Next
रायडूची निवृत्ती नाराजीतून?
अमित मधुकर डोंगरे
Friday, July 05 | 03:00 PM
15 0 0
Share this story

विश्वकरंडक क्रिकेटस्पर्धेसाठी राखीव खेळाडू म्हणून निवड होऊनदेखील प्रत्यक्षात अन्यायच झाल्याची भावना मनात ठेवत भारताचा एक जिद्दी फलंदाज अंबाती रायडू याने तडकाफडकी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे.
इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या विश्वकरंडक क्रिकेटस्पर्धेसाठी राखीव खेळाडू म्हणून अंबातीची निवड झाली होती, मात्र शिखर धवन जखमी झाल्यानंतर बदली खेळाडू पाठवण्याची वेळ आली तेव्हा भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने त्याच्याऐवजी ह्रषभ पंत याला इंग्लंडला रवाना केले. त्यानंतरही विजय शंकर जायबंदी झाला तेव्हादेखील निवड समितीने रायडूचा विचार केला नाही. त्याऐवजी मयांक अगरवाल याची निवड करत पुन्हा एकदा रायडूला बाजूला ठेवले. हे सहन न झाल्याने रायडूने निवृत्तीचा निर्णय तडकाफडकी जाहीर केल्याची चर्चा आहे. समितीचे माजी अध्यक्ष व माजी कसोटीपटू संदीप पाटील यांनीदेखील मंडळाच्या या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली आहे.
सध्याच्या निवड समितीच्या सर्व सदस्यांनी कधीकाळी खेळलेल्या सामन्यांत सगळ्यांनी मिळून जितक्या धावा केलेल्या नाहीत तितक्या रायडूने केल्या आहेत. मग समिती काय फक्त प्रशिक्षक रवी शास्त्री आणि संघनायक विराट कोहली यांच्याच लाडक्या खेळाडूंना निवडत राहणार का, असा प्रश्न आता भारतीय क्रिकेटप्रेमींना पडला आहे. मंडळाच्या याच कृतीमुळे एक चांगला फलंदाज आपण गमावला असे म्हणावे लागेल. आयपीएल तसेच स्थानिक रणजी वा अन्य स्पर्धांमध्ये रायडूने गेल्या चार मोसमांत सरस कामगिरी केली आहे. त्याने ५५ एकदिवसीय सामने खेळताना १६९४ धावा केल्या असून १२४ ही त्याची सर्वोच्च खेळी आहे. त्याच्या आजवरच्या कामगिरीत तीन शतके व दहा अर्धशतके आहेत. रायडूने आपल्या निवृत्तीचा निर्णय मंडळाला इमेलद्वारे कळवला तसेच त्याने हैदराबाद, बडोदा, आंध्र प्रदेश आणी विदर्भ क्रिकेट संघटनांनादेखील कळवला. तसेच आपल्याला प्रतिनिधित्व करण्याची संधी दिल्याबद्दल आभारदेखील मानले आहेत.
असे असले तरी प्रत्यक्षात तो मंडळाच्या व निवड समितीच्या भूमिकेबाबत नाराज झाला ही वस्तुस्थिती कोणीच नाकारणार नाही. निवड समितीने रायडूला डावलणे म्हणजे असे झाले, की साखरपुडा एका मुलीबरोबर आणि लग्न दुसऱ्याच मुलीशी! याबाबत सध्यातरी कोणी काही बोलणार नाही. खरे तर यात नवीन काहीच नाही, कारण राहुल द्रविड, व्ही.व्ही.एस. लक्ष्मण, वीरेंद्र सेहवाग, युवराजसिंग यांनादेखील मंडळाने प्रत्यक्ष मैदानावर निवृत्ती घेण्याची संधी दिली नाही. या खेळाडूंनी देशासाठी खूप मोठे योगदान दिले. मात्र त्यांच्याप्रती आभार मानण्याची वेळ आली तेव्हा मंडळाने त्यांच्याकडे, त्यांच्या कामगिरीकडे कानाडोळाच केला आहे. जर या खेळाडूंच्या बाबतीत मंडळ इतके वाईट वागू शकते, तर रायडूची काय कथा!
विश्वकरंडक क्रिकेटस्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा झाली तेव्हाच रायडूला वगळण्यावरून खूप उलटसुलट मुद्दे व्यक्त होत गेले. मंडळाकडून मात्र त्याबाबत काहीही चुकीचे केले नसल्याचेच सांगितले जात होते. रायडूने आपल्या निवृत्तीचे कोणतेही कारण दिले नसले तरी मंडळाच्या भूमिकेमुळे तो निश्चितच दुखावला गेला आहे. रायडूला आयर्लंड क्रिकेट संघटनेकडून खूप मोठे पॅकेज मिळाल्याचे बोलले जात आहे व आता संघात निवड होणे जास्त कठीण असल्याचे त्याच्या लक्षात आल्यानेच त्याने निवृत्ती जाहीर केल्याचे बोलले जात आहे. त्यातील सत्य काय ते लवकरच बाहेर येईल.
विश्वकरंडक स्पर्धेसाठी जेव्हा भारतीय संघ रवाना झाला आणि संघात विजय शंकरला स्थान मिळाले तेव्हा रायडूने केलेले एक ट्विट त्याला महागात पडल्याचे आता स्पष्ट होत आहे. विजयची निवड करताना निवड समितीने म्हटले होते, की विजयकडे थ्री-डायमेंशन कुवत आहे, म्हणजेच तो फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण करू शकतो. यावर ‘आपण आता विश्वकरंडकाचे सामने पाहताना थ्री-डी गॉगल वापरणार’ असे ट्विट रायडूने केले होते. त्यानंतर त्याने हे केवळ विनोद म्हणून केले असल्याचा खुलासा केला होता. निवड समितीने त्यावेळी रायडूच्या विधानाबद्दल कोणतीही प्रतिक्रिया न देता त्याला बाहेर ठेवत काय ते कृतीतून दाखवून दिले आणि इथेच रायडू दुखावला. त्याची परिणिती त्याच्या निवृत्तीत झाली. भारतीय क्रिकेटसाठी असे अनेक वादग्रस्त निर्णय नवीन नाहीत, या पूर्वीही असे अनेक प्रसंग घडले आहेत, त्यामुळे केवळ निवड समितीच्या निवृत्त सदस्यांकडून आणि निवृत्त क्रिकेटपटूंकडून रायडूला पुढे काही काळ सहानभुती मिळेल आणि काही दिवसांतच हा प्रसंगच नव्हे तर रायडूचे नावही विस्मृतीत जाईल. भारतीय संघाने विश्वकरंडक जिंकला तर रायडूच्याच कृतीला अयोग्य ठरवले जाईल आणि संघाच्या कौतुकसोहळ्यात निवड समितीची पाटी कोरी होईल. त्यांच्या निर्णयाचे समर्थन केले जाईल व रायडूची फाइल कायमची बंद होईल.

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link