Next
उत्कंठापूर्ण ‘द डर्टी डझन’
मिलिंद कोकजे
Friday, October 04 | 03:30 PM
15 0 0
Share this storyगावावरून ओवाळून टाकलेली माणसे’ असा एक शब्दप्रयोग आपल्याकडे वापरला जातो. ही माणसे कमालीची काहीतरी दुष्कृत्ये करणारी असतात. त्यांचा कोणालाच काहीच उपयोग नसतो, निदान लोकांना असे वाटत असते. परंतु अशाच लोकांमध्ये असलेले गुण ओळखून एखादा माणूस त्यांच्याकडून आपल्याला हवे ते काम चांगल्या प्रकारे करून घेतो. त्यांचा सन्मान तो वाढवतो, आपल्याही आयुष्याला काही अर्थ आहे, आपणही आयुष्यात काही करू शकलो अशी भावना त्यांच्यात निर्माण करतो. खुल्या तुरुंगासारख्या एका वेगळ्या संकल्पनेद्वारे ही कल्पना हिंदीत व्ही. शांताराम यांनी ‘दो आंखे बारह हाथ’मधून मांडली. औंधच्या राजाने केलेल्या प्रयोगाची ती सत्यकथा ग. दि. माडगूळकर यांनी लिहिली होती.
हॉलिवूडमध्येही ही कल्पना दुसऱ्या महायुद्धाच्या संदर्भात रॉबर्ट अल्ड्रिच या दिग्दर्शकाने ‘द डर्टी डझन’ या चित्रपटातून मांडली. युद्धातील फिफ्टीन थर्टीन या गटाने केलेल्या कामगिरीवर आधारित ही सत्यकथाच आहे. मेजर रेइजमन या अधिकाऱ्याकडे एक महत्त्वाची कामगिरी सोपवण्यात येते. ही जबाबदारी असते वायव्य फ्रान्समधील ब्रिटिनीजवळ असलेल्या एका राजप्रासादात घुसून तिथे हल्ला करायचा आणि तिथे बैठकीकरता जमलेल्या डझनभर उच्चपदस्थ जर्मन अधिकाऱ्यांना मारण्याची. दोस्त सैन्य सहा जून रोजी ‘डी डे’ हल्ला करणार असते, त्या हल्ल्याचा मुकाबला करण्यासाठी म्हणून ही योजना आखली जाते. या योजनेचे नाव असते ऑपरेशन अॅम्नेस्टी. या संपूर्ण योजनेत फक्त एक आव्हान असते ते म्हणजे यात भाग घेणारे सर्व सैनिक मारले जाण्याची शक्यता असते. त्यामुळे आतापर्यंत पकडलेल्या १२ खतरनाक गुन्हेगारांचा वापर करून ही योजना अमलात आणण्याचा निर्णय घेतला जातो. या प्रत्येक गुन्हेगाराचे काही एक वैशिष्ट्य असते, त्याचा त्या कौशल्याचा वापर करून घ्यायचा असतो. त्यांना एक गट म्हणून वागण्यासाठी काही मूलभूत शिस्तीचे धडे देणे हेच रेइजमनपुढे मोठे आव्हान असते. त्यांना दाढी करण्याकरता शेव्हिंग किट न देणे इथपासून तो त्यांना अनेक शिक्षा देतो. अखेर त्यांच्यात थोडीशी शिस्त येऊ लागते. त्यांना पॅराशूट प्रशिक्षणाकरता पाठवल्यावर तेथील अधिकाऱ्यांना या बारा जणांचा संशयच येऊ लागतो. त्यांच्याकडून ही काय योजना आहे, याची माहिती घेण्याकरता ते त्यातील दोघांवर बाथरूममध्ये हल्ला करण्याची व्यवस्था करतात. ते दोघे त्या हल्ल्याला यशस्वी तोंड देतात. परंतु त्यांना संशय येतो की रेइजमननेच त्यांच्यावर हल्ला घडवून आणला. त्यातून गैरसमज निर्माण होतात. त्यातच पॅराशूट प्रशिक्षण केंद्राचा अधिकारी रेइजमनविरुद्ध तक्रार करतो आणि हे बारा जण ही योजना पार पाडू शकणार नाहीत असा आक्षेप घेतो.
