Next
आहारतज्ज्ञांची वाढती गरज
नम्रता ढोले-कडू
Friday, August 30 | 02:00 PM
15 0 0
Share this story


भारत हा मधुमेह, हृदयविकार यांसारख्या अनेक आजारांची जगाची राजधानी बनला आहे. या पार्श्वभूमीवर आरोग्य हे  क्षेत्र सध्या तेजीत आहे. आरोग्य उत्तम राखण्यासाठी डाएटिंगवर लोक हजारो रुपये खर्च करत आहेत. त्यामुळेच न्यूट्रिशन आणि डाएटेटिक्स या क्षेत्रात करिअरच्या खूप संधी आहेत.
केमिस्ट्री आणि बायोलॉजी हे विषय घेऊन बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना ‘बी.एससी. न्यूट्रिशन आणि डाएटेटिक्स’साठी प्रवेश मिळू शकतो. मुंबई विद्यापीठात तसेच एस.एन.डी. टी. विद्यापीठात हे कोर्स उपलब्ध आहेत. हे शिक्षण घेतलेल्यांना डाएटिशियन/ न्यूट्रिशनिस्ट, आहार-संशोधनक्षेत्रात, तसेच पब्लिक हेल्थ न्यूट्रिशनिस्ट, क्लिनिकल न्यूट्रिशनिस्ट किंवा स्पोर्ट न्यूट्रिशनिस्ट म्हणून काम करता येते.
स्पेशलायझेशन करून मास्टर्स पदवी घेतल्यास अधिक संधी उपलब्ध होतात. क्लिनिकल न्यूट्रिशन, पीडियाट्रिक न्यूट्रिशन, पब्लिक हेल्थ न्यूट्रिशन, फूड सायन्स अँड टेक्नॉलॉजी, स्पोर्ट्स न्यूट्रिशन, जेरियाट्रिक न्यूट्रिशन, कार्डियाक न्यूट्रिशन, डायबिटिक न्यूट्रिशन, रिनल न्यूट्रिशन अशा विषयांत एम.एससी. करता येते. त्यानंतर पुढे पीएच.डी. आणि एम.फिल.देखील करता येते.   
न्यूट्रिशन आणि डाएटेटिक्स शिकलेल्यांना सरकारी आणि खासगी अशा दोन्ही क्षेत्रांत करिअर करता येऊ शकते. सरकारी नोकऱ्यांचा विचार केला तर सरकारी रुग्णालये, सार्वजनिक आरोग्यसेवाकेंद्रे, नर्सिंग होम्स, शासनाच्या आरोग्यविषयक योजना, आरोग्य संशोधन-विकास संस्था, सरकारी पोषणविषयक योजना अशा अनेक ठिकाणी संधी  मिळू शकतात.
खासगी क्षेत्राचा विचार केला तर प्रायव्हेट क्लिनिक्स, हॉस्पिटल्स, नर्सिंग होम्स, अन्नउत्पादन कंपन्या, आहारविषयक वैद्यकीय उत्पादने बनवणाऱ्या कंपन्या, न्यूट्रास्युटिकल्स इंडस्ट्री (शरीराच्या बळकटीसाठी प्रोटिन पावडर्स वा तत्सम उत्पादने तयार करणाऱ्या कंपन्या), खासगी शैक्षणिक संस्था, हेल्थ क्लब्स, फिटनेस सेंटर्स, स्पोर्ट्स सेंटर्स, हॉटेल्स अशा ठिकाणी नोकरीच्या संधी उपलब्ध होतात.
न्यूट्रिशनिस्ट किंवा डाएटिशियन म्हणून काम करताना पोषण आणि अन्नशास्त्राचा शास्त्रीय अभ्यास करणे, लोकांना आहाराविषयक मार्गदर्शन करणे, रुग्णांच्या गरजेनुसार त्यांचे डाएट प्लॅन करणे आणि संशोधनविषयक कामात सहभागी होणे, अशा पद्धतीच्या कामांचा समावेश होतो.

