Next
हिमालयाहून उंच दासकन्येचे यश
अमित मधुकर डोंगरे
Friday, July 26 | 03:30 PM
15 0 0
Share this story

विश्वचषक क्रिकेटचा ज्वर उतरत असताना आणि प्रो-कबड्डीचा ज्वर वाढत असतानाही भारतीयांच्या ओठी एकच नाव आहे, ते म्हणजे हिमा दास. तिने कामगिरीच तशी केली आहे. या १९ वर्षांच्या तरुणीने एक-दोन नव्हे तर तब्बल पाच सुवर्णपदकांची कमाई केली आहे, तीदेखील केवळ ११ दिवसांत!
पायोली एक्स्प्रेस पी.टी. उषा यांच्याकडून प्रेरणा घेत आणि त्यांच्याच पावलावर पाऊल टाकत हिमाने हे सुवर्णयश मिळवले आहे. आता याच कामगिरीत सातत्य राखत जपानमध्ये होणाऱ्या ऑलिंपिक स्पर्धेत पात्र होण्यासाठी ती सज्ज आहे. हिमाने चेक प्रजासत्ताक येथे झालेल्या महिलांच्या ४०० मीटर शर्यतीत सुवर्णपदकाची कमाई करताना ५२.०९ सेकंदांची नोंद केली. त्या आधी तिने येथे झालेल्या ताबोरस्पर्धेत २०० मीटरमध्ये २३.२५ सेकंदांची नोंद करत सुवर्णपदकाला गवसणी घातली होती. तसेच क्लाडोस्पर्धेत २०० मीटरमध्ये २३.४३ सेकंदांची नोंद करून सुवर्णपदक मिळवले होते. तत्पूर्वी पोलंडमधील कुंटो येथील स्पर्धेत २०० मीटर शर्यत २३.९७ सेकंदात पूर्ण करून सुवर्णपदकाची मानकरी ठरली होती, तर पोझनान स्पर्धेत २३.६५ सेकंदात २०० मीटरचा पल्ला पूर्ण करून सुवर्णपदकावर नाव कोरले होते.
अशी अचंबित करणारी कामगिरी केली असली तरीही हिमाला जागतिक स्पर्धेत पात्र होण्यासाठी आवश्यक असणारी वेळ गाठता आलेली नाही. पात्रता फेरीची वेळ ५१.८० सेकंद अशी आहे. या मोसमात हिमाची सर्वात सरस वेळ ५२.८८ सेकंद अशी असून तिला आता याच मोसमात होत असलेल्या पात्रता फेरीसाठी आवश्यक वेळ नोंदवावी लागणार आहे. यंदा डिसेंबरपर्यंत आणखी काही स्पर्धा होणार असून त्यात तिने आवश्यक पात्रता वेळ नोंदवली तर तिला जागतिक स्पर्धेत सहभागी होता होईल. त्या स्पर्धेतही तिने ऑलिंपिक पात्रता वेळ दिली, तर तिचे टोकियो ऑलिंपिकमध्ये सहभागी होण्याचे स्वप्न साकार होणार आहे.

पगाराची रक्कम पुरग्रस्तांना
आपल्या कामगिरीने सर्वांना चकीत करणाऱ्या हिमा दासने सार्वजनिक आयुष्यातदेखील आपल्या सामाजिक जाणीवेने सगळ्यांना अचंबित केले आहे. पाच सुवर्णपदके मिळवल्यानंतर पगारातील अर्धी रक्कम आसाममधील पुरग्रस्तांच्या मदतीसाठी मुख्यमंत्रीनिधीत जमा केली आहे. हिमा इंडियन ऑइल कॉर्पोरेशनमध्ये नोकरी करते. आसाममध्ये पुराने थैमान घातल्यामुळे तिने तातडीने तिच्या पगारीतील रक्कम दिली आहे. तसेच इतरांनाही पुरग्रस्तांना मदत करण्याचे आवाहन केले आहे. हिमाच्या या कृतीमुळे तिचे नाव जगाच्या कानाकोपऱ्यात पोचले आहे.

मूळची आसामची असलेली हिमा अत्यंत गरीब कुटुंबातून आली आहे. तिचा जन्म ९ जानेवारी २००० सालचा. वडिलांचे नाव रत्नेश्वर दास. नौगाव जिल्ह्यातील कांधूलिमारी या छोट्याशा गावात राहणारे आणि शेती करणारे रत्नेश्वर दास यांनी अत्यंत हलाखीच्या परिस्थितीतही हिमाच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्णय घेतला. त्यामुळेच ही दासकन्या यशाची हिमशिखरे काबीज करू शकली. धिंग हायस्कूलमध्ये शिक्षण घेत असलेली हिमा हे दास कुटुंबीयांचे पाचवे अपत्य आहे. खरे तर तिला लहानपणापासून फूटबॉलची आवड होती, मात्र आपल्याकडे महिला फुटबॉलला फारसे चांगले आणि पोषक वातावरण नसल्याचे लक्षात आल्याने तिने हा खेळ सोडून ट्रॅक अँड फील्डमध्ये कारकीर्द करण्याचे निश्चित करत सराव करण्यास सुरुवात केली. शमशुल हक या शारीरिक शिक्षण प्रशिक्षकांकडून मार्गदर्शन घेत तिने मैदानी स्पर्धेत नाव कमावण्यासाठी प्रचंड मेहनत सुरू केली.

हिमाची सुवर्ण कामगिरी
चेक रिपब्लिकन (४०० मीटर)     ५२.०९ सेकंद
क्लाडो अॅथॅलेटिक्स मीट (२०० मीटर)     २३.४३ सेकंद
ताबोर अॅथॅलेटिक्स (२०० मीटर)     २३.२५ सेकंद
कुंटो अॅथॅलेटिक्स मीट (२०० मीटर)     २३.९७ सेकंद
पोझनान अॅथॅलेटिक्स ग्रँड प्रिक्स (२०० मीटर)     २३.६५ सेकंद


एक काळ असा होता, की बूट घेण्यासाठीदेखील हिमाकडे पैसे नव्हते आणि २०१८ मध्ये जेव्हा तिने आशियाई स्पर्धेत सरस कामगिरी केली, तेव्हा तिला जागतिक स्तरावरील प्रतिष्ठित बूट कंपनी आदिदासने करारबद्ध केले. बूट घेण्यासाठी पैसे नसणाऱ्या हिमाचे नाव आदिदासने आपल्या उत्पादनांवर लावले व तिचा सन्मान केला. परिस्थिती कशी झपाट्याने बदलते याचे हिमा दास हे ठळक उदाहरण आहे. हिमाला गत वर्षी अर्जुन पुरस्कारानेदेखील गौरवण्यात आले आहे. ती युनिसेफची राजदूत आहे. त्याचबरोबर आसाम राज्याची ती क्रीडा राजदूतदेखील बनली आहे. भविष्यातही तिने असेच यश मिळवत ऑलिंपिक पदकालादेखील गवसणी घालावी, याच भारतीयांकडून तिला शुभेच्छा! 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link