Next
रोहितची कमाल, इंडियाची धमाल
अमित मधुकर डोंगरे
Friday, June 21 | 03:30 PM
15 0 0
Share this story

विश्वचषकस्पर्धेतील भारतीय क्रिकेट संघाचा उपकर्णधार रोहित शर्मा सध्या चांगलाच फार्मात आहे. रोहितने यापूर्वी अनेकदा दमदार खेळी केलेल्या आहेत, मात्र त्यावेळी त्याच्या फलंदाजीत सातत्याचा अभाव होता. विश्वचषकस्पर्धेत मात्र त्याची बॅट तळपली आहे. संघाचा उपकर्णधार म्हणून आलेली जबाबदारी तो व्यवस्थितरीत्या सांभाळत आहेच शिवाय त्याच्या फलंदाजीतदेखील सातत्य आहे. ही बाब भारतीय संघाच्या दृष्टीने सकारात्मक आहे. त्यामुळे विराट कोहलीच्या डोक्यावरचे ओझे त्याने त्याच्याही खांद्यावर घेतल्याचे दिसत आहे.
या स्पर्धेतील पहिल्या सामन्यापासून रोहितने आपल्या फलंदाजीने; माफ करा, दांडपट्ट्याने गोलंदाजांची पिसे काढायला सुरुवात केली आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात शतक, ऑस्ट्रेलियाविरुद्ध अर्धशतक आणि पाकिस्तानविरुद्ध पुन्हा शतकी खेळी, असा भीमपराक्रम केला आहे.
रोहितने भारतीय संघात पदार्पण केले तेव्हा जाणकारांनी त्याचे खूपच कौतुक केले होते. मात्र त्याच्या खेळीत जबाबदारीचा आणि सातत्याचा वारंवार अभाव दिसत होता. लग्न झाल्यापासून त्याच्या खेळात आत्मविश्वास आल्याचे बोलले जात असले, तरी त्याच्या डोक्यावर जेव्हापासून उपकर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली तेव्हापासून खरे तर त्याचा खेळ जास्त बहरला. एकदिवसीय सामन्यांमध्ये तीनवेळा द्विशतकी खेळी केलेल्या रोहितकडे शैलीदार फटके मारण्याची कला आहे, कोणत्याही गोलंदाजीची पिसे काढण्याची त्याच्यात क्षमता आहे, एवढेच कशाला संघाला बिकट स्थितीतून बाहेर काढण्याचीही कला त्याच्यात आहे. मात्र हे सगळे प्रत्यक्ष मैदानावर फार वेळा दिसले नाही.
रोहितने आर्यलंडविरुद्ध २००७ साली एकदिवसीय सामन्यांमध्ये पदार्पण केले. आजपर्यंत त्याने २०९ सामन्यांत आठ हजारांहून अधिक धावा केल्या आहेत. त्यात २४ शतके व ४२ अर्धशतके आहेत.
रोहितने शालेय, क्लबस्तरावर सातत्याने फलंदाजी करत निवडसमितीचे लक्ष वेधून घेतले. रणजीकरंडक स्पर्धेतदेखील त्याच्या बॅटमधून भरघोस धावा निघत होत्या. त्याचवेळी त्याची भारतीय संघात निवड झाली. त्याला पहिल्याच सामन्यात संघात स्थान मिळू शकले नाही. मात्र त्याने त्यानंतर झालेल्या टी-२० स्पर्धेच्या विश्वकरंडकस्पर्धेत अफलातून खेळ केला. त्यानंतर मात्र रोहितला काही स्पर्धांमध्ये सातत्याने अपयश येत राहिले. तरीही कर्णधार महेंद्रसिंह धोनीने त्याच्यावर विश्वास ठेवला. त्यामुळेच रोहितला आत्मविश्वास मिळाला. मायदेशात झालेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत तर त्याने थक्क करणारी फलंदाजी केली. या मालिकेत त्याने १४७ धावांची खेळी केली, त्यानंतर पुढील सामन्यात एकदिवसीय कारकिर्दीतील वैयक्तिक पहिले द्विशतक साकार केले. श्रीलंकेविरुद्ध तर त्याने इडन गार्डन मैदानावर हाहाकार माजवला होता. त्याने २६४ धावांची तुफानी खेळी करत आपली बॅट नसून दांडपट्टा आसल्याचे दाखवून दिले होते. या खेळीत त्याने १६ षटकार मारत विक्रम साकार केला. आजमितीला रोहितच्या नावावर एकदिवसीय सामन्यांमधील तीन द्विशतके आहेत.
रोहितने यापूर्वीच्या अनेक सामन्यांत आपल्या सहजसुंदर खेळाने चाहत्यांची मने जिंकली असली तरी त्याचे लक्ष्य यंदाच्या विश्वचषकस्पर्धेत सरस कामगिरी करण्याचे होते आणि त्याला तसे यशदेखील मिळत आहे. २०११ ची विश्वचषकस्पर्धा भारतीय संघाने जिंकताना १९८३ नंतर २८ वर्षांनी पुन्हा एकदा विजेतेपदावर मोहोर उमटवली होती. या स्पर्धेत जी कामगिरी युवराजसिंगने केली त्याचीच पुनरावृत्ती यंदाच्या स्पर्धेत रोहित करत आहे. भारतीय संघाला आधी सचिन तेंडुलकरवर भरवसा ठेवावा लागत होता, त्यानंतर ही धुरा विराट कोहलीने सांभाळली, मात्र आता त्याचा भार हलका करण्यासाठी रोहितनेदेखील कंबर कसली आहे. रोहितला अजून खूप सामने खेळायचे असून अनेक बलाढ्य संघांशी दोन हात करायचे आहेत.
या स्पर्धेत भारतीय संघाला यशस्वी व्हायचे असेल तर केवळ कोहलीवर अवलंबून चालणार नाही. रोहितलादेखील फलंदाजीमध्ये सातत्य दाखवावे लागणार आहे. भारतीय संघाची फलंदाजी रोहित व कोहली यांच्यावरच जास्त अवलंबून आहे. हे दोघे सातत्याने धावा करत राहिले तर कोणत्याही संघाला पाणी पाजण्याची क्षमता त्यांच्यात आहे.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link