तो आक्षेप दूर करून आपल्याला सिद्ध करण्यासाठी या बारा जणांनी प्रशिक्षणादरम्यान त्या केंद्राचा ताबा घेऊन दाखवायचा असे ठरते. ते यशस्वी झाले तर योजना अमलात आणली जाणार असते. ते बाराही जण सर्व नियम गुंडाळून ठेवून त्यांच्या पूर्वायुष्यातील त्यांच्या गुन्हेगारीकौशल्याचा वापर करून ते केंद्र ताब्यात घेऊन दाखवतात. तरीही अडचणी संपतच नाहीत. अगदी शेवटी योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू होण्यापूर्वी उडी मारताना जैमिनेज या गुन्हेगाराची मान मोडते आणि तो मरतो. संपूर्ण योजनेत प्रत्येकाचे काम ठरलेले असते. अचानक एक जण मेल्याने थोडासा गोंधळ होतो, परंतु अखेर त्याच्या कामाची जबाबदारी दुसऱ्यावर देण्यात येते. ठरल्याप्रमाणे सर्वजण त्या प्रासादात प्रवेश मिळवून आपापल्या जागा घेतात. स्वतः रेइजमन आणि जर्मन बोलता येणारा त्या बारांपैकी एकजण असे दोघेजण उच्च जर्मन अधिकाऱ्यांचा गणवेश घालून त्या बैठकीत शिरतात. सर्व योजनेप्रमाणे सुरू असताना अचानक गोंधळ होतो. त्या बारा जणांत एक वेडा असतो. एका जर्मन अधिकाऱ्याबरोबर आलेल्या बाईला बघून त्याचे वेड उफाळून येते. तो तिला भोसकतो आणि शत्रूवर तसेच आपल्या लोकांवरही बेधुंद गोळीबार सुरू करतो. त्यामुळे योजनेची अंमलबजावणी लगेचच करावी लागते. रेइजमन अणि त्याचा सहकारी, सर्व जर्मन अधिकारी तळघरातील सुरक्षित जागेत जातील असे बघतात आणि मग आत ज्वलनशील वायू सोडून हँडग्रेनेड टाकून त्यांना मारून टाकतात. दरम्यान त्या प्रासादातील जर्मन सैनिक व उरलेले नऊ जण यात घमासान गोळीबार सुरू असतोच. त्यात दोघेजण सोडून उरलेले सर्व मारले जातात. शेवटी रेइजमन आणि ते दोघेजण कामगिरी पार करून परत येतात.
अशा प्रकारच्या चित्रपटाचा शेवट नेहमीच खूप घटनाक्रमांचा, प्रचंड अॅक्शनचा आणि उत्कंठावर्धक असतो. उत्कंठा काय होणार याची नसते, कारण काय होणार हे माहीत असते. परंतु त्या टप्प्यापर्यंत पटकथाकार आणि दिग्दर्शक कसे प्रसंग उलगडत नेतात ते बघण्याची उत्कंठा असते. या चित्रपटात दिग्दर्शक रॉबर्ट अल्ड्रीचने सुरुवातीपासूनच अनेक प्रसंगांत उत्कंठा वाढवली आहे आणि तणाव निर्माण केला आहे.रेइजमन आणि जर्मन बोलता येणारा त्याचा सहकारी त्या प्रासादात जर्मन अधिकारी म्हणून प्रवेश घेत असताना अचानक त्यांच्यासमोर एक नोंदवही ठेवून त्यात त्यांना त्यांची माहिती लिहिण्यास सांगण्यात येते. त्या सहकाऱ्याला जर्मन बोलता येत असते पण लिहिता येत नसते. आता ते काय करणार असा तणावपूर्ण प्रसंग निर्माण होतो. त्याला एक युक्ती सुचते. तो लिहिण्याकरता समोरच्या शाईच्या दौतीतून टाक काढत असताना दौतीला धक्का देऊन शाई त्या पानावर सांडतो त्यामुळे काहीही लिहिण्याचा धोका टळतो. अगदी सुरुवातीला रेइजमनच्या प्रत्येक आज्ञेला प्रत्येक वेळी त्या बारा जणांपैकी काही आव्हान देतात. त्यावरून निर्माण होणारे तणाव दिग्दर्शकाने दाखवले आहे.
त्यांच्या  अंतिम प्रशिक्षणाचे प्रसंग चित्रपटाची गती वाढवतात. एक, दोन अशा प्रत्येक आकड्याबरोबर काय काय करायचे हे रेइजमन त्यांच्याकडून सतत वदवून घेत असतो. शेवटी ते विमानाने त्या प्रासादाकडे निघालेले असताना विमानातही तो त्यांच्याकडून घोकंपट्टी करून घेत असतो. चित्रपटाचा शेवटचा भाग हा गोळीबार, लढाईचा वगैरे असला तरी संपूर्ण चित्रपट आहे तो आपण या बारा जणांकडून ही कामगिरी पार पाडून घेऊ शकतो, या रेइजमनचा स्वतःवरील विश्वासाचा आणि ते घडवून आणण्याच्या त्याच्या निर्धाराचा, तसेच त्या बारा जणांनी आपल्यात घडवून आणलेल्या बदलाचा. त्यामुळे हा चित्रपट दुसऱ्या महायुद्धातील अनेक घटनांवरच्या चित्रपटांत आपल्या वेगळेपणाने उठून दिसतो. अमेरिकन फिल्म इन्स्टिट्यूटने सर्वोत्कृष्ट शंभर चित्रपटांत ६५व्या क्रमांकावर या चित्रपटाची निवड केली आहे. त्याच्या लोकप्रियतेमुळे त्याचे अनेक पुढील भाग इतर अनेकांनी काढले.
दी डर्टी डझन – १९६७
निर्माता – केनेथ हायमन
दिग्दर्शक – रॉबर्ट अल्ड्रीच
कथा – इ. एम. नाथनसनच्या ‘द डर्टी डझन’ कादंबरीवर आधारित
पटकथा - इ. एम. नाथनसन, ल्युकास हेलेर
कलाकार : ली मार्विन (रेइजमन), चार्ल्स ब्राउनसन, (जिम ब्राऊन)

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link