या क्षेत्रासाठी आवश्यक कौशल्ये
  • या क्षेत्रात काम करायचे तर अन्य कोणत्याही क्षेत्राप्रमाणेच ‘अपडेटेड’ राहण्याची गरज असते. सध्याच्या काळात आहारशास्त्राच्या क्षेत्रात काय बदल होत आहेत आणि ते कशा प्रकारे आपल्या खाद्यसवयींवर, जीवनशैलीवर प्रभाव पाडू शकतात, यासंबंधी आपले ज्ञान सतत अद्ययावत ठेवावे लागते.
  • आपल्याकडे आलेल्यांच्या आरोग्यविषयक तक्रारी, आहारविषयक सवयी, कामाचे स्वरूप, आर्थिक स्तर, कौटुंबिक जबाबदाऱ्या या सर्वांचा विचार करून त्यांच्यासाठी योग्य ठरेल असा आहारतक्ता त्यांना द्यावा  लागतो. योग्य आहार त्यांच्या शब्दशः ‘गळी उतरवायचा’  तर उत्तम संवादकौशल्य हवेच.
  • ‘व्यक्ती तितक्या प्रकृती’ या न्यायाने येणारा प्रत्येक रुग्ण हा वेगळा असतो. कधी कधी शारीरिक व्याधी एकच असली तरी त्यांच्या मानसिक आणि कौटुंबिक समस्या, कॅलरीजची गरज, आहारबदलास सामोरे जाण्याची वृत्ती भिन्न असतात. अशा वेळी त्यांच्या राहणीमानाला, रोजच्या आहारविषयक सवयींना फारसा धक्का न लावता, प्रत्येकासाठी डाएटप्लॅन बनवणे हे कसब असावे लागते. अर्थात ते अनुभवानेच येत असते.

या क्षेत्रातील खाचाखोचा-
  • हे शिक्षण देणाऱ्या अनेक खासगी संस्था सुरू झाल्या आहेत. या खासगी संस्थामधून तीन महिन्यांचे, सहा महिन्यांचे ‘न्यूट्रिशन अँड डाएटेटिक्स’ या विषयाचे ‘क्रॅश कोर्स’ किंवा ‘ऑनलाइन डिग्री कोर्स’  उपलब्ध करून दिले जातात. हे ‘तज्ज्ञ’ तुटपुंज्या ज्ञानावर आहारतक्ते देतात.  हृदयविकार, उच्चरक्तदाब, मधुमेह यांसारख्या तक्रारी असणाऱ्या पेशंट्सच्या बाबतीत तर आहारातील उलटे-सुलटे प्रयोग हे प्राणाशी गाठ ठरू शकतात. त्यामुळेच रुग्णांनी आहारविषयक सल्ला घेताना तो आहारतज्ज्ञ हा मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधारक आहे का, त्याने नोंदणी केली आहे का, याची खातरजमा केल्याशिवाय उपचार घेऊ नयेत.
  • या क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या  विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतानाही Indian Dietetic Association ने (IDA) मान्यता दिलेल्या संस्थांमध्येच प्रवेश घ्यावा. रजिस्टर्ड डाएटिशियन अर्थात आर. डी. प्रमाणपत्र मिळवणे श्रेयस्कर ठरेल, कारण नजीकच्या काळात ते प्रमाणपत्र बंधनकारक होण्याची शक्यता आहे.    
  • लोकांच्या मानसिकतेचा विचार केला तर एखादा झटका लागल्याशिवाय माणूस आपल्या आहाराचा गंभीरपणे विचार करत नाही. जेव्हा शरीराच्या यंत्रणेत बिघाड होतो तेव्हा तो दुरुस्त करण्यासाठी डाएट केले जाते. ‘खाण्यासाठी जन्म आपुला, खाणे आपुले काम’ या एकाच न्यायाने काही व्यक्ती जगत असतात. अशा रुग्णांना आहारतक्त्याच्या चौकटीत बसवायचे, हे मोठेच आव्हान डाएटिशियनसमोर असते.
  • एक-दोन वेळा डाएटिशियनकडे जाऊन आहारविषयक सल्ला घेतला की मग पुढच्या सिटिंग्जना त्यांच्याकडे जाण्यास लोक कां कूं करू लागतात. ‘उगाच नसता खर्च कशाला, त्यापेक्षा मनानेच डाएट करूया’ या मानसिकतेमुळे  अगोदर डाएटमुळे नियंत्रणात आलेल्या सर्व आरोग्यतक्रारी मग पुन्हा डोके वर काढू लागतात. आणि दोष मात्र डाएटिशियनच्या माथी मारला जातो!
  • सध्या आरोग्यविषयक माहिती प्रसारित करण्यात सोशल मीडियाचा अविवेकी वापर सुरू आहे. अनेक जण डाएटिशियनकडे जाण्याआधी गूगलवर सर्च करून त्यांचे पूर्वग्रह बनवतात. मग डाएटिशियनने दिलेल्या सल्ल्यांवर एक तर अविश्वास दाखवला जातो किंवा फारच प्रतिप्रश्न केले जातात.
एकंदरीत समाजातील आहारविषयक जागरूकता वाढल्यामुळे आज या क्षेत्रातील तज्ज्ञांना वाढती मागणी आहे. म्हणून आहारशास्त्राची आवड असेल तर या करिअरकडे वळायला हरकत नाही.
 
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link