Next
पीअर प्रेशर असंही!
मिथिला दळवी
Friday, August 02 | 03:00 PM
15 0 0
Share this story

ओजसच्या खूप साऱ्या तक्रारी घेऊन अनघा आली होती. तिनं यादीच लिहून आणली होती. ओजसचा नववीपर्यंत अभ्यास व्यवस्थित होता. दहावीचं वर्ष सुरू झालं आणि ओजसचं अभ्यासातलं लक्षच उडालं आहे, असं तिचं म्हणणं होतं.
तो आंतरशालेय पातळीवर व्हॉलीबॉल खेळायचा. प्रॅक्टिस सांभाळून अभ्यासही नीट मॅनेज करायचा. ८०-८५ टक्क्यांपर्यंत मार्क त्याला मिळून जायचे. नववीपर्यंत ओजस कोणत्याही क्लासेसना जात नव्हता. तो हुशार आहे, पण पुरेशी मेहनत घेत नाही, असं अनघाचं मत होतं.
ओजसचा अभ्यास अगदी नियमित व्हावा, म्हणून दहावीसाठी अनघानं त्याला सगळ्या विषयांसाठी एक क्लास लावून टाकला होता. शाळा सुटल्यावर रोज चार-पाच तास आणि दर रविवारी सरावपरीक्षा असं या क्लासचं (अन्य अनेक क्लासेससारखं) स्वरूप होतं. मुलांकडून कसून मेहनत करून घ्यायची हमीपण या क्लासनं दिली होती. मात्र ओजसला हे प्रकरण मानवत नव्हतं. या अशा भरगच्च शेडयुलमुळे त्याचा खेळ जवळजवळ बंदच झाला होता. त्यामुळे शनिवारी शाळा सुटली की तो सुसाट मैदानावर पळायचा आणि मग इतकं खेळायचा की त्याला रविवारच्या सरावपरीक्षेचा अभ्यास करायला वेळच मिळायचा नाही. परिणाम म्हणजे सरावपरीक्षांमधले मार्क घटायला लागले. आधी क्लासमधून ओरडा बसू लागला आणि मग घरातूनही. या सगळ्याचा परिणाम असा झाला की हळूहळू काही ना काही कारण काढून ओजस क्लासला दांड्या मारू लागला. घरचे हवालदिल होऊन गेले होते.
एखाद्या खेळाडू मुलाचा खेळ पूर्णपणे बंद होण्याचे हे परिणाम होते. वेळेच्या आघाडीवर अशी जबर कोंडी करणाऱ्या क्लासेसमध्ये त्याला अडकवावं, असं अनघाला का वाटलं?
“सगळेच घेतात ना मुलांना अशा क्लासेसमध्ये ॲडमिशन्स. मग आपण कमी पडलो, मुलांना संधी नाही दिली असं नको ना व्हायला!” अनघानं सांगितलं.
“सगळ्यांची मुलं इतकी खेळणारी नसतात ना पण!”
“हो, पण मग आपल्या देशात खेळांमध्ये नाही ना करिअर करता येत! मग काय करणार? दहावीला चांगले मार्क तर हवेतच ना!”
अशी कितीतरी उदाहरणं आपल्या आजूबाजूला दिसत असतात. अन्य आईबाबांच्या तुलनेमध्ये आपण आपल्या कर्तव्यांमध्ये चुकलो, असं नको व्हायला म्हणून आईबाबा अनेक गोष्टी करताना दिसतात. महागड्या शाळांमध्ये प्रवेश, सोबतीनं येणारे गलेलठ्ठ खर्च इथपासून सुरुवात होते, ती मग काहीही करून परदेशांत शिक्षण घेण्याचा खर्च.
माझ्या समुपदेशक म्हणून करिअरच्या सुरुवातीला मला एक कुटुंब भेटलं होतं. मध्य मुंबईत राहणारं कुटुंब, त्यांच्या मुलीला मेडिकलला ॲडमिशन मिळत नव्हती. खाजगी मेडिकल कॉलेजचा प्रवेश परवडणारा नव्हता. अशा वेळी कुटुंबानं चक्क त्यांचा मध्य मुंबईमधला फ्लॅट विकून ते मुंबई शहराच्या हद्दीबाहेर शिफ्ट झाले होते. खाजगी मेडिकल कॉलेजचा खर्च ते असा भागवणार होते. त्यावेळी मला मोठाच आश्चर्यवजा धक्का बसला होता. मात्र गेल्या दहा वर्षांमध्ये अशी अनेक कुटुंबं भेटली.
काय नेमकं होत असतं अशा वेळी? बाकीचे आई-बाबा इतकं सगळं मुलांसाठी करतात, मग त्यांच्या तुलनेत पालक म्हणून आपण कुठे कमी पडायला नको, मुलांना संधी दिली नाही असं नको व्हायला, हा एकच ध्यास सगळीकडे दिसत राहतो. पालकांच्या जगालाही या प्रकारच्या पीअर प्रेशरला तोंड द्यावं लागत आहे.
या सगळ्यात मूल यशस्वी होण्याची कितीतरी जबाबदारी आईवडील उचलताना दिसताहेत. मुलांची सगळी कामं करणं, त्यांना असंख्य गोष्टी आयत्या हातात आणून देणं, याबद्दल आपण या सदरामधून बोलतो आहोतच. मात्र मुलांची बौद्धिक क्षमता आणि मेहनत करण्याची तयारी कमी पडत असेल तर त्याची भरपाई पालक आपल्याला जे जे शक्य आहे, त्या त्या प्रयत्नांमधून करताना दिसताहेत.
याचं खास उदाहरण म्हणजे आज आयआयटी आणि मेडिकलच्या एन्ट्रन्स परीक्षा. मुलांचा ज्या प्रकारचा कल आहे, त्यासाठीच्या क्लासेसमध्ये घातलं जात आहे. त्यासाठीच्या सुविधा मोठ्या शहरांमध्ये आता तर गल्लोगल्ली आहेतच, शिवाय लहान शहरांमधूनही त्या उपलब्ध आहेत.
मध्यंतरी एक बाबा माझ्याशी बोलत होते, “हे सगळे क्लासेस कशामुळे चालतात माहीत आहे?”
“आम्हा पालकांच्या पीअर प्रेशरमुळे!”
याबद्दल आणखी बोलूया पुढच्या भागात.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link