे. इतके दिवस कसोटी क्रिकेटमध्ये अनेक सामने किंवा मालिका या अनिर्णित राहताना दिसायच्या. आता त्या जिंकण्यासाठी खेळल्या जातील ही अपेक्षा. आयसीसीच्या या प्रयत्नांना सुयश लाभो आणि कसोटी क्रिकेटला पुन्हा चांगले दिवस येवोत, एवढीच काय ती अपेक्षा!

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link