Next
खुदीराम बोस
- विजय काळे (संस्कार भारती)
Friday, August 09 | 03:30 PM
15 0 0
Share this story

३ डिसेंबर १८८९ रोजी बंगालमधील मिदनापूर जिल्ह्यात हबीबपूर गावी खुदीरामचा जन्म झाला. खुदीरामचे पालनपोषण त्याच्या मोठ्या बहिणीने केले. विसाव्या शतकाच्या सुरुवातीला स्वातंत्र्यलढा तीव्र होत असल्याचे पाहून इंग्रजांनी १९०५ मध्ये बंगालची फाळणी केली, याला मोठ्या प्रमाणावर विरोध झाला. याच सुमारास खुदीराम स्वातंत्र्यलढ्यात सक्रिय सहभागी झाला. वयाच्या सोळाव्या वर्षी त्यांनी पोलीस स्टेशनच्या जवळ बॉम्ब ठेवला. १९०६ मध्ये दोनदा त्यांना पोलिसांनी पकडले, मात्र साक्षीदार न मिळाल्यामुळे त्यांची ताकीद देऊन सुटका झाली. सशस्त्र क्रांतीच्या यज्ञात खुदिराम अनेक वेळा सहभागी झाला व यशस्वीरीत्या पोलिसांच्या हातावर तुरी देऊन निसटला.
बंगालच्या फाळणीच्या विरोधात आंदोलन करण्याऱ्या भारतीयांवर खटले चालवून कलकत्त्याचा मॅजिस्ट्रेट किंग्जफोर्ड याने त्यांना क्रूर शिक्षा दिल्या. इंग्रजी सत्तेने किंग्जफोर्डला बढती देऊन मुजफ्फरपूरचा जिल्हा सत्र न्यायाधीश केले. क्रांतिकारकांनी किंग्जफोर्डला ठार करण्याचा निर्धार केला. या कामासाठी निवडले खुदीराम बोस आणि प्रफुल्लकुमार चाकी यांना. किंग्जफोर्डच्या ऑफिस आणि बंगल्याबाहेर त्यांनी पाळत ठेवली. ३० एप्रिल १९०८ रोजी खुदीराम व चाकी बंगल्याबाहेर किंग्जफोर्डची वाट बघत उशिरापर्यंत थांबले. बंगल्याबाहेर येणाऱ्या बग्गीवर बॉम्ब फेकला. त्या बग्गीत किंग्जफोर्ड नव्हताच, दोन युरोपीयन महिला होत्या. नंतर उडालेल्या गोंधळाचा फायदा घेऊन हे दोघे पळाले, पण पोलिसांच्या हाती लागले. प्रफुल्लकुमार चाकी याने स्वत:वर गोळी चालवली आणि तो शहीद झाला.
खुदीराम बोसवर खटला चालवून त्याला फाशीची शिक्षा सुनावली गेली. ११ ऑगस्ट १९०८ या दिवशी हा १८ वर्षांचा युवक हाती भगवतगीता घेऊन फासावर चढला.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link